असेच करीत राहण्याचा आमचा निर्धार आहे !
सन १९२७ पासून ( म्हणजे वयाच्या १४ व्या वर्षापासूनच ) यशवंता राजकारणाविषयक घडामोडी जाणून घेऊ लागला. १९३० साली सत्याग्रह आणि प्रभातफे-यांना उधाण आलं आणि यशवंताने त्यात उडी घेतली. १९३० सालच्या लाहोर अधिवेशनात पं. जवाहरलाल नेहरूंनी सांगितल्याप्रमाणे २६ जानेवारी हा दिवस स्वातंत्र्यदिन म्हणून देशभर साजरा करावा असे ठरले. त्यानुसार कराड शहराच्या म्युनिसिपल कचेरीवर तिरंगा फडकवायचा असे यशवंताने व त्याच्या सहका-यांनी ठरवले. त्यासाठी तालुक्यातील गावांमध्ये सायकलवर फिरून यशवंताने तरूणांना संघटित केले. शहरातील सर्व प्रमुख ठिकाणी तिरंगा फडकाविणे, गांधीजींना अटक केल्याबद्दल सरकारच्या निषेधाच्या घोषणा देणे, कायदेभंगाच्या चळवळीसंबंधीची पत्रके वाटणे व टिळक हायस्कूलच्या प्रांगणात सकाळी आठ वाजता झेंडावंदन करणे असा या बाल क्रांतिकारकांचा कार्यक्रम होता. त्याप्रमाणे सर्वजण कामाला लागले. ठरल्याप्रमाणे सकाळी आठ वाजता यशवंताने हायस्कूल समोरच्या कडुनिंबाच्या झाडावर तिरंगा फडकावला आणि ' वंदे मातरम् ' हे गीत म्हणून सर्वजण आपापल्या घरी गेले. योगायोग म्हणजे त्याच दिवशी शाळा तपासणीसाठी आलेले शिक्षणाधिकारी शाळेसमोरच्या बंगल्यात मुक्कामासाठी थांबले होते. त्यांनी सगळा कार्यक्रम पाहिला व मुख्याध्यापकांकडे चौकशी केली. आपल्याला कधीही अटक होऊ शकते हे यशवंताने ओळखले. दुस-या दिवशी अटकेच्या तयारीनेच तो शाळेत गेला. वर्गात बसला. तास चालू असतानाच पोलीस अधिका-याला घेऊन मुख्याध्यापक वर्गात आले. यशवंताला बाहेर बोलावून घेतले. त्या अधिका-याने सकाळच्या कार्यक्रमाची सर्व माहिती विचारली. यशवंता म्हणाला, " हो, मी हे सर्व केले आहे आणि असेच करीत राहण्याचा आमचा निर्धार आहे."
त्यावर तो पोलीस अधिकारी मुख्याध्यापकांना म्हणाला, " या मुलाला मी अटक करून घेऊन जातोय. त्याच्या पालकांना तसे कळवा." पुढे यशवंताला मॅजिस्ट्रेटसमोर उभे करून त्याच्यावरील आरोप वाचून दाखविण्यात आले. यशवंताने गुन्हा कबूल केला आणि मॅजिस्ट्रेटने त्याला अठरा महिन्यांची सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. तुरुंगाच्या दिशेने चालत जाताना यशवंता मनात म्हणत होता, ' स्वातंत्र्य मिळेपर्यंत असेच करीत राहण्याचा माझा निर्धार आहे.'