• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

भूमिका-१ (146)

आर्थिक रचनेप्रमाणेच, सामाजिक रचनेचा प्रश्नही माझ्या दृष्टीने तितकाच किंबहुना अधिक महत्त्वाचा आहे. ऐतिहासिक कालापासूनचा मागोवा घेतला, तरी दिसते, ते असे, की सामाजिक विषमता ही भारताच्या रोमरंध्रांत भिनलेली आहे. या सामाजिक विषमतेचे खरे कारण आर्थिक विषमता हे आहे. या दोन्हींची सरमिसळ इतकी झाली आहे, की आर्थिक दृष्ट्या वरचढ असणारा वर्ग हा पुढे पुढे सामाजिक अर्थानेही वरचढ ठरत राहिला आहे. शतकानुशतके येथे हे असेच चालले आहे. हा उच्च, हा कनिष्ठ, हा पहाडात राहणारा, हा समुद्रकाठी राहणारा, हा म्हणे, मैदानात राहणारा, एक स्पृश्य, तर दुसरा अस्पृश्य असे फरक भारताच्या इतिहासाच्या सर्वच कालखंडांत पाहावयास मिळतात. कोण, कुठे, कसा राहतो, यावरूनच त्याची सामाजिक प्रतिष्ठा जोखावयाची, ही आपली परंपरागत पद्धती. सामाजिकदृष्ट्या समाज एकजिनसी व एकबद्ध असल्याचे चित्रच उपलब्ध नाही. सामाजिक समतेचे अपेक्षित चित्र त्यासाठी कायदे करून निर्माण करता येईल का? मला वाटते, कायदा यासाठी फार तर साहाय्यभूत ठरेल. सामाजिक एकजिनसीपणाचे चित्र ख-या अर्थाने निर्माण करावयाचे, ते भारतीय माणसांनी आपल्या कृतीने व विचारानेच निर्माण केले पाहिजे. सामाजिक व आर्थिक क्षेत्रांत सारख्याच निष्ठेने प्रतिज्ञापूर्वक प्रयत्न केले, तरच हे शक्य होणार आहे.

काँग्रेस कार्यकर्त्यांना आता हाच एक कार्यक्रम स्वीकारावा लागेल. हरिजनांना आता पुन्हा एकदा वेठबिगार म्हणून बांधले व राबवले जात आहे. सामाजिक समता प्रस्थापित करण्यासाठी भूमिहीन हरिजनांना जमिनीचे वाटप केले. परंतु जमिनी ताब्यात आल्यावर त्या जमिनीचे संरक्षण करणे यांना अशक्य होऊ लागले आहे. बेघराला घर दिले, भूमिहीनांना, दलितांना, हरिजनांना जमीन दिली, तरी घरांचे आणि जमिनीचे रक्षण करण्यासाठी त्यांना कसलेही साधन नाही, कुणाचे सहकार्य नाही, किंवा पाठबळ नाही. हरिजन व गरीब शेतकरी याला जीवन जगता येणार नाही, जिवंत राहता येणार नाही, असे वातावरण वरिष्ठ वर्ग म्हणविणारे तयार करीत आहेत. उत्तर प्रदेश, बिहारमध्ये तर या वरिष्ठ वर्गांच्या अत्याचाराने कळस गाठला आहे. अन्न, पाणी आणि हवा या माणसाच्या कमीत कमी गरजा. यांपैकी गरिबांना, हरिजनांना जमिनीवरून हुसकावून लावून त्यांना अन्नापासून वंचित केले जात आहे. पाणी हे तर निसर्गाने दिलेले साधन. परंतु माणसांत, जाती-जातींत, फरक करून हरिजनांना पिण्याच्या पाण्यापासून दूर हाकलले जात आहे. माणूस म्हणून जगण्याचे पाणी हे एक साधन. परंतु त्याचे वाटप करताना माणसा-माणसांत, जाती-जातींत फरक केला जात आहे. निसर्गाची कृपा, की त्याने हवा मोकळी ठेवली. हवेची सुद्धा मर्यादित पुरवठ्याची व्यवस्था माणसांच्या हातात राहती, तर हरिजनांना जगणेच कठीण होते !