पुन्हा शरदराव यांनी तुम्हांला कितीही निवडून आणायंच ठरविलं तरी ते संपूर्ण त्यांच्या हातचं नाही. विरोधी पक्ष तुम्हांला मदत करील. सामान्य शेतकरी समाज तुम्हांला मदत करील. शरदराव सगळं काही करतील परंतु आपल्याच कुठल्याही काँग्रेस नेत्यांनी ठरविल्यावर तुमच्यासोबत राहूनही ते बरोबर आतून तुम्हांला पाडतील. आम्ही फार पाहतो. रोज अनुभवतो. तुमचे वडील वारल्यावर साधा मृत्यूचा दाखला दोन महिने तुम्हांला मिळाला नाही. तुम्हांला खूनखराबीची भाषा करून खूप त्रास दिला. तुम्ही तर लोकप्रिय कवी होता. काय कुणाचं बिघडवलेलं होतं. मी स्वत: खूप संपर्क साधून तेव्हा तुमच्या पाठीशी होतो. तुमच्या परिसरातल्या नेत्यांना निक्षून सांगूनही तुमच्याविषयी विशेष अशी आस्था कोणी दाखविली नव्हती. फक्त तोंडी होकार द्यायचे. मी खूप बारकाईनं पाहिलं. वसंतदाद, शरदराव आम्ही तुमच्या पाठीशी नसतो तर काय झालं असतं? तुमची त्यांना ओळख होऊच शकत नाही.
अगोदरच तुमची आर्थिक स्थिती नाजूक, कौटुंबिक प्रश्न गुंतागुंतीचे. पुन्हा त्यात तुम्ही आजही फार भावनाशील राहून मनाला लावून घेता. तुम्ही घरच्यांसाठी किती उभारलेलं असलं, प्रेम दिलेलं असलं तरी एखाद्या दिवशी ते तुम्ही तुमच्या स्वार्थासाठी, मोठेपणासाठी करता असंही म्हणतील व तुमच्या त्यागाचं विस्मरण होईल. हा निवडणुकीचा छंद फार वाईट आहे. हा छंद वेडा व कठीण आहे. तो तुमचा नाही एवढंच आज तरी मला ठाऊक आहे. मी फार जवळून तुमच्यामध्ये गुंतून आहे. निदान आज तरी हे संपूर्ण टाळावं. शरदरावांशी शक्य झाल्यास मी बोलेन. पोटापाण्याचं आधी व्यवस्थित झालं पाहिजे. या बाकीच्या गोष्टी नंतर.” यशवंतराव तेव्हा असं बरंच काही बोलले. शरदरावांची खूप नाराजी पत्करून मी नकार कळविला.
प्रत्येक मनोमोकळ्या भेटीत, चर्चेत मला यशवंतरावांच्या स्वभावातलं नवीन रूप दिसायचं. त्यांचे राजकारणातले खूप उंचीवरचे ऐश्वर्यसंपन्न दिवस व गर्दी मी पाहिली. ज्यांच्यावर आयुष्यभराचे असाधारण उपकार केले तेही फिरकत नाहीत असे माणसांशिवायचे, त्यांच्यावर घनाघाती खोटे आरोप करणारे, न समजून घेणारे वैफल्यग्रस्त वाळवंटातले दिवस मी शेवटी जवळून पाहिले. महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य माणसांचं निस्सीम प्रेम व त्यांच्या विचारांवरली श्रद्धा घेऊन पुढे जाणारी सर्व क्षेत्रांतली मोठी माणसं पाहिली. ती आजही यशवंतरावांना दैवत मानतात. अकारणी कधी वृत्तपत्रांनी, राजकारण्यांनी, साहित्यिकांनी त्यांना सामान्य पातळीवरूनही शेवटी वैताग दिला व आजही तेच लोक त्यांच्या मृत्यूनंतरच्या कोरड्या महाराष्ट्रात राजकराण, समाजकारण, साहित्य-कला-संस्कृती, सभ्यपणा व माणूसपण याच्यासंबंधी लिहितांना ओतप्रोत भरभरून लिहिताहेत. पण यशवंतरावांसारखा इतका नम्र, जाणता, सुसंस्कृत, सर्व क्षेत्रांतली जाण असलेला नेता कित्येक वर्षांत झालेला नाही. त्यांच्या सर्वज्ञपणाची, जाणतेपणाची, सुज्ञपणानं सर्वांना घेऊन केलेल्या राजकारणाची आज तीव्र आठवण ठायी ठायी येते. माणूस कितीही मोठा असला तरी कुठेतरी नकळत चुका होणार किंवा गैरसमजानं लोक त चुकीचं आहे असं म्हणणार. यशवंतरावांनी आपल्या आयुष्यात एक-दोन चुका केल्या. चुका झाल्या तरी त्याचे दुष्परिणामही भोगले पाहिजेत त्यात चुकीचं काय, असं त्यांच्या खास जवळच्या माणसांजवळ बोलल्याचं, नम्रपणानं ते कबूल केल्याचं मला माहीत आहे. पुष्कळदा त्यांच्यावरल्या नितांत प्रेमापोटी मी राजकारणी पवित्रे समजत नसल्यानं पत्र वगैरे लिहून टाकायचो. त्यात मनमोकळेपणी स्थिती कळवायचो. पण माझी मतंसुद्धा सांगायचो. हे बरोबर नव्हतं असं नंतर माझ्या लक्षात यायचं किंवा इतर मंडळी मला नंतर त्याबद्दल शिव्या देऊ गाढव म्हणत. यशवतंरावांना इतर राजकारण्यांसारखा माझ्या हा उपद्रवाचा कधी राग आला नाही. उलट पुष्कळदा कळविलेल्या काही राजकीय घटनांची मी केलेली मल्लीनाथी त्यांनी गंभीरपणानं घेतली. राजकीय जाणते लोक सहसा पत्रातून लेखी त्यासंबंधी लिहीत नसतात. ते मला क्वचित तसंही संदर्भासह लिहायचे.
यशवंतरावांनी उपपंतप्रधानपद राजकीय जाणकार मित्रांच्या, सल्लागार कार्यकर्त्यांच्या आग्रहानं स्वीकारलं होतं. जे काय गणित त्या वेळी मांडलं गेलं ते यशस्वी होणार हे गृहीत धरूनच पुढच्या दृष्टीनं केलेलं होतं. मी महाराष्ट्राभर सर्व क्षेत्रांतल्या लोकांमध्ये विशेषत: बड्या लोकांमध्ये जवळून हिंडत होतो, याचा गोषवारा करून यशवंतरावांना उपपंतप्रधान असताना वाईट अशा राजकीय स्थितीचं व त्याच्या भवितव्याचं आपुलकीनं पत्र लिहिलं. हे फार काळ टिकणार नाही परंतु तुमच्या भवितव्याच्या दृष्टीनं आणखीनच वाईट आहे असं काहीतरी सविस्तर मी लिहिलेलं होतं. यासंबंधी खूप काही मला समक्ष बोलायचं आहे असंही लिहिलं होतं.