कृष्णाकांठ१६४

पंधरा दिवसांनंतर पुण्याला जेव्हा परत आलो, तेव्हा सातारच्या हकीकती कळू लागल्या. शिरवडे  स्टेशनच्या जळिताच्या खटल्यातील बहुतेक सर्व लोक पकडले गेले होते. श्री. सदशिवराव पेंढारकर आणि त्यांच्या बरोबर असलेले त्यांचे सर्व साथीदार यांना पकडून त्यांच्यावर खटले सुरू झाले होते. या आरोपींमध्ये माझा भाचा बाबूराव कोतवाल हाही होता. जिल्ह्यातील माझ्या गैरहजेरीत श्री. आत्माराम बापू पकडले गेले होते. विशेषत: बाबूराव कोतवाल, श्री. आत्माराम बापू जाधव आणि श्री. बाबूराव काळे मालदणकर यांचा पोलिसांनी अनन्वित छळ केला. त्यांच्या कहाण्या जेव्हा मी ऐकल्या, तेव्हा माझ्या अंगावर काटा उभा राहिला. त्या हकीकती त्यांच्या तोंडूनच मी पुढे ऐकल्या. तो सगळा छळ त्या मंडळींनी सहन केला, तो माझ्यासाठी आणि त्यांच्या राष्ट्रनिष्ठेपोटी. त्यांना प्रमुख प्रश्न विचारला जात असे, की मी कुठे आहे? सुदैवाने त्यांना माहिती नव्हते, की मी कुठे आहे; त्यामुळे ते काही सांगू शकले नाहीत. ज्या तऱ्हेचा छळ होत होता, त्यामुळे मन कितीही बळकट असले, तरी शरीर थकून जाते आणि माणसे बोलायला लागतात. मी कुठे आहे? कोणत्या गावात आहे? याची त्यांनाच माहिती नसल्यामुळे ते बिचारे काय सांगणार? शिरवडे स्टेशनाच्या जळिताच्या खटल्याचा निकाल लागला आणि श्री. सदाशिवराव पेंढारकरांना सात वर्षांपेक्षा जास्त शिक्षा झाली. त्यांच्या साथीदारांना कुणाला चार वर्षे, तर कुणाला तीन वर्षे अशा तऱ्हेच्या शिक्षा ठोठावण्यात आल्या होत्या. इतका छळ झाला किंवा या शिक्षा झाल्या, तरी ही तरुण मंडळी काही दबून गेली नव्हती, असे मला निरोप येत होते.

मी पुणे शहर आणि जिल्ह्यातील ग्रामीण भागातील काही क्षेत्रांत भूमिगत पद्धतीने काम करावे, अशा तऱ्हेने सर्व संपर्क जोडावयाचा प्रयत्न करीत होतो. अशा वेळी एके दिवशी मे महिन्याच्या मध्यात मला फलटणहून निरोप आला, की सौ. वेणूबाईची प्रकृती फार बिघडली असून ती मरणोन्मुख आहे. तो सबंध दिवस आणि रात्र मी काही झोपू शकलो नाही. माझे कर्तव्य काय, याचा मी माझ्या मनाशी विचार करू लागलो. कुटुंबासाठी माझी काही जबाबदारी आहे, की नाही, या एका विचाराने मी अस्वस्थ झालो आणि दुस-या दिवशी रात्री फलटणला जाण्याचा निर्णय केला. रात्री भाड्याची टॅक्सी करून मी फलटणला निघालो. मुंबईहून मी नुकताच जाऊन आलो असल्यामुळे मजजवळ थोडे पैसे होते. रात्री आठला टॅक्सी काढून निघालो, तो ती नीरा स्टेशनजवळ बंद पडली. गाडीमध्ये काही बिघाड झाला होता. पहाट होत आली, तरी ती काही दुरुस्त होईल, असे चिन्ह दिसेना. तेव्हा मी मोठ्या अडचणीत पडलो. काय करावे, समजत नव्हते. सुदैवाने टॅक्सी-ड्रायव्हरच्या खटपटीस यश आले, गाडी सुरू झाली आणि आम्ही पुढे फलटणला निघालो. पंचवीस-तीस मैलांचे जेवढे अंतर होते, तेवढे कापून जवळ जवळ सूर्योदयापूर्वी फलटणच्या घरी जाऊन पोहोचलो. माझा पहिला बेत असा होता, की रात्री घरी जाऊन, वेणूबाईला भेटून, पहाटेसच तेथून परत फिरायचे. परंतु आता ते शक्य नव्हते. मी टॅक्सीवाल्याचे पैसे देऊन  त्याला परत पाठवून दिले आणि मी फलटणमध्येच थांबलो.

मी फलटणला आल्याचा वेणूबाईंच्या प्रकृतीवर चांगला परिणाम झाला. तिच्या मनाचा धीर वाढला. तिचा आजार जसा शारीरिक होता, तसा तो मानसिक पण होता. मी तिला कबूल केले, की आजचा दिवस येथे राहीन व रात्री निघून जाईन. फलटण येथे डॉक्टर बर्वे म्हणून प्रसिद्ध देशभक्त होते. मी त्यांना बोलावून घेतले. मला पाहून त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला. मी त्यांना सगळी परिस्थिती आणि माझी मन:स्थिती सांगितली. मी त्यांना सांगितले,
''कुणा तरी चांगल्या डॉक्टरकडे ही केस सोपवून जावे, म्हणून मी येथे आलो आहे. तुम्ही वेणूबाईची काळजी घ्या.''

त्यांनी कबूल केले आणि तो दिवस मी तेथे थांबलो. माझ्या कल्पनेने मी तेथे आल्याची माहिती फारच थोड्यांना असावी. पण सांगता येत नाही. आजूबाजूच्या घरांतील कोण्या मंडळींनी मला पाहिले असले पाहिजे. कारण दुस-या दिवशी दुपारच्या प्रहरी वेणूबाईची काळजी घेत बसलो असताना फलटण संस्थानच्या पोलिसांनी माझ्या सासुरवाडीच्या घराला वेढा घातला.

माझा धाकटा मेहुणा बाबासाहेब मोरे तेव्हा फलटणमध्येच होता. त्याने मला येऊन सांगितले, की पोलीस आलेत. मी समजून चुकलो, की माझे भूमिगत आयुष्य संपले. मला फक्त आता एवढीच काळजी होती, की माझ्या अटकेचा परिणाम वेणूबाईच्या प्रकृतीवर काय होतो? कारण पोलिसांनी येऊन तिच्या देखतच मला अटक केली. मी तिची समजूत घातली.