• 001_Krishnakath.jpg
 • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
 • 003_Shabdhanche.jpg
 • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
 • 005_Saheb_14.jpg
 • 006_Yashodhan_76.jpg
 • 007_Yashodharshan.jpg
 • 008_Yashwant-Chintanik.jpg
 • 009_Kartrutva.jpg
 • 010_Maulik-Vichar.jpg
 • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
 • 012_Sahyadricheware.jpg
 • 013_Runanubandh.jpg
 • 014_Bhumika.jpg
 • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
 • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
 • Debacle-to-Revival-1.jpg
 • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
 • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
 • sing_3.jpg

यशवंतराव चव्हाण आठवण आणि आख्यायिका-पत्र १-२६०१२०१२

पत्र नं. १
दिनांक २६-०१-२०१२

चि. सुप्रिया,
सप्रेम जयभीम.

हे वर्ष यशवंतराव चव्हाणसाहेबांच्या जन्मशताब्दीचं वर्ष.  त्या निमित्तानं मी पाहिलेले, अनुभवलेले आणि ऐकलेले यशवंतराव त्यांच्या नातीला सांगावेत आणि तरुण मुलांशी संवाद साधावा.  चव्हाणसाहेबांची लाखो नातवंडं यानिमित्तानं चव्हाणसाहेबांना समजावून घेतील, ही अपेक्षा.  तुझ्याशी केलेला सुसंवाद म्हटलं तर आजही खाजगी कानगोष्टीसारखा आणि म्हटलं तर सर्वांसाठी खुला.

मी अगदी लहान होतो.  माझा लहानपणचा अवतार काय सांगू तुला ?  आईनं मागून आणलेला लांब बाह्याचा सदरा.  तो पार घोट्यापर्यंत जात असे.  त्यानं चड्डी असली काय, नसली काय, फार फरक पडत नसे.  दोन्ही हातांच्या बाह्यांनी नाक पुसत हिंडायचं.  या मळ्यातनं त्या मळ्यात.  शिव्यांचं तर काय सांगू, अख्ख्या निरगुडीत एकही माणूस नसेल, ज्यानं मला शिव्या दिल्या नव्हत्या !  अवखळपणा, खोडकरपणा आणि नसत्या उठाठेवीही रोज शिव्या खायला लावणार्‍याच.  आकाबाईच्या म्हशी आन् बकाबाईला उठाबशी !  कुणाची तरी कुरापत काढायची, मग शिव्याच शिव्या.  तरी बरं दोनच कान होते.  ते दोन्ही इतक्यांदा उपटले गेलेत, की जे उरलेत ते आयुष्यभर साथ आहेत याचंच आश्चर्य.  तुला सांगतो, निरगुडी हे माझं गाव.  फलटणच्या संस्थान काळात फलटणला भुईपाटानं पाणी पुरवणारं बागायती गाव.  तीन आळ्यांमध्ये वाटल्यालं.  सारं गाव सस्त्यांचंच.  वरची आळी म्हणजे मानसिंग सस्त्यांची आळी.  बहुतेकदा तेच सरपंच असायचे.  मधली आळी किसना पाटलांची आणि खालची आळी म्हणजे रावसाहेब धन्यांची.  पांढरीवरली वस्ती वेगळी.  रावसाहेब धनी म्हणजे गावचे कारभारी.  चिरेबंदी, दुमजली, चौसोपी, भलामोठा वाडा म्हणजे धन्यांची शान. सगळ्या गावात त्यांचा मोठा मान.  मैंदाळ नैतिक धाक, सार्‍या गावाला.  वाड्याच्या म्होरं प्रचंड मोठं मैदान.  मैदानात सारी गावची पोरं खेळायची.  वाड्याच्या बाजूला राखणीला नेमलेला कैकाडवाडा, रामुसवाडा, मांगवाडा.  वाड्याच्या भोवताली तटबंदीसाठी उभा.  वाड्याची भावकी मोठी.  त्यानं गावात त्यांचा दबदबा.  रावसाहेब धनी आणि त्यांच्या थोरला मुलगा रामभाऊ हे डाव्या विचाराचे कम्युनिस्ट. पाटलाचा वाडा गावात आहे, गाव पाटलाच्या वाड्यात नाही, हे पाटलानं ध्यान्यात ठेवावं आणि गावानं पाटलाचा आब म्हणजे आपला आब आहे असं मानावं, असं कायबाय ते म्हणत असत.  रामभाऊला त्यानं मॅट्रिकपर्यंत शिकवलं होतं.  आमच्या गावात मॅट्रिकएवढं शिकल्यालं कुणीच नव्हतं.  त्यामुळे रामभाऊ सार्‍या गावचे कारभारी.

पाटलाच्या वाड्याच्या पाठीमागे नरसिंग सस्ते गुरुजींचा वाडा. आता तू म्हणशील ते वाडापुराण कशाला लावलंय ?  ते यासाठी, की आळ्या एकाएका पार्टीला वाटल्याल्या होत्या.  वरची आळी, मधली आळी काँग्रेस पार्टीची.  त्यांची भावकी वेगळी.  खालची आळी पांढरी, सारी मागासवर्गीय मंडळी, रामभाऊ सस्त्यांबरोबर लाल बावटंवाल्यांची. आता माझ्यासारख्या पोरास्नी काय ?  पक्ष काय आन् पार्टी काय ?  गर्दी जमली की हुंदडायचं आन् दंगामस्ती करायची.  त्यावेळी प्रभातफेर्‍या आणि संध्याकाळी प्रचारफेर्‍या निघत असायच्या.  प्रभातफेरी निघाली की, सर्वांत पुढं बैलजोडी औताला जुपल्यावानी.  खांद्यावर औतं, अर्धा खोचा खोचून शेतकरी औतामागं उभा.  अंगात पांढरी पैरण, डोक्यावर गांधी टोपी, पायात करकरीत वहाणा, असा समजवलेला शेतकरी.  बैलांचंही तसंच.  तुला झुली म्हाईती आहेत ?  फार छान असतात.  मखमली, मखरावर वेलबुट्ट्या, कशिदा काढलेल्या.  मध्ये मध्ये महिरपी काचा, काचांचे गोल चौकोनी तुकडे, फार सुंदररीत्या गुंफलेल्या असतात.  चारी बाजूंनी छान गोंडे असतात.  रंगीबेरंगी गोंड्यांनी सजलेल्या या झुली बैलाच्या पाठीवर घातलेल्या असायच्या.  कपाळालाही फार सुरेख बाशिंगं असायची. बैलांची शिंगं तासून रंगवलेली.  शिंगाला गोंड्यांच्या शेंब्या.  दोन्ही पांढरीशुभ्र टोकदार शिंगाची खिल्लारी जोडी.  अंगावर नजर ठरायची नाही असं पाणी.  बेंदराला सजवावं तशी सजवलेली.  काय सांगू तुला, हे बैल बघताना फार धमाल यायची.  बिशाद नसायची कुणाची त्यांच्यापुढे जायची.  या नटलेल्या बैलांच्या पुढे डफलं, ताशा, पिपाणी, हलगी वाजायची.  बैलांच्या मागं पोरींची, पोरांची रांग.  सारी शाळेतली.  त्याच्यामागं चारदोन बाया गावच्या पुढारणी. मग बाकी सारी मोठी माणसं.  म्हातारे-कोतारे- तरणे सार्‍यांच्या हातात तिरंगी झेंडे.  आमच्या या प्रभातफेरीत सारेच मोठ्यामोठ्यानं घोषणा द्यायचे.  आम्ही सारी पोरं घोळ्यानं सारी एका दमात म्हणायचो 'जय'.  मग 'भारतमाता की जय, महात्मा गांधी की जय, पंडित जवाहरलाल नेहरू की जय'.  मग यायचं 'यशवंतराव चव्हाणांचा', आमचा कोरसा म्हणायचा, 'विजय असो'.  'यशवंतराव चव्हाण आगे बढो, हम तुम्हारे साथ है ।'  यातला प्रत्येक जय, प्रत्येक विजय आम्ही सारे बेंबीच्या देठापासून ओरडायचो.  त्यात रांग मोडली की मोठा माणूस बसायच्या जागेला रट्टा द्यायचा.  'रांग मोडायची नाय, रांग मोडायची नाय.'  असं दमात घ्यायचा.  घोषणा पुढं सुरू व्हायच्या.  अगं, एक गंमत फार भारी.  आमची प्रभातफेरी जेव्हा बोळाबोळातनं जायची, आम्ही 'जय' म्हणलो की, कुत्री भुंकत अंगावर यायची.  बोळकांडं इतकी बारीक, समोरून कुत्री घुसली तर सारी परवड व्हायची.  त्या बोळातनी पायातच गटारं असायची.  'जय' म्हणता म्हणता पोरींच्या अंगावर चिखल कसा जाईल, अशा बेतानं मुद्दाम पाय घाण पाण्यात आपटायचा.  पाण्याची चिपळी पोरींच्या अंगावर उडाली की, फिदीफिदी दात काढायचे.  मग पोरींनी 'किरड्या, मुडद्या, दिसंना व्हय रं तुला' म्हणून शिव्या दिल्या, तरी दुर्लक्ष करायचं आन् चालू लागायचं.  मोठी माणसं पुढं रेटायची.  अखंड बोळातून आमचे फेरीचं काम चालूच असायचं.