• 001_Krishnakath.jpg
 • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
 • 003_Shabdhanche.jpg
 • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
 • 005_Saheb_14.jpg
 • 006_Yashodhan_76.jpg
 • 007_Yashodharshan.jpg
 • 008_Yashwant-Chintanik.jpg
 • 009_Kartrutva.jpg
 • 010_Maulik-Vichar.jpg
 • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
 • 012_Sahyadricheware.jpg
 • 013_Runanubandh.jpg
 • 014_Bhumika.jpg
 • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
 • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
 • Debacle-to-Revival-1.jpg
 • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
 • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
 • sing_3.jpg

शब्दाचे सामर्थ्य ३

यशवंतरावांची श्रद्धास्थाने सोडली, तर बर्‍याच इतर व्यक्तींशी त्यांचा जवळचा संबंध निरनिराळ्या प्रसंगी व निरनिराळ्या कार्यक्षेत्रांत आला होता. त्यांतील काही त्यांचे आयुष्यभर जिवलग मित्र राहिले, तर काहीजण यशवंतरावांच्या पडत्या काळात त्यांच्यापासून दूरही झाले. त्यांनीही काही व्यक्तींना व राजकीय पुढार्‍यांना न दुखवता दूर केले. ज्यांना ते मित्र म्हणून मानीत, त्यांच्या सोबतीत राजकारण व आपले पद विसरून यशवंतराव आनंदाचे क्षण भोगत असत. आपल्या सोबत्यांविषयी त्यांनी म्हटले आहे की,‘माणसाचे जीवन फुलावयाचे असेल, तर त्याला सोबत्यांची सांगड पाहिजे. माझा तरी तो अनुभव आहे. माझ्या आयुष्यात जे काही घडल्याचे दिसत असेल, ते माझ्या सोबत्यांनी घडविले आहे, असे माझे प्रामाणिक मत आहे. प्रत्येक मनुष्य आपले स्वतःचे आयुष्य घडवितो, असे मी तरी मानीत नाही.’ या व्यक्तिविषयक विभागासाठी अनेक व्यक्तींचा समावेश करावा, असे प्रथमदर्शनी वाटले; परंतु एकंदर पुस्तकाची रचना, तसेच चार भागांचा समतोल व एकूण पानांची संख्या या सर्वांचा विचार केल्यानंतर काही निवडक व्यक्तींचाच या विभागात समावेश करावा लागला. त्यामुळे यशवंतरावांनी ज्यांच्याविषयी काही लिहिले आहे, अशा कित्येक व्यक्तींचा समावेश करता आला नाही, याची मला तीव्र जाणीव आहे.

तिसरा भाग विचारांचा. यशवंतरावांविषयी लिहिताना तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी म्हटले होते,‘श्री. यशवंतरावांचे विचार पश्चिमेकडून वाहणारे सह्याद्रीचे वारे आहेत; हे विचार युगान्तराचा संदेश देत असतात. यशवंतरावांच्या मनोभूमिकेवर मूळ भारतीय संस्कृतीचा व व्यापक अशा भारतीय संतांच्या भावभक्तिपूर्ण विचारसरणीचा खोल संस्कार झाला आहे, हे खरे आहे...’भारतीय लोकशाही क्रांतीच्या आणि भारतीय परिस्थितीच्या संदर्भात वस्तुवादी दृष्टिकोनातून त्यांनी चिंतन केले. या त्यांच्या चिंतनाचे सार त्यांच्या‘सह्याद्रीचे वारे’व‘युगान्तर’या भाषणसंग्रहांत प्रतिबिंबित झाले आहे. यशवंतरावांनी निरनिराळ्या प्रसंगी केलेली भाषणे त्यांच्या विचारांचा, तसेच, मराठी भाषेचा अमूल्य ठेवा आहे, असे माझे मत आहे. त्यांचे विचार किती चौफेर व परिपक्व होते, याचे दर्शन घडवण्यासाठी त्यांनी केलेली काही भाषणे व निवडक लेख या विभागात आहेत. त्यांत साहित्य संमेलनात, नाट्य संमेलनात, तसेच, विज्ञान परिषदेत त्यांनी सादर केलेले विचारही आहेत.

त्यांच्या भाषणशैलीत मांडलेल्या विचारांमुळेच त्यांना पुढील पिढीतील मराठी वाचक विचाराने परिपक्व झालेला नेता म्हणून, तसेच विचारवंत राजकीय पुरुष म्हणून ओळखतील. त्यांच्या विचारांचा वारसा अनेक क्षेत्रांतील सामान्य व्यक्तींसाठी, तसेच, विद्वानांसाठी एक अमाप खजिना आहे, यात शंका नाही.

शेवटी चौथ्या चिंतन या भागात यशवंतरावांनी आपल्या जीवनाचे केलेले सिंहावलोकन, तसेच, दृष्टिक्षेप समाविष्ट आहे. त्यात ‘आपल्या आयुष्यातील आशा-निराशेचे क्षण’,‘भारताची सद्यःस्थिती’,‘जीवनाचे पंचामृत’,‘सातव्या मजल्यावरील  चढ’हे लेख समाविष्ट केले आहेत.

काही लेख भाषणाच्या स्वरूपात असल्यामुळे, संपादन करताना सुटसुटीत स्वरूपात सादर करण्यासाठी योग्य ती पुनर्रचना करणे आवश्यक होते व तसे करण्यात आले आहे.

यशवंतरावांचे साहित्य व अनेक साहित्यिकांशी संबंध हे त्यांच्या जीवनाचे एक महत्त्वाचे अंग होते. ते पुस्तकप्रेमी होते व अनेक विषयांवरील ग्रंथ ते सतत वाचत असत व त्यांवर चिंतन करीत असत. त्यांनी जमविलेले दहा हजारांहून अधिक ग्रंथ कराड येथील वेणूताई स्मारक ग्रंथालयात उपलब्ध आहेत. ते पाहिले, म्हणजे यशवंतरावांची चतुरस्र बुद्धिमत्ता व राजकीय प्रवासाविषयी त्यांनी वेळोवेळी लिहिलेले विचार यांचा उगम कुठे आहे, हे समजते. त्यासंबंधी ते म्हणाले,‘ग्रंथवाचनाने माणूस मोठा झाला नाही, तरी शहाणा जरूर होतो.’जरा अवखळपणे पुढे म्हणाले,‘जसे सर्व मोठे लोक शहाणे नसतात, त्याचप्रमाणे सर्व शहाणे लोक मोठे होऊ शकत नाहीत.’