साहित्य व समाज
साहित्य कोणत्या ही रंगाचे असले तरी चालेल, पण आजूबाजूच्या परिस्थितीचा डोळसपणे अभ्यात करून, समाजात सर्व थरांत निर्माण झालेल्या अस्वस्थतेची जाणीव असणारे समाजचिंतन त्यात असले पाहिजे. आचार्य विनोबा भावे यांनी एकदा म्हटले होते, की लोकशाही हे प्रज्ञेचे राज्य असते. ही प्रज्ञा समाजाभिमुख असली पाहिजे. तरच ती समाजाचे परिवर्तन घडवून आणील, त्याला मार्गदर्शन करीत राहील. बुध्दीची कुवत वाढविणे, मने व्यापक करणे, जगातील नव्या प्रवाहांची समीक्षा करणे, स्वत:च्या संस्कृतीचा व परंपरेचा बुध्दिनिष्ठ अभ्यास करून, नव्या परिस्थितीला सुसंगत अशा मूलभूत परिवर्तनासाठी जनमानसाला तयार करणे ही पुढच्या पिढीतील चिंतनशील साहित्याची उद्दिष्टे असू शकतात.