मी पाहिलेले यशवंतराव -प्रकरण - १४५-१

 ‘‘तुमचा भाऊ कुठं आहे?’’ यशवंतरावांचा दुसरा प्रश्न.

‘‘तो पुण्यातच निवृत्त होऊन राहिलाय’’ मी म्हटले.

‘‘सगळे एकंदर रिटायर झाले!’’ यशवंतराव स्वत:शीच पुटपुटले.

क-हाडातल्या पंतांच्या कोटाचा उल्लेख झाला. यशवंतरावांनी तिथल्या काही मंडळींची चौकशी केली. कोट फार बदलून गेलाय असे मी म्हणालो. त्यावर यशवंतराव उद्गारले, ‘‘अहो, ती नकट्या रावळ्याची विहीर देखील पहिल्यासारखी राहिली नाही!’’

‘‘यशवंतरावजी, आपण साता-याला चिरमुल्यांच्या घरी कसे काय आला नाहीत? चिरमुल्यांकडे काँग्रेसमधील अनेक मंडळी ये-जा करीत असत.’’ मी विचारले.

‘‘अहो, चिरमुले होते त्या काळात मी फार छोटा होतो!’’ यशवंतराव उत्तरले.

हा त्यांच्या सौजन्याचा भाग असावा. यशवंतरावांचे येणे घडले नसावे एवढेच. कारण चिरमुले एक्कावन्न साली गेले, आणि १९४६ पासूनच यशवंतराव विधिमंडळात आणि राज्यात, ज्यांची दखल घेतलीच पाहिजे अशा मंडळीत समाविष्ट झालेले होते.

चहापानासाठी आलेल्या इतर मंडळींना मुग्ध ठेवून अधिक घरगुती बोलणे उचित नव्हते.

आम्ही कार्यक्रमासाठी निघालो, तेव्हा यशवंतरावांनी कुमार गंधर्वांना आधी गाडीत बसवले. जन्मजात सौजन्याने माझ्या पाठीवर हात ठेवून त्यांनी मला आत बसायला लावले. मगच स्वत: आत बसले.

गाडीतल्या पाच मिनिटांच्या प्रवासात त्यांचा हात हाती घेऊन मी म्हणालो, ‘‘यशवंतरावजी, देण्याघेण्याचा काहीही मतलब नसतो तेव्हा जुनी माणसं भेटल्यावर फार बरं वाटतं. तुमच्या भेटीनं आज मला फार बरं वाटलं. आबांचं गुडविल मला अनेकदा अचानक मिळत गेलेलं आहे. आणि वय वाढलं की, मला वाटतं, आपला नोस्टाल्जियाही वाढत जातो.’’

‘‘खरं आहे!’’ यशवंतराव उद्गारले.

समारंभ संपल्यावर आम्ही जेवायला पुन्हा एकत्र आलो, तेव्हा यशवंतराव थकले आहेत हे जाणवले. आम्ही पाचसहाजण सतरंजीवर बसलो. ऊठबस करत असताना पायाला त्रास होत असल्याने, ‘‘मी कोचावर बसूनच जेवतो,’’ असे यशवंतराव म्हणाले. रात्री अकरानंतर जागरण होत नाही असेही त्यांच्या बोलण्यात आले. जेवणे झाली. जातांना निरोप घेतेवेळी ते म्हणाले, पुण्यात तुम्ही कुठेसे रहाता ते माझ्या लक्षात आलंय. पुण्याला निवांत आलो म्हणजे तुमच्या घरी जरूर येईन.

पुढे यशवंतरावजी पुण्यात दोनदा येऊन गेल्याचे वृत्तपत्रात वाचले. त्यांच्या जाहीर कार्यक्रमांचा तपशीलही वृत्तपत्रात आला होता. शिवाय ते ‘‘सर्किट हाऊस’’ मध्ये उतरले होते. अशा प्रसंगी ‘‘सर्किट हाऊस’’ मध्ये जाऊन भेटून बोलायचे तरी काय? असेही वाटले. सहज जमलेल्या भेटी, गायकाने मैफिलीत सहज घेतलेल्या मुष्कील जागेसारख्या असतात. ती जागा एकदा घेता आली म्हणून पुन्हा घेता येईलच असे नसते. घेता आली तरी तीच-तीच जागा गाण्यातला मजा घालवून बसते!

शिवाय पुनर्भेटी झाल्या नाहीत तरी आपला नोस्टाल्जिया तर कुणी हिरावून घेत नाही? पंचवीस नोव्हेंबर चौ-याऐंशीला यशवंतरावांनी अकल्पितपणे जीवनयात्रा संपवून नोस्टाल्जिया अधिक तीव्र केला इतकेच!