सह्याद्रीचे वारे - १५५

साहित्यिकांची जबाबदारी

या साहित्य सम्मेलनाच्या उद्घाटनाचें मला निमंत्रण देऊन आपण माझा एक प्रकारचा सन्मानच केला आहे असें मी समजतों. विदर्भ साहित्य सम्मेलनाला हजर राहण्याचा गेल्या तीन वर्षांतला हा माझा दुसरा प्रसंग आहे. त्यामुळें या सन्मानाचें महत्त्व मी अधिकच मानतों. विशेषतः आज मराठी भाषेच्या इतिहासामध्यें एक महत्त्वाची क्रांतिकारक घटना घडत असतांना आपण माझा हा सन्मान केला. राजकीय कार्यकर्त्यांनी साहित्याशीं किती संबंध ठेवावा किंवा साहित्य संमेलनामध्यें अगदीं साहित्यिक कांटेकोर भाषा बोलून किती लुडबुड करावी असा कोणीं वादाचा प्रश्न उपस्थित केला तर त्यांनीं अशी लुडबुड करूं नये याच पक्षाचा मी पुरस्कर्ता राहीन. असें असतांनाहि आपण मला जें निमंत्रण दिलें तें स्वीकारण्यांत माझा एक उद्देश होता. या संमेलनाच्या निमित्तानें विदर्भांतील साहित्यिकांसमोर आणि त्यांच्या मार्फत विदर्भांतील जनतेसमोर कांहीं महत्त्वाचे प्रश्न मीं या व्यासपीठावरून मांडले तर अधिक रेटून बोलण्याची एक संधि मिळेल असें वाटल्यामुळेंच मीं हें निमंत्रण स्वीकारलें.

या साहित्य संमेलनाचें जें वैशिष्ट्य आहे तें माझ्या मतें अधिक महत्त्वाचें आहे. खेड्यामध्यें राजकीय परिषदा भरविण्याची परंपरा फार जुनी आहे. परंतु खेड्यामध्यें साहित्यसंमेलन घेण्याची प्रथा विदर्भ साहित्य संघानें माझ्या कल्पनेप्रमाणें यापूर्वीच पाडलेली असून साहित्यिकांना लोकाभिमुख करण्याची ही नवी परंपरा प्रत्यक्षांत अंमलांत आणण्याचा प्रयत्न केला आहे. त्याबद्दल विदर्भ साहित्य संघाचें मी अभिनंदन करतों, आणि इतर साहित्य संघांना अनुकरणीय असा एक नवीन पायंडा घालून दिल्याबद्दल त्याला धन्यवाद देतों.

या साहित्य सम्मेलनाचें दुसरें वैशिष्ट्य म्हणजे या सम्मेलनाचे नियोजित अध्यक्ष श्री. शेंडे यांची निवड हें होय. ते हरिजन आहेत म्हणून एक नवीन पायंडा पडला एवढ्याच अर्थांनें मी हें म्हणत नाहीं. कारण हरिजन म्हणून कुणाला तरी साहित्यसंघाचे अध्यक्ष करावें अशा मताचा मी नाहीं. इतर क्षेत्रांतील महत्त्वाच्या जागा जशा गुणांच्या कसोटीवर दिल्या जातात तशाच साहित्यक्षेत्रांतील मानाच्या जागाहि साहित्यगुणांच्या निकषावरच दिल्या जाव्यात या तत्त्वावर माझा विश्वास आहे. परंतु श्री. शेंडे यांची अध्यक्षपदी निवड करून, या निकषावर पात्र ठरलेला एक हरिजन अध्यक्ष होऊं शकतो येथपर्यंत आमचें साहित्य लोकाभिमुख झालें आहे याची पावती आपण महाराष्ट्र जनतेला दिली आहे. म्हणून मला या साहित्य सम्मेलनाच्या अध्यक्षपदाच्या निवडीचें एवढें महत्त्व वाटतें. श्री. शेंडे यांचें मी मनःपूर्वक अभिनंदन करतों आणि हा पायंडा पाडण्याची कामगिरी विदर्भ साहित्य संघानें केली त्याबद्दल विदर्भ साहित्य संघाचें आणि विदर्भांतील साहित्यिकांचेंहि अभिनंदन करतों.

मी सुरुवातीलाच म्हणालों कीं, मराठी भाषेच्या जीवनामध्यें आज एक महत्त्वाची गोष्ट घडत आहे. आणि ती म्हणजे नवीन होऊं घातलेल्या मराठी राज्याची रचना. कारण ती जशी राजकारणांतील किंवा मराठी जनतेच्या जीवनांतील महत्त्वाची गोष्ट आहे, तशीच मराठी भाषेच्या दृष्टिनेंहि ती महत्त्वाची गोष्ट आहे असें मी मानतों. भाषिक राज्याच्या मागणीच्या पाठीमागें एकभाषिक जनतेच्या सांस्कृतिक विकासाचा जसा हेतु आहे, तशीच त्या राज्याच्या भाषेला मानाच्या महत्पदीं बसविण्याचीहि कल्पना आहे. मराठी भाषिक राज्याचें माझ्या मनांत चित्र काढण्याचा जेव्हां मी प्रयत्न करतों तेव्हां मराठी जनता राज्यसिंहासनावर येऊन बसली आहे असें चित्र उभें राहण्याऐवजीं या सिंहासनावर मराठी भाषा विराजमान झाली आहे असेंच चित्र माझ्या मनांत चितारलें जातें. मराठी भाषेला हा मानाचा दर्जा प्राप्त करून दिल्यानंतर त्यांतून ज्या जबाबदा-या निर्माण होणार आहेत, ज्या परंपरा निर्माण होणार आहेत त्यांचा विचार मराठी जनता तर करीलच, पण त्यापूर्वी त्यांतून निर्माण होणा-या महत्त्वाच्या समस्यांचा विचार करण्याची जिम्मेदारी मराठी साहित्यिकांवर पडणार आहे. कारण राज्यभाषेचा दर्जा जेव्हां भाषेला प्राप्त होतो तेव्हां लोकजीवन समृद्ध करण्याचें एक महत्त्वाचें साधन म्हणून आपण त्या भाषेकडे पाहात असतों. आपण जाणतांच कीं वेगवेगळ्या साहित्य-प्रकारांनी लोकजीवन समृद्ध होत असतें. लोकजीवन समृद्ध करणें हें साहित्याचें अंग आहे कीं नाहीं, त्याचा तो उद्देश आहे कीं नाहीं, हा अर्थात् वादाचा विषय होऊं शकेल, परंतु निदान त्याचा परिणाम तसा घडत असतो असें गृहीत धरून मी या गोष्टीची चर्चा करतों आहें आणि म्हणून मराठी भाषेचें राज्य झाल्यानंतर ज्ञानाच्या सर्व क्षेत्रांतील विचारांची संपदा तिनें मराठी जीवनांत आणली पाहिजे, ही जिम्मेदारी तिच्यावर आहे. त्याकरितां मराठी भाषा ही अधिक विचारप्रवाही, अधिक विचारवाही झाली पाहिजे.