• 001_Krishnakath.jpg
 • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
 • 003_Shabdhanche.jpg
 • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
 • 005_Saheb_14.jpg
 • 006_Yashodhan_76.jpg
 • 007_Yashodharshan.jpg
 • 008_Yashwant-Chintanik.jpg
 • 009_Kartrutva.jpg
 • 010_Maulik-Vichar.jpg
 • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
 • 012_Sahyadricheware.jpg
 • 013_Runanubandh.jpg
 • 014_Bhumika.jpg
 • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
 • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
 • Debacle-to-Revival-1.jpg
 • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
 • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
 • sing_3.jpg

मी पाहिलेले यशवंतराव -प्रकरण ३-४

विशाल द्विभाषिक प्रामाणिकपणे राबविण्याची शिकस्त होत असूनही अशा अनेक अनुभवांमुळे विकासाच्या अनेक चांगल्या व अत्यावश्यक योजना राबविण्यात अडथळे येतात. विकासकार्यात प्रादेशिक समतोल साधता येत नाही. या निर्णयावर यशवंतरावजी आले होते. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याचे बाह्य दडपणही होतेच. शेवटी ही सारी परिस्थिती राष्ट्रीय नेत्यांच्या समोर मांडून त्याचा विश्वास संपादन करून मोठ्या कौशल्याने त्यांनी मुंबईसह सा-या मराठी भाषिक प्रदेशाचे एक राज्य ‘‘महाराष्ट्र राज्य’’ निर्माण करण्यात यश मिळविले. हा इतिहास सर्वश्रुत आहे.

‘महाराष्ट्र राज्य’ निर्मितीचा निर्णय झाला आणि यशवंतरावजींच्या उत्साहाला व कर्तृत्वाला जणू बहर आला. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून तावून सुलाखून यशस्वीपणे बाहेर पडलेले यशवंतरावजी, अनुकूल परिस्थिती प्राप्त होताच सर्वांगाने फुलून आले. सारा महाराष्ट्र फुलविण्याचे स्वप्न बघू लागले व स्वप्न साकार करण्यासाठी अनेकानेक योजना आखू लागले, कार्यकर्ते शोधू लागले. योजना कार्यान्वित करू लागले. त्यांच्या जीवनातील हा सर्वोत्तम कालखंड म्हणता येईल.

महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळाची पहिली बैठक मला आठवते. यशवंतरावजींच्या चेहे-यावरील आनंद ओसंडून वाहत होता. डोळ्यात स्वप्न तरळत होते. मोठ्या उत्साहाने व उमेदीने त्यांनी बोलायला सुरुवात केली. उद्याच्या महाराष्ट्राचे कल्पनाचित्र ते रेखाटत होते. महाराष्ट्राच्या कृषि-औद्योगिक विकासाचे अतिशय रम्य चित्र त्यांनी उभे केले व त्या धर्तीवर एक मास्टर प्लॅन तयार करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला. मंत्रिमंडळातील आम्ही सारे क्षणभर भावधुंद झालो होतो. त्यानंतर महाराष्ट्राच्या आर्थिक, सामाजिक व सांस्कृतिक विकासासाठी कितीतरी निर्णय घेतले गेले. योजना आखल्या व राबविल्या गेल्या, त्याचा आढावा स्वतंत्रपणे घ्यावा लागेल. पण एक गोष्ट नमूद केली पाहिजे की यशवंतरावजींची कल्पकता, योजकता, निर्णयक्षमता, ध्येयवाद व व्यवहारवाद यांची सांगड घालण्याचे कौशल्य, व्यक्तींना हेरून त्यांना कार्याला लावण्याचे कसब, सा-या जाती जमातींना एकत्र घेऊन चालण्याची धडपड यामुळे मराठी राज्याची जडणघडण प्रारंभीच्या काळी मोठ्या भरभक्कम पायावर झाली. मला ब-याचदा वाटते यशवंतरावजी महाराष्ट्रात बराचकाळ रहाते तर भरभराटीला आलेले व कारभाराच्या दृष्टीने आदर्श असे एक राज्य देशाला मिळाले असते. ते आर्थिक, सामाजिक व सांस्कृतिकदृष्ट्या विकसित असे वैभवशाली राज्य झाले असते. परंतु नियतीच्या योजना वेगळ्याच होत्या. ऐन उमेदीत महाराष्ट्र सोडून देशाची हाक म्हणून, त्यांना दिल्लीला जावे लागले. तिथेही त्यांनी अनेक मंत्रालयाचा कारभार समर्थपणे व यशस्वीपणे हाताळला. परंतु दिल्लीला काम करीत असले तरी मनाने ते तेथील वातावरणात एकरूप होऊ शकले नाहीत. एक मुत्सद्दी, राजकारणी, कारस्थानी बनू शकत नाही त्यामुळे ते जीवनाच्या उत्तरार्धात सतत दु:खी राहिले. श्रीमती वेणूताईच्या निधनानंतर तर ते शरीराने उभे असले तरी मनाने पूर्णपणे कोसळत होते असे एकदोनदा मला जाणवले. असे असले तरी त्यांच्यामधला माणुसकीचा ओलावा व ऋजुता कधी कमी झाली नाही. काजळली नाही. आणि ह्यातच त्यांचे मोठेपण सामावलेले आहे.

अशा ह्या समाजाभिमुख, राजकारणधुरंधर, विचारवंत व भावनाशील नेत्याला महाराष्ट्र कधी विसरू शकणार नाही.