Yashwantrao Chavan Yanche Samajkaran
यशवंतराव चव्हाण

     यांचे समाजकारण

   लेखक : रा. ना. चव्हाण
-------------------------------- 

pdf inmg Ebook साठी येथे क्लिक करा 

संपादकीय मनोगत

लेख संकलनाची उद्दिष्टे

महाराष्ट्रातील एक प्रबोधन चळवळीचे अभ्यासक माझे वडील दिवंगत रा. ना. चव्हाण यांच्या वैचारिक लेख संकलनाचे हे अठरावे पुष्प वाचकांच्या, अभ्यासकांच्या हातात देतांना अतीव आनंद व समाधान होत आहे. पितृकार्य वाढीस लावणे, सामाजिक ऋणातून मुक्त होण्याचा यथाशक्ती प्रयत्न करणे या दोन भावना जोपासत हे अल्पसे कार्य गेली १७ वर्षे सातत्याने ‘चव्हाण कुटुंबीय’ स्वखर्चाने व स्वावलंबनाने करत आहे. संस्कार, सत्संग व व्यासंग या बलस्थानातून निर्माण झालेले ‘रा. ना.’ चे समाजहितैषी, मूलगामी, साक्षेपी चिंतन, लेखन हा आम्हांस लाभलेला सधन वारसा आहे. हे समाजधन, पितृधन महाराष्ट्राच्या सामाजिक इतिहासाच्या दृष्टीने ‘ठेवा’ आहे. म्हणून नैतिक कर्तव्याच्या जाणिवेतून, त्यांचे लेख संकलन करून ठेवत आहे. आतापर्यंत १८ ग्रंथातून जवळ जवळ ४१०० पानांचे लेखन संकलन करण्याचा उपक्रम ‘ईश्वरीकृपेने’ अखंडपणे एक ‘व्रत’ म्हणून करत आहोत. हे प्रयत्न अभ्यासकांकडून, समाजाकडून, राज्यशासनाकडून उपेक्षित राहू नयेत हीच अपेक्षा.

‘रा. नां.’ ची जडणघडण

‘रा. ना’ ची जडण-घडण वाई या ऐतिहासिक शहरात झाली. त्यांचा जन्म वाई येथे २९ ऑक्टोबर १९१३ साली शेतकरी कुटुंबात झाला. त्यांचे वडील (माझे आजोबा) नारायण कृष्णाजी चव्हाण हे उदारमतवादी, सामाजिक बांधिलकी मानणारे, आध्यात्मिक ग्रंथ वाचनाची आवड असणारे होते. शिक्षणाची आवड, आस्था प्रथम पासूनच त्यांच्याकडे होती. त्यांनी १९१९ ते १९३३ पर्यंत सत्यशोधक चवळवळीचे नेतृत्व केले. त्यासाठी बागडे, जेधे जवळकर, सोनोपंत कुलकर्णी, भाऊराव पाटील, पी. सी. पाटील, आनंदस्वामी, भास्करराव जाधव यांचे मार्गदर्शन लाभले. सत्यशोधक जागृतीतून सार्वजनिक मराठी मोफत वाचनालय, श्री शिवाजी जन्मोत्सव, म. फुले पुण्यतिथी उत्सव, वक्तृत्वोत्तजक सभा, विराट मेळा (जलसा), विद्यार्थी मंडळ, अस्पृश्यता निवारण व विद्यार्थी वसतिगृह अशी अनेक सामाजिक प्रगतीची कामे चालू केली. ही समाज जागृती करताना आक्रमक पवित्रा न घेता समंजसपणाची भूमिका घेऊन काम केले. महाराष्ट्राच्या सामाजिक जीवनात ब्राह्मणेतरांची चळवळ ही खळबळ उठवणारी घटना होती. त्यातून वाईसारख्या सनातनी गावात काम करणे हे दिव्य होते. त्यांनी ह्या चवळवळीस विध्वंसक वळण न देता सात्विक व विधायक मार्गदर्शन केले. याच काळात ते वाई नगरपालिकेचे सदस्य, अध्यक्ष झाले. वाई नगरपालिकेच्या १८५३ च्या स्थापनेनंतर बहुजन समाजातून आलेला पहिला नगराध्यक्ष होण्याचा मान त्यांना मिळाला. (१९२६ ते १९२९). शिक्षण प्रशाराची आवड म्हणून स्कूल बोर्डाच्या अध्यक्षपदी प्रदीर्घ काळ काम केले. १४ वर्षे ऑनररी बेंच मॅजिस्ट्रेट म्हणून त्यांनी नि:पक्षपातीपणे न्याय देण्याचे कार्य केले. खादीचा सक्रीय पुरस्कार करून असहकार चळवळी काम करून काँग्रेसचे कामकाज केले. परंतु शाश्वत स्वरूपाचे कार्य करावे व शाश्वताच्या सेवेतून लोकसेवाकार्य आणि लोकसंग्रह करावा हा निश्चय करून या हेतूच्या पूर्ततेसाठी ‘प्रार्थना संघ’ ४/७/१९३३ रोजी स्थापून पुढे गुरूवर्य महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली व सहयोगाने वाईस ब्राह्म समाजाची स्थापना केली व त्याद्वारे ब्राह्मधर्माची उच्चतम शिकवण खेड्यापाड्यात पसरविण्याचे कार्य, अंधश्रद्धा निर्मूलनाचे कार्य, अस्पृश्योद्धाराचे कार्य हाती घेतले. याकरिता महर्षी वि. रा. शिंदे हे सहकुटुंब वाईस येऊन त्यांच्या घरी राहिले. गणपतराव कृष्णराव कदम वकील, बळवंतराव पवार, शंकर तुकाराम भोज, श्री. सखाराम बळवंत पाटणे, रा. कृ. बाबर, शंकरराव जेजुरीकर, पुंडलिकराव हैबतराव ठाकूर, ए. के. घोरपडे, बाबूराव पाडळे, येवले, माधवराव नलवडे, रा. ल. शिंदे वगैरे अनेक कार्यकर्ते या कार्यात काम करण्यासाठी झटले. एकपरीने वाईचा सत्यशोधक समाज वाई ब्राह्मसमाजात विलीन झाला.