ते एका ठिकाणी म्हणतात, ''शिक्षण हे आर्थिक विकासाचे एक साधन आहे.'' शिक्षित माणूस स्वतःभोवती घडणा-या गोष्टी आणि जगामध्ये घडणा-या इतर गोष्टी यांची संगती लावतो. आपल्या जीवनावर याचा काय परिणाम होतो हे तो जाणून घेतो. सामाजिक व आर्थिक परिस्थितीमुळे खेड्यातील व शहरातील माणूस यांच्यात जे कृत्रिम अंतर आहे ते शिक्षणाने कमी झाले पाहिजे. महाराष्ट्रात शैक्षणिक विस्ताराबरोबर गुणवत्ता ही क्रमाक्रमाने वाढू लागली. या सर्व प्रक्रियेतून सुशिक्षित बेकारांचा एक प्रचंड वर्ग तयार झाला. आज ६.६५ कोटी बेकार आहेत. त्यांपैकी २१ लाख पदवीधर बेकार आहेत. यासंबंधी बोलताना यशवंतरावजी म्हणाजे, ''अडाणी बेकारापेक्षा विचार करणारा सुशिक्षित बेकार केव्हाही चांगला.'' जीवनाच्या सर्वच क्षेत्रांत महाराष्ट्रातील तरुण आघाडीवर आहे. तो नोकरीबरोबर विविध उद्योगांत रममाण होतो आहे. शहरी तरुणाबरोबर ग्रामीण तरुणही जीवनाची निरनिराळी क्षेत्रे खंबीरपणे पादाक्रांत करीत आहे. शहराबरोबर खेडीही सतत नवजागरणाच्या दिशेने वाटचाल करीत आहेत. आपल्या हक्काची त्यांना जाणीव आहे. सर्व समाजाला बरोबर घेऊन चालण्याशिवाय नवा महाराष्ट्र निर्माण होणार नाही. असे ते म्हणत. आज ग्रामीण महाराष्ट्राचे जे नवे स्वरूप आपल्याला पाहायला मिळते ते यशवंतरावजींच्या समर्थ नेतृत्वामुळेच. यशवंतरावजींनी जनतेचे प्रबोधन केले. नवा विचार अंमलात आणला व सामान्य माणसात आत्मविश्वास निर्माण केला. म्हणनूच ते ग्रामीण परिवर्तनाचे नेते होऊ शकतात. त्यांच्या नेतृत्वाला लोकमान्यता होती, कारण त्यांचे नेतृत्व अनुभवाच्या मुशीतून तावून सुलाखून निघालेले होते.
यशवंतरावजींनी ३६५ पृष्ठांचे 'कृष्णाकाठ' हे आत्मचरित्र लिहिले. अजून त्याचे दोन भाग लिहावयाचे राहून गेले आहेत. पण जे आत्मचरित्र प्रकाशित झाले ते मराठी सारस्वताचे अमोल लेणे आहे. या आत्मचरित्रात १९४६ पर्यंतचा भाग आलेला आहे. विशेषतः त्यांना शिक्षण घेत असताना ज्या अडचणी आल्या त्या मुळातूनच वाचण्यासारख्या आहेत. शिक्षण घेत असताना यशवंतरावजींच्या मनाला ज्या जखमा झाल्या. त्याचे विदारक चित्रण 'कृष्णाकाठ' मध्ये वाचावयास मिळते. मॅट्रिकला असताना त्यांना संस्कृत शिकावेसे वाटले. कालिदासाचे 'रघुवंश' आणि संस्कृत नाटके शास्त्रीबुवांच्या सहाय्याने वाचावी लागत असत. म्हणून त्यांनी संस्कृत शिकण्याची इच्छा व्यक्त केली. तेव्हा शास्त्रीबुवा उद्गारले, ''संस्कृत देववाणी आहे. ब्राह्मणेतर विद्यार्थ्यांना मी ती शिकविणार नाही.'' शास्त्रीबुवांच्या उद्गाराने यशवंतरावजींच्या काळजाला कायमची जखम झाली. या संदर्भात मला दया पवार यांच्या कवितेच्या काही ओळी आठवतात. ते म्हणतात,
कशाला झाली पुस्तकाची ओळख
बरा ओहोळाचा गोठा 
गावची गुरे वळली असती
असल्या इंगळ्या डसल्या नसत्या.
शिक्षणामुळे माणसाच्या मनाला ज्या जाणिवा होतात त्याचेच हे प्रगटीकरण आहे.  यशवंतरावजींच्या आयुष्यातील दुसरा एक महत्त्वाचा प्रसंग त्यांनी आपल्या आत्मचरित्रात सांगितला आहे.  यशवंतरावजींचे जिगरी दोस्त स्व. राघूअण्णा लिमये हे होते.  ते आणि यशवंतराव एकदा ग्रामीण भागात दौ-यावर गेले.  या दौ-यात त्यांचा एका ब्राह्मणाच्या घरी मुक्काम पडला.  जेवणाच्या वेळी राघूअण्णांचे पान आतल्या खोलीत टाकण्यात आले.  आणि यशवंतरावांचे पान बाहेरच्या ओसरीत टाकण्यात आले, सामाजिक विषमतेचा हा कटू अनुभव त्यांनी स्वतः अनुभवला.  हा अनुभव बहुजन समाजाच्या वाट्याला येऊ नये म्हणून त्यांनी महाराष्ट्राच्या कानाकोप-यात शाळा व महाविद्यालये काढली.  यशवंतरावांना अन्यायावर, विषमतेवर व दुहीवर आधारलेला समाज मोडून टाकावयाचा होता.  ते त्यांचे स्वप्न होते.  
१९२० ते १९३० हा काळ भारतीय राजकारणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा काळ होता. कारण १९२० पर्यंतचे या देशातील राजकारण व स्वातंत्र्य चळवळ पांढरपेशापर्यंतच अडकलेली होती. लो. टिळक हे तेल्या-तांबोळ्यांचे पुढारी होते. पण तेही ही चळवळ सर्व सामान्यांपर्यंत नेऊन पोहोचवू शकले नाहीत. १९२० नंतर म्हणजे महात्मा गांधींच्या उदयानंतर काँग्रेसची चळवळ व्यापक बनली. शेतकरी, साळी, माळी, सुतार, धोबी या समाजापर्यंत ही चळवळ जाऊन पोहोचली. यशवंतरावजींनी स्वतःला या राष्ट्रीय प्रवाहात झोकून दिले. महात्मा फुले यांच्या सत्यशोधक चळवळीला या काळात ब्राह्मणेतर चळवळीचे स्वरूप आले होते. एवढेच नाही तर सत्यशोधक चळवळ समाजात प्रबोधन करण्याऐवजी ब्राह्मणद्वेषाचे विषमय वातावरण निर्माण करू लागली होती. यशवंतरावजींचे मोठेपण यात आहे की, त्यांनी या चळवळीत भाग न घेता ते राष्ट्रीय आघाडीत सामील झाले. स्व. केशवराव जेधे व स्व. महर्षी वि. रा. शिंदे यांनी म. गांधींच्या नेतृत्वाखाली समाजसुधारणा सामान्यापर्यंत नेऊन पोहोचविली, एवढेच नाही तर १९३० सालच्या चळवळीत ग्रामीण समाजाचा प्रतिनिधी वर्ग मोठ्या प्रमाणात त्यांच्यामुळेच जेलमध्ये गेला. यशवंतरावजींनी म. गांधी, पंडित नेहरू, सुभाषचंद्र बोस, अबुल कलाम आझाद यांचे नेतृत्व मान्य केले. हे थोर नेते त्या काळात झाल्यामुळे या देशातील सर्व जातिजमाती स्वातंत्र्यलढ्यात सामील झाल्या.

 
																									
						
					 
																									
						
					 
																									
						
					 
																									
						
					 
																									
						
					 
																									
						
					 
																									
						
					 
																									
						
					 
																									
						
					 
																									
						
					 
																									
						
					 
																									
						
					 
																									
						
					 
																									
						
					 
																									
						
					 
																									
						
					 
																									
						
					 
																									
						
					 
																									
						
					 
																									
						
					 
			 
									 
			