• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

यशवंतराव चव्हाण राजकारण आणि साहित्य - १०

राजकारण आणि पद-सोपान

राष्ट्रसभेच्या राजकारणात तोपर्यंत महात्मा गांधी-पर्व जोमात आले होते.  खेड्यापाड्यांतील निरक्षर व दरिद्री समाजाला जागृत केले, तरच चळवळीची ताकद वाढू शकेल, हे काँग्रेसच्या इतिहासात गांधीजींनीच सर्वप्रथम ओळखले होते आणि त्या दृष्टीने संघटनेची पावले पडू लागली होती.  यशवंतरावांसारख्या तळागाळातून आलेल्या कार्यकर्त्यांच्या स्वप्नांचे आलंबन गांधींची काँग्रेस सहजासहजी ठरू शकली.  त्यांना कुठेतरी आपल्या राजकीय जीवनाची जणू गुरुकिल्लीच गांधींच्या चळवळीत सापडली.  ही चळवळ काँग्रेसची असली, तरी ती आता पांढरपेशांपुरती सीमित नव्हती.  ग्रामीण शेतक-यांचेही प्रश्न ती आता हाती घेऊ लागली होती.  पांढरपेशांना अभिप्रेत असलेले स्वातंत्र्य, म्हणजे पुन्हा पुरोहितशाहीची व पेशवाईची प्रतिष्ठापना, या 'ब्राह्मणेतरी' समीकरणाचा आता वृथा बाऊ करण्याचे कारण नव्हते.  त्या स्वातंत्र्यात आर्थिक व सामाजिक समता आणि न्याय, तसेच दलित-शोषित समाज-घटकांचा अभ्युदय, इत्यादी जोतीरावप्रणीत संकल्पनांचाही अंतर्भाव होण्याची शक्यता निर्माण झाली होती.  

यशवंतराव सर्व सामर्थ्यानिधी या चळवळीत पडले.  गावोगाव हिंडून त्यांनी लोकांच्या चळवळविषयक जिज्ञासेची परिपूर्ती केली.  कार्यकर्त्यांशी व्यक्तिगत संबंध जोडले.  ब्रिटिश सत्तेविषयी जनमानसात वसलेली दहशत निकालात काढणारे कार्यक्रम आखून पार पाडले.  सातारा जिल्ह्यात नव्या दृष्टीच्या तद्दण कार्यकर्त्यांची एक फळीच त्यांच्या प्रयत्नातून निर्माण झाली.  

इथून सुरू झालेली यशवंतरावांच्या नेतृत्वाची वाटचाल थेट त्यांच्या मृत्यूपर्यंत सुरू होती.  त्यात जशी त्यांच्या नेतृत्वाने यशाची चढती कमान उभी केली, तशीच काही वेळा राजकीय आडाखे चुकल्यामुळे अपयशाची खोल कासळणही अनुभवली; पण त्यांचा गंभीर धीरोदात्तपणा त्यांना कधीच सोडून गेला नाही.  व्यक्तिगत आकांक्षा - मग ती सत्तेची असो, की मत्तेची, ही त्यांच्या राजकीय जीवनामागील प्रेरणा कधीच नसल्यामुळे राजकीय यशाखातर जनतेने डोक्यावर घेऊन दिलेली दाद पाहून ते जसे हुरळून उन्मत्त झाले नाहीत, त्याचप्रमाणे प्रसंगवशात राजकीय विजनवासात एकाकी पडण्याची पाळी आली, तेव्हा व्यक्तिगत हताशपणाने ग्रस्त होऊन आततायी आकांत करण्याच्या फंदात ते पडले नाहीत.  राजकीय यश आणि अपयश त्यांनी सारख्याच समाधानतेने पचवले.

१९४६ च्या निवडणुकीत ते स्वतः निवडून आले, तेव्हा मुख्यमंत्री बाळासाहेब खेर यांनी त्यांना ससदीय सचिव (पार्लमेंटरी सेक्रेटरी) नेमायचे ठरवले.  त्या वेळी प्रभार घेण्यासाठी यशवंतराव सचिवालयात गेले असता मुख्यमंत्र्यांकडे कसलीशी बैठक सुरू होती.  तेवढ्या वेळात मोरारजी देसाई यांना भेटून घ्यावे, म्हणून ते त्यांच्या कक्षात गेले, तर देसाईंनी त्यांना आपल्याच गृहखात्यात संसदीय सचिव होण्याची गळ घातली.  त्यांनीच परस्पर मुख्यमंत्र्यांना तसे कळवून टाकले.  चव्हाणांच्या नेतृत्वाच्या उभारणीतील हा एक यदृच्छेचा क्षण म्हणता येईल.  त्या वेळी जर त्यांची खेरांशी आधी भेट झाली असती, तर चव्हाणांच्या राजकीय वाटचालीचे रूळ बदलून त्यांची गाडी अगदीच निराळ्या दिशेने गेली असती.  मोरारजी आणि चव्हाण यांच्यातले साहचर्य चव्हाणांच्या नेतृत्वाच्या जडणघडणीच्या दृष्टीने निर्णायक महत्त्वाचे ठरले, याबद्दल शंकेला जागा नाही.  राज्यकारभाराचे बारकावे, कार्यक्षमता, कामाचा उरक, निर्णय घेण्यातील तत्परता वगैरे गुणांचा संस्कार मोरारजींनीच गृहखात्याच्या संदर्भात यशवंतरावांवर केला आणि तो त्यांना जन्मभर उपयुक्त ठरला.