विरंगुळा - ४१

२७ ते २९ जानेवारी

आता दोन दिवस मुंबईतच आहे. नेहमीचा दैनंदिन खाक्या सुरू आहे. ''श्री. चिंतामण देशमुख आणि मंडळी'' पुण्यात आहेत. तेथून निवेदनाचा आणि भाषणाचा पाऊस सुरु आहे. मुंबई सरकारने दुष्काळी भागास परिणामकारक मदत करण्यासाठी दारूबंदीसंबंधी फेरविचार करावा, रस्ते व शिक्षण यावरील खर्च थोड्या प्रमाणात कमी करावा वगैरे देशमुख मुक्ताफळे वर्षावातून बाहेर आली.

राष्ट्रीय नियोजनाचा विचार करणारांनी दुष्काळी दु:खाशी शेकडो वर्षे बांधलेल्या विभागासाठी काही विशेष व स्वतंत्र विचार का करू नये? फक्त १५ कोटी रुपये या प्रश्नासाठी पाच वर्षांकरिता ठेवले आहेत म्हणे! उलट भारतातील सुपीक प्रदेशातून शेकडो कोटीच्या खर्चाळू योजना वर्षानुवर्षे चालू राहाणार आणि हे आमचे महाराष्ट्रीय अर्थमंत्री उंटावरून आम्हाला उपदेश करणार की दुष्काळ ही राज्यांची जबाबदारी आहे आणि त्याच्यासाठी शिक्षण उपाशी राहू द्या! बहुजन समाज आताशी कुठे डोळे किलकिले करून इकडे तिकडे पाहू लागला आहे तोच हे विद्वान आम्हाला सांगणार की 'पोट उपाशी नको असेल तर डोके उपाशी ठेवा आणि डोके उपाशी ठेवायचे नसेल तर राहूद्यात पोट उपाशी.' वारे अर्थमंत्री!

देशमुख पहिल्या प्रतीचे ग्रंथपंडित आहेत यात शंका नाही. परंतु राज्यकारभारासाठी वापरावयाची तत्त्वे सामान्य माणसांच्या जीवनानुभूतीवर तपासून घ्यायची असतात. बिचारे देशमुख तरी काय करणार? त्यांच्या जीवनाच्याच काही मर्यादा आहेत. नोकरशाहीच्या जुन्या चाकोरीतून पस्तीस वर्षे आपली तीक्ष्ण बुद्धी त्यांनी राबविली आहे. त्यामुळे तिला थोडा बोथटपणा आला आहे. लोकजीवनाच्या संग्रामातून वर आलेल्या दुर्गाबाईंशी त्यांची आता भेट झाली आहे. आशा करूया की त्या त्यांना ही नवी दृष्टी देतील.
------------------------------------------------------------

३० जानेवारी

३० जानेवारी. राष्ट्रपित्याच्या महायात्रेचा आजचा दिवस. सुख आणि दु:ख यात अंतर किती असा कोणी प्रश्न विचारला तर त्याला हिंदी मनुष्य, 'तीन दिवसाचे' असे उत्तर देऊ शकेल. ता. २६ जानेवारीच्या पाठोपाठ तीन दिवसांनीच तीस जानेवारी हा उजाडतो! हा सुखदु:खाचा पाठशिवणीचा खेळ अखंड कालपर्यंत हिंदी जीवनांत चालू राहाणार.

श्री. मोरारजींच्या घरी अमेरिकन निग्रो पुढारी व शांततेचे नोबल प्राइझ मिळविणारे डॉ. राल्फ बुच सकाळी चहासाठी येणार म्हणून बहुतेक सर्व मंत्री हजर होते. सर्व बोलणे गांधीजींविषयीच झाले. डॉ. राजेंद्रप्रसादांचे गांधी सेमिनॉरमध्ये गांधी तत्त्वज्ञानावर झालेले भाषण फारच उत्कृष्ट झाले असे डॉ. राल्फ वारंवार म्हणत होते. जगातील मोक्याच्या जागी जर अर्धा डझन गांधी निर्माण झाले तर मानवता मूळापासून कायमची वाचेल असे बोलता बोलता डॉ. राल्फ म्हणाले. संतजन हा काय लष्करी उत्पादनाचा आणि योजनेचा प्रश्न आहे?
------------------------------------------------------------