यशोदर्शन-१०

१४. भेट –

निवडणुकीचा आदला दिवस होता तो ! सकाळीच काही कमासाठी मी ‘पाटण कॉलनीकडे’ चाललो होतो. पाटण कॉलनीत वळलो अन्  पुढे निघालो. श्री. यशवंतरानजी त्याच रस्त्याने प्रचार करीत चालेले होते.
वाटेतच त्यांचे प्रतिस्पर्धी श्री. केशवराव पवार यांचे घर होते. मनातील सा-या शत्रुभावना काढून श्री. यशवंतराव त्यांचे घरी निघाले. मनमोकळेपणाने ते जात होते. माझे मन कोणत्या तरी उदात्त विचारांनी भरून गेले. सारे तात्विक व राजकिय मतभेद विसरून जाऊन ते पुढे निघाले होते. आपला प्रतिस्पर्धी या नात्याने त्यांनी त्यावेळी त्याना ओळखले नाही, तर आपल्या कराड गावातील एक बांधव या नात्याने, ते त्यांच्याकडे निघाले होते. रस्त्यावरील सारी जनता – सामान्य तशीच सुशिक्षित ही – स्तिमित होऊन तो प्रसंग पाहण्यासाठी उभे होते. एवढे उच्च व उदात्त विचार त्यांनी पूर्वी पाहिलेले नव्हते. पुराणांतरी प्रसंगांत अगर कथात त्यांनी ते कदाचित वाचले असावेत पण सुधारलेल्या युगाप्रमाणे त्यावर विश्वासा ठेवण्याची त्यांची तयारी नव्हती. श्री. यशवंतरावजीनी आज सगळ्याना धडा घालून दिला होता. देशोन्नतीचे गमक जे सहकार्य त्याचे प्रात्याक्षिक, महान प्रात्याक्षिक करुन दाखवित होते. तेथे उभ्या राहिलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या मनात विविध विचार येऊन गेले. पण दर विचारासारखा त्यांचा श्री. यशवंतरावजींच्याबद्दलचा सादर प्रतिगुणित होत होता, सहकार्याची त्यांना जाणीव होत होती, विश्वबंधुत्वाची – ख-याखु-या विश्वबंधुत्वाची त्यांना ओळख पटत होती आणि तसेच श्री. यशवंतरावजींच्या उदार मनाविषयीची विशाल अंत:करणाविषयीची व मोठेपणाविषयीची त्यांची खात्री पक्की झाली होती.
श्री. यशवंतरावजी घराजवळ पोहोचले, तेवढ्यात श्री. पवार बाहेर आले. मोठ्या सहानुभूतीने, निशंक मनाने दोघानीही हस्तांदोलन केले. दोन शब्द एकमेकाशी बोलले, खरीखुरी भारतीय संस्कृती तेथे प्रकटली होती. भारतीय संस्कृतीचे ते महान प्रतिक होते. प्रतिस्पर्ध्याशीसुध्दा खिलाडूवृत्तीने वागण्याची परंपरा ते चालवित होते. ज्या संस्क़ृतीत दिवसभर युध्द करुन सायंकाळी पांडव-कौरवांच्या – भीष्माच्यार्याच्या निवासस्थानी जात त्यच्याशी मनमोकळेपणाने बोलत, त्या संस्कृतीच्या आधारानेच आख्याड्यात उतरल्याबरोबर दोन पहेलवान एकमेकांशी हस्तांदोलन करातात. दुस-या दिवशीच्या निवडणुकीच्या सामन्यातील जणू ती आदल्या दिवशी दिलेली सलामी होती असे मला वाटले ज्या ज्या  वेळी गावातील एकादा प्रसंग चांगला तसाच वाईटही मला दिसतो त्यावेळी मला त्या प्रसंगाची तीव्रतेने आठवण होते व श्री. यशवंतरावजींच्याबद्दलचा माझा आदर शतगुणित होतो.

- संग्राहक -  अनिल म. खंडकर (१० अ)

१५. यशवंतरावांनी पोलिसास दिलेला गुंगारा

१९४२ साली श्री. यशवंतराव भूमिगत होते. त्या वेळची गोष्ट. पोलिसखात्याच्या ‘पाहिजे’ च्या यादीत यशवंतरावांचे नावप अग्रेसर होते. पोलिससारखे त्यांचा सुगावा काढण्याच्या यत्नात होते. अशावेळी एके रात्री यशवंतराव पुण्याहून कराडला निघाले होते. रात्री साडे दहाच्या सुमारास ते पुणे स्टेशनवर इंटरच्या डब्यात चढले,. गाडी सुटण्याच्या वेळी एक गृहस्थ त्यांच्या डब्याजवळ येऊन त्यांना पाहून गेला. गाडी सुरु झाली. ती पॅसेंजर गाडी असल्याने प्रत्येक स्टेशनवर उभी राही. स्टेशनवरस गाडी उभी राहिली की तो गृहस्थ यशवंतरावांच्य़ा डब्याजवळ येई आणि त्यांना पाहून जाई. ४-५ स्टेशने असे झाल्यानंतर यशवंतरावाना त्या गृहस्थाचा संशय आला. तो गृहस्थ माझी टेहाळणी करत असावा असे त्यांना वाटले. तो गृहस्थ यशवंतरावांच्या डब्याच्या २-३ डबे पुढे असलेल्या सेकंड क्लासमध्ये बसलेला होता. ता सी.आय.डी. ऑफिसर असावा हे त्याना ओळखण्यास अडचण पडली नाही. पण हे कळूनही वळत नव्हते अशी त्यांची स्थिती होती. अशा अगतिक अवस्थेत असताना गाडी नारी स्टेशनावर येऊन थांबली. यशवंतराव खाली फलाटावर उतरले  आणि फलाटावर इकडे तिकडे येरझा-या घालू लागले. तो गृहस्थ ही सेकंड क्लासच्या डब्यातून फलाटावर आला आणि यशवंतरावांच्या अनुरोधाने तोही इकडे तिकडे करू लागला. त्यांची नजर यशवंतरावजींच्या हालचालीकडे होती हे यशवंतराव जाणून होते आणि यशवंतरावाची दृष्टी त्याच्या हालचालीकडे होती. ही गोष्ट मात्र त्या अधिका-याच्या लक्षात आली नसावी. येरझा-या घालीत असताना त्या आधिका-याला कसा गुंगारा देता येईल. याबाबतचे विचार यशवंतरावांच्या डोक्यात घोळत होते. आणि या अधिका-याच्या तावडीतून निसटणे जरुर आहे. असा त्यांनी मनाशी निर्णय घेताला. गाडी सुटण्याची शीट झाली. सारे उतारू डब्यात चढले. यशवंतरावही त्यांच्या डब्याजवळ गेले. तो पोलिस अधिकारीही त्याच्या डब्याजवळ गेला मात्र तेथून त्याची नजर यशवंतरावांकडे सारखी लागली होती. गाडी सुटली यशवंतराव आपल्या डब्यात चढले. ते डब्यात चढलेले नक्की पाहून तो अधिकारीही आपल्या डब्यात चढल्याची खात्री करून घेतली आणि तात्काळ आपली छोटी बॅग हातात घेऊन चालत्या गाडीतून फलाटावर उडी घेतली.