चव्हाण अजूनही संरक्षणमंत्री बनण्याचा विचार बदलतील आणि आल्या वाटेनं मुंबईला परततील अशी पटनाईक यांची समजूत असावी! त्यासाठीच तर त्यांनी त्या रात्री काही कल्पना न देता यशवंतरावांना गाठलं.
''संरक्षणमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारून दिल्लीस येण्यास मी राजी नव्हतो.'' असं यशवंतरावांनी पटनाईक यांना सांगितलं आणि मागोमाग असा फटका दिला की पटनाईक मुकाटपणे उठून निघून गेले. यशवंतराव ठामपणे म्हणाले, ''संरक्षणमंत्रीपदाची सूत्रं स्वीकारण्याचा मी निर्धार केला आहे. देशातील आणीबाणीच्या वेळी राष्ट्राकरिता जेवढं जास्तीत जास्त करता येईल तेवढं करण्याचा माझा निर्धार पक्का आहे.'' २१ नोव्हेंबरला यशवंतरावांचा शपथविधी झाला.
बिजू पटनाईक हे ओरिसा राज्याचे मुख्यमंत्री होते परंतु पं. नेहरूंनी, त्यांचे सल्लागार म्हणून नियुक्त केलेले पटनाईक यशवंतरावांच्या शपथविधीनंतरही संरक्षण मंत्रालयाच्या कारभारात हस्तक्षेप करीत राहिले. मी स्वत: खरा संरक्षणमंत्री आहे असा त्यांचा पवित्रा होता. त्या ढंगानेच ते त्या खात्याचे निर्णय करू लागले. केंद्र सरकारनं, संरक्षण खात्याची काही जबाबदारी पटनाईक यांच्याकडे सोपविलेली असल्याबद्दल चव्हाण यांना कधी माहिती दिली नव्हती. पटनाईक हे मात्र स्वत:लाच संरक्षणमंत्री समजू लागल्यानं यशवंतराव अस्वस्थ बनले. पटनाईक यांच्या हस्तक्षेपामुळे त्यांची स्थिती इतकी चमत्कारिक बनली की या गोष्टीचा एकदा सोक्षमोक्ष करायचं ठरवून पंतप्रधानांपर्यंत त्यांनी गाऱ्हाणं पोहोचवलं. ''मुंबईहून आपण मला इथं संरक्षणमंत्री म्हणून बोलावलं, परंतु त्या खात्याचं मंत्रीपद आपण मला पूर्णत्वानं दिलेलं नाही.'' अशी आपली व्यथा पत्रातून स्पष्टपणे सांगितली. त्यानंतर मागोमाग आणखी एक खरमरीत पत्र पाठवून पटनाईक यांचे अवास्तव हस्तक्षेप वाढत असल्याबद्दल प्रत्यक्ष वस्तुस्थितीची कल्पना दिली. तेव्हा मात्र पंडितजींना निर्णय करणं भाग पडलं. त्यांनी चव्हाणांना भेटीला बोलावलं आणि ''संरक्षणमंत्री तुम्हीच आहात, तुम्ही पत्र वगैरे मला पाठवलय हे विसरून जा'' असं सांगून चव्हाणांनी रागानं लिहिलेलं पत्र त्यांनी फाडून टाकलं. संरक्षणमंत्रीपदाच्या नाटकावर अखेर पडदा पडला! दिल्लीला पोचल्यावर प्रारंभीच्या काही महिन्यांत दिल्लीत ज्या घडामोडी झाल्या त्या बेचैनीतून यशवंतराव मुक्त झाले.

 
																									
						
					 
																									
						
					 
																									
						
					 
																									
						
					 
																									
						
					 
																									
						
					 
																									
						
					 
																									
						
					 
																									
						
					 
																									
						
					 
																									
						
					 
																									
						
					 
																									
						
					 
																									
						
					 
																									
						
					 
																									
						
					 
																									
						
					 
																									
						
					 
																									
						
					 
																									
						
					 
			 
									 
			