प्रीतिसंगमावरील या परिसरातच यशवंतरावांवर अंत्यसंस्कार व्हावेत, त्यांची समाधी बांधण्यात यावी याला योगायोग म्हणायचे की दुसरे कांही ! यशवंतरावांची समाधी इतर समाध्यांपेक्षा वेगळी आहे. यशवंतरावांनी रशिया भेटीच्या वेळी टॉलस्टॉयच्या समाधीला भेट दिली होती. त्यांना या समाधीची कल्पना फार आवडली होती. त्याबद्दल त्यांनी १९६४ मध्ये वृत्तपत्रातून लिहिले पण होते. यशवंतरावांच्या निधनानंतर १९८४ मध्ये प्रीतिसंगमावर जी समाधी उभारण्यात आली ती त्यांच्या कल्पनेतील समाधी आहे असे म्हटल्यास चूक होणार नाही. समाधी उघड्यावर आहे. तेथे छायाचित्र नाही की कसली खूण नाही. पादुका नाहीत की पुतळा नाही. दर्शनासाठी सदैव ती खुली आहे. समाधीचे एकूण बांधकाम कलापूर्ण व भक्कम आहे. स्लॅबच्या खाली एक ताम्रमंजूषा ठेवलेली आहे. या ताम्रमंजूषेत यशवंतरावांचे साहित्य, त्यांच्या विषयीचे साहित्य, लेख, मुलाखती, पत्र, फोटो आदि वस्तु ठेवलेल्या आहेत. ज्ञानाचे हे भांडार, सेवा, श्रद्धा, निष्ठा, माणूसकी यांची अनुभूति देणारे आहे.
चव्हाणसाहेबांनी पूर्वी पत्रांतून व्यक्त केलेल्या इच्छेनुसार नगराध्यक्ष पी. डी. पाटील यांनी संगम परिसराचे रूप पार पालटून टाकण्याचा आराखडा तयार करून घेतला. किल्ल्याचा तट व नदी यांच्या दरम्यानची संगमालगतची साडेसात एकर सपाटीची जागा पंतप्रतिनिधीकडून संपादन केली. सभोवार तारेचे कुंपण घालून घेतले आणि बाग तयार करण्याचे काम सुरू केले. तथापि १९७६ च्या पुराने नगरपालिकेने केलेले सारे काम वाहून गेले. त्यानंतर पुन्हा राज्य सरकारकडे सुधारित प्रकल्पाचे आराखडे पाठविले. वर्ष-सव्वा वर्षाचा काळ लोटतो न लोटतो तोच यशवंतरावांचे आकस्मित निधन झाले. त्यांच्या पार्थिव देहावर अंत्यसंस्कार करण्यात आला. तेथे राष्ट्रीय स्मारक उभे करावे, विस्तीर्ण बाग तयार करावी, तिला ''यशवंतराव उद्यान'' असे नांव द्यावे असे ठरविण्यात आले. ''यशवंतराव चव्हाण स्मारक समाधी समिती'' गठन करण्यात आली. या समितीला सह्याद्रि सहकारी साखर कारखान्याने, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानने आर्थिक मदत दिली. समाधीनजीक एक पर्णकुटी बांधण्यात आली. आर्किटेक्ट बेरी यांनी समाधीचे प्लॅनस् करून दिल्यावर अंत्यसंस्काराचे जागी सुंदर समाधी बांधण्यात आली. सभोवार घनदाट वृक्षछाया, कृष्णा-कोयनेचा प्रीतिसंगम यामुळे समाधीस्थान हे देशी-विदेशी पर्यटकांसाठी एक आकर्षक स्थळ बनले.
''यशवंतराव चव्हाण स्मृति सदन'', ''सौ. वेणूताई चव्हाण स्मारक भवन'' ही दोन्ही स्थळेही यशवंतरावांच्या चाहत्यांची, तसेच जिज्ञासूंची, अभ्यासकांची आकर्षणे बनली आहेत. कराड नगरपालिकेने पी. डी. पाटील यांच्या नेतृत्वाखाली यशवंतरावांचे यथार्थ असे स्मारक उभे केले आहे. सांस्कृतिक केंद्राची भव्य वास्तू उभारून त्या वास्तूत विस्तीर्ण ग्रंथालय उभे केले आहे. दोन लाख पुस्तके ठेवता येतील एवढी सोय केलेली आहे. अभ्यासकांसाठी केबिन्स केल्या आहेत. दैनिके, साप्ताहिके, नियतकालिके यासाठी वेगळा विभाग ठेवला आहे. पाठीमागे दोन अथिती रूम्स बांधल्या आहेत. ग्रंथालयात सध्या सत्तर हजाराहून अधिक ग्रंथ आहेत. ग्रंथालयाला जोडून कला-दालन आहे. प्रदर्शन भरविण्यासाठी याचा उपयोग होतो. वरच्या मजल्यावर यशवंतराव स्मृतिसदनाचे भव्य सांस्कृतिक केंद्र (नाट्यगृह) आहे. स्मृति सदनाच्या प्रवेशद्वारी यशवंतरावांचा पूर्णाकृती पुतळा उभा केला आहे. या सांस्कृतिक स्मृतिसदनामुळे कराडच्या तसेच सातारा जिल्ह्याच्या कलाप्रेमींची, ग्रंथप्रेमींची चांगलीच सोय झालेली आहे.