नवे आर्थिक धोरण आखताना विशेष करून त्यांनी भारतीय परराष्ट्र धोरण ठामपणे जगासमोर मांडले. धर्मनिरपेक्षतेचा अगर अण्वस्त्रबंदीचा विषय असो, तो ठामपणे मांडला. काही वर्षांपूर्वी सोव्हिएत जनरल सेक्रेटरी गोर्बाचेव्ह दिल्लीला आले होते. अहिंसा व गटनिरपेक्ष संबंधीच्या करारपत्रकावर त्यांनी सही केली. यामध्ये आम्ही यशस्वी झालो याचे मुख्य कारण म्हणजे यशवंतरावसारख्यांनीच त्याचा पाया घातला होता. त्याचीच मधुर फळे आम्ही आज चाखत आहोत. तसेच अण्वस्त्रे नष्ट करण्याचे स्वप्न अनेक वर्षे जग पाहत आहे, त्यात सुद्धा यश आल्याचे दिसत आहे. ते सुद्धा पंडितजी, इंदिराजींनी दाखविलेल्या मार्गानेच आणि यशवंतरावजींच्या विदेशमंत्रालयाच्या कालखंडातच. यशवंतराव आपल्या सिद्धांतापासून कधीही विचलित झाले नाहीत. त्यांनी महाराष्ट्राला तसेच देशाला आर्थिक विकासाचा मार्ग दाखविला व देशाला बलशक्ती बनविले. याशिवाय त्यांच्याजवळ काही गुणविशेष होते.” ते पुढे म्हणतात, “यशवंतरावांचे लक्ष चौफेर होते. भारताला बलशक्ती करावयाचे असेल तर आपणाला यशवंतरावांच्या तत्त्वप्रणालीचे अनुकरण करावे लागेल.”
शेवटी पंतप्रधान म्हणाले, “यशवंतरावजींनी आम्हास समाजवादाचा, लोकशाहीचा, धर्मनिरपेक्षतेचा, गटनिरपेक्षतेचा जो मार्ग दाखविला त्याच मार्गाने आम्हास पुढे जायचे आहे. महिलांना सामर्थ्यवान व आर्थिकदृष्ट्या बळकट केले तर ती एक शक्ती निर्माण होणार आहे. युवकांना जलदगतीने नोकर्या देणे, शिक्षणाविषयक धोरणाला नवे वळण देणे, की ज्यामुळे तरुणांना काम मिळेल त्या दृष्टीने आम्ही काही पावले उचलत आहोत. ज्याप्रमाणे यशवंतरावांनी प्रत्येक आव्हानाला तोंड दिले, संकटासमोर ते कधीही वाकले नाहीत, त्याचप्रमाणे महाराष्ट्राची-भारताची संपूर्ण जनता भारतीय तत्त्वप्रणालीवर पंडितजी, इंदिराजी, यशवंतरावजी यांच्या विचाराद्वारे प्रगती करतील. माघार घेणार नाहीत व आव्हानाला समर्थपणे तोंड देतील. यशवंतरावजींच्या पुतळ्याच्या आनावरणासाठी आपण मला प्रेमाने बोलाविलेत, आपण केलेल्या स्वागताबद्दल मी आभारी आहे. आपणास मी धन्यवाद देतो.”
दि. २५.११.१९९० रोजी मुंबई येथे महाराष्ट्र विधानभवनाच्या आवारात पंतप्रधान मा. चंद्रशेखर यांच्या हस्ते यशवंतराव चव्हाण यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण झाले. त्याप्रसंगी पंतप्रधान चंद्रशेखर आपल्या भाषणात म्हणाले, “१९६२ साली चिनी आक्रमणाच्या वेळी ‘महाराष्ट्राचा सह्याद्री हिमालयाच्या मदतीला धावला’ असे ज्यांचे वर्णन केले जाते त्या यशवंतरावजींच्या पुतळ्याचे अनावरण माझ्या हस्ते होत आहे, म्हणून मी स्वत:ला धन्य समजतो. यशवंतरावांनी या देशासाठी फार मोठे योगदान दिले. त्यांच्या विचारातून या देशाला मोठी शक्ती आणि प्रेरणा मिळाली आहे. भविष्यकाळातही देशाला विश्वास देण्यासाठी व मार्गदर्शनासाठी महाराष्ट्राला जबाबदारी स्वीकारावी लागेल.” ते पुढे म्हणतात, “काँग्रेस पक्ष फुटल्यानंतर मुंबईत अधिवेशन झाले त्यावेळी मोहन धारिया माझ्या बरोबर होते. शरद पवार त्यावेळी लहान होते. माझे राज्यपाल सुब्रह्मण्यम् व यशवंतरावांशी त्यावेळी मतभेदही झाले. मी त्यांच्या विचारांना जोरदार विरोध केला., परंतु आपल्याशी असलेले मैत्रीचे नाते कधीच तुटले नाही. राजकीय विचारात कडवटपणा असूनही मी कै. यशवंतरावांच्या घरी जात असे. चहा-भजी मागून घेत असे व त्यांच्याशी मोकळेपणे गप्पा मारीत असे. राजकारणात नेहमीच चढ-उतार असतात. पण मला यशवंतरावांच्या बद्दल नेहमीच आदर वाटत आला आहे. १९६२ साली मी प्रथमच लोकसभेत निवडून आलो होतो. देशावर झालेल्या चिनी आक्रमणाने सर्वजण पराभवाच्या छायेत होते. हिमालयाच्या मदतीसाठी सह्याद्रि येत आहे अशी चर्चा मी तेव्हा लॉबीत ऐकत असे.” शेवटी पंतप्रधान म्हणतात, “यशवंतराव देशाचे संरक्षमंत्री होताच देशाला त्यांनी फार मोठा विश्वास दिला. ते दिल्लीत आल्यानंतर शस्त्रे वाढली नव्हती किंवा सैन्यही वाढले नव्हते., परंतु सैन्याचे नीतिधैर्य व विश्वास फार वाढला होता हे निश्चित. यशवंतरावांच्या विचारात स्पष्टता होती. दुसर्यांना प्रेरणा, साहस देण्याचे काम त्यांनी सदैव केले. गरीब शेतकरी ही देशाची संपदा आहे ही गोष्ट यशवंतरावजी ओळखून होते, म्हणूनच शेतकर्यांत त्यांनी विश्वास निर्माण केला. कवी, साहित्यिक व कलावंत यांना सन्मान मिळवून देणारे ते देशातील पहिले मुख्यमंत्री असावेत” असे पंतप्रधानांनी प्रतिपादन केले.