• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

अभिनंदन ग्रंथ - निवेदन

निवेदन

वा. गो. गावंडे

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री. यशवंतराव चव्हाण यांच्या ४७ व्या वाढदिवसानिमित्त "श्री. यशवंतराव चव्हाण अभिनंदन ग्रंथ' आणि सोवनीर प्रकाशित करण्यांत आम्हांस अत्यंत आनंद होत आहे. जाहीररीतीने वाढदिवस समारंभ साजरा करावयाचा नाही असें श्री. चव्हाण यांनी सांगली मुक्कामी सांगितले असतांना देखील विदर्भांतील अनेक चाहत्यांनी, नेत्यांनी यंदाचा हा वाढदिवस नागपूर मुक्कामी साजरा करावा अशी कल्पना पुढे मांडली. आम्हांला ही कल्पना जरी पसंत असली तरी श्री. चव्हाण यांना ती आवडणार नाही याची जाणीव आम्हां सर्वांस होतीच. तरी पण आम्ही या बाबंतीत माघार घ्यावयाची नाही आणि श्री. चव्हाण यांना या समारंभासाठी आग्रहाने नागपूरला न्यावयाचेच असा निश्चय केला.

नागपूर मुक्कामीं या शुभकार्याचा निश्चय करणें अत्यंत सुलभ असलें तरी पण मुंबईस येऊन ही कल्पना प्रत्यक्ष श्री. चव्हाण यांच्यापुढे ठेऊन त्यास त्यांची संमति मिळविणें अत्यंत अवघड आहे, याची जाणीव मनांत ठेवून आम्हीं मुंबई गाठली. हळूहळू भीतभीतच श्री. चव्हाणांच्या पुढे हा विषय मांडतांच ताबडतोब नकार मिळाला; आणि सांगलीच्या समारंभाचे वेळीं ठरविलेल्या निश्चयाचें स्मरण दिलें गेलें. तरीहि निराश न होता चिकाटीने हा वाढदिवस विदर्भात साजरा होणें किती आवश्यक आहे, विदर्भांच्या भागांतील लोकांची समारंभ साजरा न झाल्यास कशी निराशा होईल, सर्वांचा कसा आग्रह आहे याची माहिती सांगत असतांना श्री. चव्हाण यांच्या कर्तव्यकठोर आणि निश्चयी मुद्रेवरील भाव आम्हीं न्याहाळीत होतो. आपला वाढदिवस आता आपला स्वत:चा राहिला नाही त्यावर लोकांचा हक्क आहे, त्यांच्या इच्छेला मान स्वत:ची इच्छा बाजूस सारुनहि दिला पाहिजे की स्वत:चाच हट्ट धरावा याचें त्यांच्या मनांत जणु मंथनच चालूं होते. आम्ही आपली बाजू निरनिराळ्या रीतीने चिकाटीने मांडीत होतो आणि ते स्तब्धपणे सर्व ऐकून घेत होते. शेवटी उत्तराच्या अपेक्षेने थांबलो. क्षणभर त्यांनी स्थिर दृष्टीने पाहिले आणि सांगितले की, "ठीक आहे, तुम्हा सर्वांच्या इच्छेला मला मान दिलाच पाहिजे - इलाज नाही." अत्यंत आनंदाने सर्वांना आण्ही ही बातमी सांगितली व या समारंभाच्या तयारीला लागलो. हाताशी वेळ थोडा आणि फात मोठे जोखमीचे काम अंगावर पत्करलेलें. पण त्यामुळेंच सर्वांच्या उत्साहात उधाण आलें व त्याचा परिणाक आजच्या समारंभाच्या रुपाने, प्रकाशनाच्या रुपाने आपणांस दिसत आहे. तसेंच हा समारंभ व्हावा ही कल्पना काँग्रेसमधील कांही व्यक्तींनी पुढे आणली असली तरी देखील आजचा हा समारंभ समस्त जनतेचा उत्स्फूर्त समारंभ आहे. काँग्रेस बरोबर खांद्यास खांदा भिडवून हा समारंभ यशस्वी करण्यासाठी निरनिराळ्या मतमतांतराच्या, वयाच्या आणि सामाजिक थरांतील अनेक व्यक्ती येथें आलेल्या आहेत हें पाहून श्री. यशवंतरावांच्या कर्तृत्वाबद्दल सर्वांनाच कसा आदर, आनंद आणि अभिमान वाटतो हें दिसून येतें. या समारंभाचे अध्यक्षस्थआन कोणा दुस-या व्यक्तीस न देतां नागपूरच्या महापौरांना देण्यांत सत्कार समितीने मोठें औचित्य दाखविलें आहे.

हा वाढदिवस साजरा करीत असतांना श्री.चव्हाण यांना एक 'अभिनंदन ग्रंथ' भेट द्यावा व सोवनीर काढावें या हेतूने मा. कर्मवीर कन्नमवारजी यांच्या अध्यक्षतेखाली आणि तर्कतीर्थ श्री. लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या मार्गदर्शनखाली एक सल्लागार मंडळ निवडण्यांत आलें आणि संपादनाच्या कामीं संपादक मंडळाची निवड झाली. मुंबई ते नागपूर या दोन केंद्रांचा संपर्क योग्यरीतीने राहावा या दृष्टीने मुंबई येथे एक कार्यालयहि उघडलें गेले. ग्रंथाच्या छपाईचें कामहि मुंबई येथेच करावें असा निर्णय घेण्यांत आल्याने मुंबई शाखेवर ग्रंथाच्या मजकुराच्या जुळवाजुळवीची, छपाईची वगैरे सर्व प्रकारची जबाबदारी आली. हें सर्व अवघड काम उरकण्यांत आमच्या समितीच्या मुंबई कार्यालयाचे सेक्रेटरी म्हणून "तरुण भारताचे" मुंबईचे प्रतिनिधी श्री. प्र. ना. इंदूरकर व त्यांचे सहकारी तरुण भारताचे पुण्याचे प्रतिनिधी श्री. महेश जोशी यांनी श्री. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या सल्ल्याने व मार्गदर्शनाखाली अत्यंत परिश्रम घेतले हें नमूद केलें पाहिजे. या ग्रंथाच्या संपूर्ण सजावटीची जबाबदारी मुंबईला स्थाईक झालेले नागपूरचे सुप्रसिद्ध चित्रकार श्री. दत्ताजी गोडसे यांनी पत्करली. त्यांनी आपलें काम किती चोख बजाविले आहे हे ग्रंथ हाती धरतांच आपल्या लक्षांत येतें. श्री. गोडसे यांच्या सुंदर सजावचीला बॉम्बे प्रोसेस स्टुडिओचे  मालक श्री. मोहनराव कामत यांनी उत्तम ब्लॉक्स तयार करून सुयोग साथ दिली.

आम्ही लेखक वर्गाला आणि छापखान्याच्या मालकांना फार थोडा अवधि दिला. लेखकांना अनेक कामें असतात. अगोदरच ठरलेले पुष्कळ कार्यक्रम असतात. विशेषत: या अभिनंदन ग्रंथाचे लेखक फार महत्त्वाच्या खाजगी व सार्वजनिक जबाबदा-या शिरावर घेऊन चाललेले आहेत. त्यांना फुरसत नाही. फुरसत केव्हा तरी मिळणार.त्याकरिता दोनतीन महिन्यांची अगोदर सूचना देणें आवश्यक असतें. परंतु आम्ही तसें कांही करूं शकलो नाही. पंधरा दिवसांचाच अवधी जेमतेम देऊं शकलों व एवढ्या अवधींत ज्या लेखकांनी सवड काढून लेख दिले याबद्दल त्यांचे आभार मानावे तितके थोडेच आहेत. पुष्कळ लेखखांच्या मनांत असूनहि त्यांना वेळेवर लेख देणें जमलें नाही.  मौज प्रिटिंग ब्यूरोचे श्री. विष्णुपंत भागवत यांनी अत्यंत कमी वेळांत विशेष आपुलकीने इतकी सुबक व आकर्षक छपाई करून आमच्या या ग्रंथ प्रकाशनाच्या कार्यात सहकार केला याची जाणीव आम्ही विदर्भवासी विसरणार नाही.