पिके जाळणे हा जनताद्रोह आहे !
सन १९४२ च्या ऑगस्ट महिन्यात ' चले जाव ' आंदोलन सुरू झाले. तरूण यशवंतरावांनी स्वत:ला त्या आंदोलनात झोकून दिले. इंग्रज सरकारने क्रांतिकारकांची धरपकड सुरू केल्यावर यशवंतराव भूमिगत झाले. या भूमिगत अवस्थेत असतानाच एकदा ते मुंबईला गेले. इंग्रज सरकारने क्रांतिकारक व भूमिगत कार्यकर्ते यांच्याविरुद्ध कडक मोहिम उघडली होती. सरकारच्या या जुलूम- जबरदस्तीचा प्रतिकार कसा करायचा याची चर्चा करण्यासाठी मुंबईत भूमिगत कार्यकर्त्यांची एक बैठक भरली होती. यशवंतराव या बैठकीला हजर होते. बैठकीत अनेक क्रांतिकारकांनी आपापले मत मांडले. नंतर एक कार्यकर्ता उठून उभा राहिला आणि म्हणाला, ' ग्रामीण भागामध्ये सरकारच्या हातामध्ये वाटणीसाठी धान्य जाऊ देता कामा नये. यासाठी काहीतरी योजना आखली पाहिजे.' यावर बाकीचे कार्यकर्ये म्हणाले, ' ते सर्व ठीक आहे, पण हे होणार कसे ?' यावर तो कार्यकर्ता आवेशाने म्हणाला, ' रशियात ज्याप्रमाणे जर्मन आक्रमकांना शरण जाण्यापूर्वी शेतातील उभी पिके जाळून टाकण्याचा कार्यक्रम तेथील लोकांनी हाती घेतला होता, तोच मार्ग आपल्याला येथे अवलंबावा लागेल.'
ही विघातक सूचना यशवंतरावांना अजिबात पटली नाही. त्यांनी अत्यंत स्पष्ट शब्दांत या कल्पनेला विरोध करत ते म्हणाले, ' ही अत्यंत अव्यवहार्य अशी योजना आहे. शेतात उभी असलेली पिके फक्त ब्रिटीश सैन्यासाठीच नाहीत. ती भारतातील जनतेसाठीही आहेत, सामान्य शेतक-यांसाठी आहेत. पिके जाळण्याचा कार्यक्रम हाती घेणे म्हणजे लोकांशी लढाई सुरू करणे असा त्याचा अर्थ होईल आणि लोक आपल्याबरोबर न येता उलट सरकारला मदत करतील. वर्तमानपत्रात वाचलेल्या पुस्तकी कार्यक्रमांचा अवलंब करून आपल्याला ही चळवळ चालविता येणार नाही.'
यशवंतरावांचे म्हणणे बरोबर नाही असे काही लोकांना वाटले, पण यशवंतराव ठामपणे म्हणाले, ' मी या विचाराशी कदापी सहमत असणार नाही, आणि त्याचा प्रसार करणार नाही. कारण यामध्ये अंतिमत: लोकलढ्याचे नुकसान आहे अशी माझी खात्री आहे.'
शेतक-याला आपल्या पिकाविषयी किती प्रेम वाटते हे यशवंतरावांना चांगले माहित होते. कारण ते स्वत:एका शेतकरी कुटुंबात जन्मले होते. म्हणूनच पिके जाळण्याच्या कार्यक्रमाला त्यांनी तीव्र विरोध केला.

 
																									
						
					 
																									
						
					 
																									
						
					 
																									
						
					 
																									
						
					 
																									
						
					 
																									
						
					 
																									
						
					 
																									
						
					 
																									
						
					 
																									
						
					 
																									
						
					 
																									
						
					 
																									
						
					 
																									
						
					 
																									
						
					 
																									
						
					 
																									
						
					 
																									
						
					 
																									
						
					 
			 
									 
			