विकसनशील देशांनी विकसित देशांवर अवलंबून राहावे, ही परिस्थिती अनिश्चित काळापर्यंत चालू दिली जाणार नाही, ही गोष्ट समृद्ध देशांनी नजरेआड करून चालणार नाही. सध्याच्या परिस्थितीतून परस्परपूरक आणि समान सहकार्यावर आधारलेली नवी अर्थव्यवस्था निर्माण झालीच पाहिजे. स्वत:चे हितसंबंध सुरक्षित राखण्यासाठी विकसित देश जर आपली तात्पुरती उपाययोजना करू पाहतील, तर त्यातून दीर्घकालीन सोडवणूक निघणार नाही, हे त्यांनी ध्यानात घेतले पाहिजे. त्याचप्रमाणे विकसनशील देशांनीही, अंतर्गत आणि सामूहिक आत्मनिर्भरतेची कास धरून आणि आपापसांत सहकार्य करून आपल्या न्याय्य हितसंबंधाचे संरक्षण करण्याचा मार्ग अनुसरला पाहिजे.
आपली एकजूट आणि समान उद्दिष्टांची जाणीव यांवरच अखेरीस विकसनशील देशांचे सामर्थ्य अवलंबून राहणार आहे. केवळ विकनशील देशांची संख्या अधिक आहे, म्हणून नव्हे. शांततेची इच्छा बाळगणा-या जगाचा आपण आधार आहोत, याची जाणीव त्यांना ज्या प्रमाणात होत जाईल, त्या प्रमाणात त्यांचे बळ वाढणार आहे. कारण विकसनशील देश केवळ संख्येने अधिक आहेत, असे नव्हे, तर जागतिक लोकसंख्येपैकी बहुसंख्य लोक याच देशात राहात आहेत. म्हणून मानवजातीच्या भवितव्याच्या दृष्टीने त्यांच्या आकांक्षांना विशेष महत्त्व प्राप्त होते. कारण विकसनशील देश दारिद्रयात खितपत पडलेल्या मानवजातीचे प्रतिनिधित्व करीत आहेत. म्हणून त्यांनी जर एकजुटीने प्रयत्न केले, तर विकसित देशांना आणि त्या देशांतील लोकांना या प्रयत्नांची दखल घ्यावीच लागेल, याबद्दल किंचितही संदेह नाही.
संयुक्त राष्ट्रसंघ एकतिसाव्या वर्षांत पदार्पण करीत असतांना आमचे भूतपूर्व पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू भारताच्या पहिल्या स्वातंत्र्यदिनी काय म्हणाले, त्याचा उल्लेख मला करावासा वाटतो. ते म्हणाले होते, 'शांतता अविभाज्य आहे, असे म्हटले जाते. परंतु त्याचबरोबर समृद्धी आणि विनाश हेही अविभाज्यच असतात. कारण यापुढे जगातील कोणत्याही भूभागाला जागतिक प्रवाहापासून अलिप्त राहताच येणार नाही'.