• 001_Krishnakath.jpg
 • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
 • 003_Shabdhanche.jpg
 • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
 • 005_Saheb_14.jpg
 • 006_Yashodhan_76.jpg
 • 007_Yashodharshan.jpg
 • 008_Yashwant-Chintanik.jpg
 • 009_Kartrutva.jpg
 • 010_Maulik-Vichar.jpg
 • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
 • 012_Sahyadricheware.jpg
 • 013_Runanubandh.jpg
 • 014_Bhumika.jpg
 • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
 • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
 • Debacle-to-Revival-1.jpg
 • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
 • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
 • sing_3.jpg

भूमिका-१ (157)

वर्ग-संघर्ष म्हटला, की तो अहिंसक असणे संभवत नाही. कारण एक तर वर्गविग्रहाची भावना पराकाष्ठेला पोहोचल्याशिवय संघर्ष पेटणार नाही. संघर्ष हिंसक व्हायला नको असेल, तर तो पेटणारच नाही, अशी व्यवस्था करायला हवी. वर्गसंघर्षाने हिंसक वळण घ्यायला नको असेल, तर वर्गविग्रहाची भावना दूर करायला हवी. आर्थिक दृष्ट्या दुर्बळ आहे, एवढ्याच खातर कुणावर अन्याय होणार नाही, याची दक्षता घ्यायला पाहिजे आहे. आजही कुणी दरिद्री असेल, गरीब असेल, तर तो दोष त्याचा नसून संपूर्ण समाजव्यवस्थेचा आहे, असे मानले पाहिजे. ते न करता वर्गसंघर्ष हिंसक राहणार, की अहिंसक राहणार, ही चर्चा नुसती पोकळ व कोरडी ठरणार आहे. समाजात विविध स्तरांवरील वर्ग आहेत व त्यांतला एक वा अनेक सबल वर्ग दुस-या कमकुवत वर्गाचे शोषण करतात, छळ करतात, हेच वर्गसंघर्षाचे मूळ कारण आहे. पूर्वी आपला समाजच अशिक्षित होता. आपल्यावर अन्याय होत असला, तरी ते 'आपले नशीब' असे मानण्याची शिकवण त्याला देण्यात आली होती. आता समाज जागा होतो आहे. हरिजनही आता साक्षर होत आहेत. शहाणे होत आहेत. त्यांच्या नव्या पिढीला परंपरेने चालत आलेले अन्याय, अत्याचार सहन होत नाहीत. ते दूर करण्यासाठी आजचा शोषित कंबर कसून उभा राहू म्हणतो आहे. त्याचा त्याच्या हक्कासाठी होणारा लढा हा वास्तविक समाजाने कौतुकाने स्वीकारला पाहिजे आहे. इतकेच नव्हे, तर मी तर म्हणेन, त्याला सर्वतो प्रकारे मदत केली पाहिजे. हा संघर्ष अटळ आहे. आणि एकदा तो अटळ आहे, हे मान्य केले, की मग ती एक लढाई ठरते आणि लढाई नेहमी अहिंसकच राहिली पाहिजे, ही इच्छा चांगली आहे, पण व्यवहारात तसे घडणे अशक्य आहे.

मला वाटते, हरिजनांना अन् शोषितांना त्यांच्याच बाबतीत समाज पक्षपात करतो, असे वाटू न देणे, ही सर्वांत महत्त्वाची गोष्ट आहे. जातपात कोणतीही असो, सामाजिक प्रतिष्ठा असो वा नसो, आर्थिक स्थिती खालावलेली असो वा चांगली असो, सारा समाज आपल्याकडे 'माणूस' म्हणून पाहतो आहे, ही भावना त्यांच्यांत वाढीस लावली पाहिजे. ते होणार नसेल, तर तो वर्ग संघटित होणार व आपल्या हक्कांसाठी संघर्षाला सज्ज होणार. परंतु हा वर्ग असा उग्र बनणार नाही, हिंसाचार करणार नाही, यावर उत्तम उपाय, म्हणजे समाजातील आर्थिक आणि सामाजिक विषमता दूर करणे हाच आहे. मार्क्सने सांगितलेली वर्गविग्रहाची कल्पना किंवा वर्गसंघर्षाचा सिद्धांत त्याच्या देशात होता, तसाच्या तसा कदाचित हिंदुस्थानात दिसत नसेल. येथील निरनिराळ्या वर्गांची कल्पना व रचना कदाचित निरनिराळी असेलही. परंतु वर्ग आहेत, विषमता आहे, त्यांच्या हितसंबंधांत विरोध आहे, पिढ्यान् पिढ्या तो वाढतो आहे. जातिव्यवस्था ही अत्यंत वाईट स्वरूपाची वर्गविग्रह-व्यवस्थाच आहे, असे माझे स्पष्ट मत आहे. या जातिव्यवस्थांना सध्या जे विकृत स्वरूप आले आहे, त्या स्वरूपासाठी त्या निर्माण करण्यात आलेल्या नव्हत्या, असे म्हणण्यात फारसा अर्थ नाही नि तसे म्हणणे म्हणजे स्वत:ची फसवणूक करणे ठरेल. आपल्या समाजात प्रत्येक पिढीत, किंवा युगात म्हणा, हवे तर, जातिव्यवस्था ही कायम स्वरूपाच्या जातिभेदात बदलत चालली आहे, हे ओळखणारे नेते किंवा समाजसुधारक नव्हते, की काय? पण तरीही हा ऱ्हास झाला व समाज-जीवनात जातिभेदाचे हे विष खोलवर भिनले. कामावरून ठरविलेली जात जन्मावरून ठरणा-या जातीला वाट करून का गेली? काम कोणतेही असो, आधी जात कोणती, त्याचा विचार त्यानंतर बळावला. त्यातूनच कामापेक्षा जन्म महत्त्वाचा ठरला आणि येथूनच आमच्या देशात जातिभेद हेच वर्गभेदाचे दुसरे नाव होऊन बसले.

आज हरिजन हा वर्ग राहिलेला नाही, ती जात बनली आहे. कदाचित शोषिताची आणि शोषकांची नवी जातच या देशात तयार होण्याचा धोका आहे. ती जात जन्मावरून नव्हे, तर आर्थिक संपन्नतेवरून किंवा विपन्नतेवरून ठरणार आहे. म्हणजे मार्क्सचा सिद्धांत प्रत्यक्षात आलाच. भारतात तरी वर्गसंघर्ष आणि जातिसंघर्ष यांचा तोंडावळा ब-याच अंशी एक-सारखाच आहे.