१४
ग्रामीण विरूध्द नागरीकरण हे प्रश्न एकमेकांत इतके गुंतलेले आहेत; की एकाच्या सुखाचा दुस-याच्या दु:खाशिवाय आपणाला विचारच करता येत नाही. खेडे आणि शहर यांची सुखदु:खे ही अशी परस्परांशी भिडलेली, परस्परांत मिसळलेली आहेत.
१५
शेतीच्या प्रश्नांशी लढावयाचे म्हणजे शंभर तोंडे असलेल्या रावणाशी आपणाला लढावे लागणार आहे. आपल्या शेतीचे प्रश्न अनेकविध आहेत. लहान मुदतीच्या कर्जाचा प्रश्न आहे, दीर्घ मुदतीच्या कर्जाचा प्रश्न आहे, बागायतीचा प्रश्न आहे, बियाणांचा प्रश्न आहे, खतांचा प्रश्न आहे, तुकडेबंदीचा प्रश्न आहे, असे अनेकविध शेतीचे प्रश्न आहेत आणि हे प्रश्नही नेहमी बदलत राहणार आहेत. दुदैवाने शेतीचा विकास अनेक शतके थांबला होता. दहा-पाच वर्षे तो थांबला असता तर ती मोठी काळजी करण्यासारखी गोष्ट ठरली नसती; परंतु शेकडो वर्षे खितपत पडलेला असा हा प्रश्न असल्यामुळे त्यावर पुष्कळच विचार झाला पाहिजे.
१६
शेतीच्या शास्त्रीय शिक्षणाचा दृष्टिकोन लोकांमध्ये वाढविला पाहिजे. यासाठी येथे शिकणारे शेतीचे सगळे स्नातक निव्वळ शेतकी खात्याचे अधिकारी होऊन जाणार असले अणि जावयाच्या शर्यतीमध्ये त्या निमित्ताने पुढे सरकणार असले; तर मी असे म्हणेन की, ती दुसरी शोकपर्यवसायी गोष्ट होईल. येथे शिकलेला मनुष्य शेतकरीही होऊ शकला पाहिजे. तसे त्याने झाले पाहिजे.
१७
तुमची शेती हा निव्वळ तुमचा विचार राहिलेला नाही. तुमची राहिलेला नाही. शेती हा देशाचा विषय झाला आहे. आम्ही आमची शेती पिकवली नाही तर आम्ही आमच्या घरामध्ये उपाशी राहू असे म्हणून तुम्हाला आता चालणार नाही. तुमची शेती तुमची आहे; पण तशीच ती देशाचीही आहे. तुमची शेती पिकली नाही तर तुमचे नशीब पिकणार नाही एवढाच त्याचा अर्थ नाही, तर त्याचबरोबर देशाचेही नशीब पिकणार नाही.
१८
आजही साडेतीन कोटी एकर जमीन महाराष्ट्रात अशी आहे की, जी गळक्या भांडयासारखी आहे. मथुरेची गवळण पाणी भरून डोक्यावर हंडा घेऊन निघाली; आणि घरी येऊन पाहते तो आपल्या डोक्यावरच्या हंडयामध्ये पाणी नाही. तसेच आपल्या शेतीचे झाले आहे. दरवर्षी मृग नक्षत्रापासून हस्त नक्षत्रापर्यंत भरलेल्या नक्षत्रांच्या बाजारामध्ये आपल्या डोक्यावर भांडे घेऊन जाते बिचारी आमची शेती; पण त्यात शेवटी काही शिल्लक राहत नाही. आमच्या महाराष्ट्राच्या शेतीचा हा मथुरेचा बाजार झालेला आहे.
१९(अ)
पंढरीच्या विठ्ठलाच्या या परिसरात, त्याच्या या पंचक्रोशीत आज मोठया आनंदाने आलो आहे. येताना मी मनात विठ्ठलाला म्हणालो, चंद्रभागा तुझ्या अंगणात पोहोचण्यापूर्वीच आज आम्ही तिला अडवली आहे, तिला आम्ही आज साकडे घातले आहे. तुझ्या चरणांजवळ ही चंद्रभागा अठ्ठावीस युगे वाहात आली. या चंद्रभागेला उजनीजवळ आज आम्ही थांबवितो आहोत. महाराष्ट्रातील शेतकरी दरसाल आषाढी-कार्तिकी एकादशीला खांद्यावर पडशी टाकून ‘ग्यानबा तुकाराम’ म्हणत म्हणत तुझ्या दाराशी येत असतो. त्या ग्यानबा तुकारामाच्या शेतीत आणि झोपडीत विठ्ठला आता तू जा. तिथे तुझ्या चंद्रभागेला तू भेट.
१९(ब)
जनाबाईच्या मदतीला तू धावून गेलास; आणि तुझी मनापासून भक्ती करणा-या तुझ्या सगळया भक्तांच्या मदतीलाही तू धावून गेलास. तशीच तुझी भक्ती करणा-या आणि महाराष्ट्राच्या झोपडीत राहणा-या गरीब शेतक-याने आज तुझी चंद्रभागा अडविली आहे. त्यांच्या कल्याणासाठी, त्यांच्या मदतीसाठी विठ्ठला, तू त्यांच्या शेतीत जा. तू आता पंढपूरच्या मंदिरात राहू नकोस! विठ्ठलाला मी ही मनोभावे प्रार्थना केली आहे. तुकारामाची, ज्ञानेश्वराची, एकनाथाची आठवण करून मी ही प्रार्थना केली आहे. पण कृपा करून आपण हे मात्र लक्षात ठेवा की, निव्वळ प्रार्थनेने हे सर्व घडणार नाही. त्याकरिता तुम्हाला कष्टाची गंगा उपसावी लागणार आहे. त्यासाठी जिद्दीने काम करण्याचा आपण निश्चय करूया.