यशवंतराव चव्हाण (10)

या सुमाराला सातारा जिल्ह्यात राजकीय परिषद घ्यायची आणि तीही कराडला घ्यायची यादृष्टीने हालचाली सुरू झाल्या.  मसूरकरांनी परिषदेची जबाबदारी स्वीकारली.  राघूअण्णा लिमये, डॉ. फाटक, विष्णु मास्तर आदि मंडळी मोठ्या उत्साहाने कामाला लागली.  वर्‍हाडचे माधव श्रीहरी अणे यांना अध्यक्ष म्हणून निमंत्रित करण्यात आले.  ते त्यावेळी राष्ट्रीय काँग्रेसचे हंगामी अध्यक्ष होते.  कोल्हापूरच्या माधवराव बागलांना पण निमंत्रण देण्यात आले होते.  पुण्या-मुंबईहून बडी बडी मंडळी आली होती.  त्यांत सौ. लीलावती मुन्शी यांचा समावेश होता.  ही परिषद खूप गाजली.  बागलांनी आर्थिक स्वरूपाच्या ज्या मागण्या उपसूचनेद्वारे सुचविल्या होत्या त्या मागण्यांनी धमाल उडवून दिली.  त्या शेतकर्‍यांच्या हिताच्या होत्या,  तरीही त्यांना परिषदेत विरोध करण्यात आला.  माधवरावांनी जाहीर अधिवेशनात जोरदार भाषण केले.  उपसूचना लोकांनी टाळ्यांच्या गजरात मान्य केल्या.  राजकीय प्रश्नांसमवेत सामाजिक-आर्थिक कार्यक्रम हाती घेतला नाही तर स्वराज्याच्या चळवळीला अर्थ नाही हे बागलांचे ठाम मत होते.  ते सत्यशोधक आहेत, ब्राह्मण-ब्राह्मणेतर चळवळीला पाठिंबा देणारे आहेत असे टोमणे हितसंबंधियांनी मारले, तरीही बागल आपल्या भूमिकेवर ठाम राहिले.  या परिषदेच्या निमित्ताने यशवंतरावांचा कित्येक कार्यकर्त्यांशी परिचय झाला.  सातारा, वाई-वाळवे, तासगांव या तालुक्यांतील कार्यकर्ते कोण कोण, त्यांनी कायदेभंग चळवळीत काय कामगिरी केली याची माहिती मिळू शकली.  वाईचे किसन वीर, वाळव्याचे आत्माराम पाटील व पांडू मास्तर, गौरीहर सिंहासने आदि भेटलेले कार्यकर्ते नंतर यशवंतरावांचे स्नेही झाले, सहकारी झाले.

महात्मा गांधी १९३१ च्या सप्टेंबरमध्ये गोलमेज परिषदेसाठी लंडनला जायला निघाले तेव्हां वृत्तपत्रांनी त्यांच्या प्रयाणासंबंधीच्या बातम्या रकाने भरभरून छापल्या.  इतर पुढारीही लंडनला गेले होते.  तथापि गोलमेज परिषद अयशस्वी ठरली.  गांधीजी डिसेंबरअखरे मुंबईला परतले.  दरम्यान व्हाईसरॉय आयर्विन जाऊन त्यांचे जागी लॉर्ड विलिंग्डन यांची नियुक्ती झाली होती.  दडपशाहीच्या तंत्रात हे महाशय तरबेज होते.  मुंबईत काँग्रेस कार्यकारिणीची बैठक झाल्यावर गांधीजींनी विलिंग्डन यांच्या भेटीची मागणी केली.  भेटीऐवजी गांधीजींच्या अटकेचा हुकूम देण्यात आला.  ४ जानेवारी रोजी गांधीजींची येरवडा तुरुंगात रवानगी करण्यात आली. सरकारच्या या धोरणाविरुद्ध देशभर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली गेली.  तांबव्याला प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक झाली.  जमलेल्या कार्यकर्त्यांत काशिनाथपंत देशमुख, राघुअण्णा लिमये आदि प्रमुख कार्यकर्ते होते.  जंगल सत्याग्रह संघटित करण्याचे ठरले.  २६ जानेवारीला तालुक्यातील प्रमुख गांवी जाहीर झेंडावंदन करायची जबाबदारी यशवंतरावांनी उचलली.