शब्दाचे सामर्थ्य १९

लहानपणी गावाबाहेरचं उजाड माळ, नाहीतर देवराष्ट्राच्या ‘सोनहिरा’ओढ्याचं वाळवंट ही आमची खेळायची जागा. आट्यापाट्यांचा डाव तिथं चालायचा. आजकाल बर्‍याच ठिकाणी गावाबाहेरची शिवारं पाटाच्या पाण्यानं ओली बनली आहेत. हिरवी झाली आहेत. जिथं अजूनही माळ आहे, ओढे कोरडे आहेत, विहिरी आटत आहेत, तिथली माणसं परिस्थिती बदलण्याचा ध्यास धरून आहेत. हे पाहिलं, म्हणजे समाधान वाटतं. लहानपणी स्वातंत्र्याचा अर्थ कळत नव्हता, तेव्हा हातात तिरंगी झेंडा धरून स्वातंत्र्य मागणार्‍यांच्या प्रवाहात झोकून दिलेला मी ! माणसानंच परिस्थिती बदलायची असते, हा त्या स्वातंत्र्याचा अर्थ, आज बदलणारी परिस्थितीच मला समजावून देत आहे. मागे वळून पाहताना परिस्थितीचे किती तरी टप्पे दिसू लागतात. पण त्यांतल्या महारवाड्याच्या टप्प्याशी आलं, की आजही पाय तिथचं घुटमळतात. गाव बदलायला निघालेल्या माणसांनी इथं का थांबू नये, असं मनात येतं. सर्व अवयव शाबूत आणि चांगले असले, तरच ते शरीर चांगलं! समाजशरीराचे सर्व अवयव चांगलेच हवेत!

लहानपणाचा एक उपक्रम आठवतो. मॅट्रिकमधे शिकत होतो. महारवाडा त्या वेळी‘हरिजनवाडा’झाला होता. अस्पृश्यता नष्ट करण्यासाठी चळवळ सुरू होती. हरिजनांना शिक्षण देण्याच्या चर्चा झडत होत्या. माझा हरिजन मित्र उथळे आणि मी त्यावर बोलत होतो आणि त्यातूनच हरिजनांसाठी‘नाईट स्कूल’सुरू करण्याचं ठरलं. तसे ते सुरू केलंही. हरिजनवाड्यात जाऊन आम्ही मित्रमंडळी शिकवण्याचं काम करीत होतो. माझ्या घरी सर्व जातीजमातींचे मित्र जमत, चर्चा होत; आई आम्हां सर्वांना जेवू घालीत असे. कराडच्या बुधवार पेठेतली ही शाळा. आमचं ते कार्यक्षेत्र बनलं होतं. त्यामागे समाजकल्याणाची श्रद्धा होती. आम्ही मुलं त्या वेळी राजकारणात होतो, पण सत्याग्रही या अर्थानं! या शाळेमुळं आमचं राजकारण हे समाजकारणाचाच एक भाग बनलं होतं. केवळ राजकारणाच्या आधारे समाजकारण यशस्वी होऊ शकणार नाही, असं गांधीजी सांगत होते. म्हणजे करायच्या-घडवायच्या, त्या गोष्टी जनतेच्या हृदयावर बिंबवल्या पाहिजेत. त्याशिवाय माणसामाणसांना संघटितपणे एकमेकांविरुद्ध वागण्यास शिकविणारा जातिवाद नाहीसा होणार नाही, निदान कमी होणार नाही, असं आम्ही बोलत असू.

तो टप्पा ओलांडून मी पुष्कळ पुढं आलो, पण अजूनही ती चर्चा ऐकायला मिळते. बुद्धिवंत त्यांच्या भाषेत बोलतात, राजकारणी भाषेला धार लावून बोलतात आणि प्रत्यक्षात खेडी कृतीनं बोलकी बनत आहेत. वाटचाल सुरूच आहे. रस्त्यात काही खुणेच्या गोष्टी आढळतात आणि वाटचाल बरोबर मार्गानं होत राहिली आहे ना, हे त्या खुणा सांगतात. या खुणा काही वेळेला कानगोष्टीही करतात आणि माझ्यासारख्या वाटसरूला पुढं ढकलतात. मी हा अनुभव घेतला आहे. घेत आहे. या अनुभवांनी मला काही धडेही दिले आहेत. वाटचाल करताना दमछाक होणं, निराशा येणं हे घडतच असतं. पण आतून निराश राहा आणि बाहेरून आशावान असल्यासारखा उद्योग कर - स्वतःच्या धैर्यावाचून संकटातून कुणीही पार करणार नाही, हा धडा या वाटचालीच्या अनुभवातूनच मिळवला. म्हणूनच हरिजनवाड्यात पोचणारी वाट चालतो आहे.

संकटांची सुद्धा चव घ्यावी लागते. खडीसाखरेची गोडी माहिती नसलेल्या माणसानं ती खाल्ल्याशिवाय तिच्या गोडीचं ज्ञान होत नाही - तसंच संकटांचं आहे. ती सामाजिक असोत, राजकीय असोत, ती चाखावीच लागतात. निश्चयी लोक आपल्या कार्यापासून कधी उद्विग्न होत नाहीत. याबद्दलचे दाखले मी जेव्हा इतिहासात वाचतो, त्यावेळी संकटं चाखायची, ती कशासाठी, हे उमजतं. तरुणपणी हे सर्व समजून घेऊन आम्ही खांद्यावर तिरंगा घेतला, असं नव्हे. त्या वेळचे ते पोरसवदा धाडसही असेल. पावसाळ्यात नदीचं पाणी गढूळ असणारच. बुद्धी कितीही निर्मळ, उदार, शुद्ध असली, तरी तारुण्यात ती मलिन बनतेच. पण बुद्धी अशी मलिन बनण्याच्या काळात म्हणूनच तुरटीचा हात मधून-मधून फिरवावा लागतो. मलिनतेचा गाळ त्यामुळं खाली बसतो. माझ्या पूर्वायुष्यात घरात आईनं हे काम केलं. तिच्या वागणुकीनं मला पुष्कळ शिकवलं आणि बाहेर टिळक, गांधी, नेहरू या महापुरुषांच्या विचारांच्या आणि कृतीनं! त्यांच्या विचारांचं बोट धरूनच माझी वाटचाल सुरू झाली. त्या वाटेवर चंदनाचा सुगंध होता, चंदन स्वतः झिजतं; पण माणसाला सुगंध देतं. त्या महापुरुषांचा सुगंध असाच होता. सुंदर फुलांचे वृक्ष पुष्कळ असतात; पण चंदनाचे वृक्ष विरळ आणि विरळा असतात, जाणीव त्या वाटचालीतच झाली.