कथारुप यशवंतराव
लेखक : प्रा. नवनाथ लोखंडे
--------------------------------
Ebook साठी येथे क्लिक करा |
संपादकाचे मनोगत
प्रिय वाचकहो, सप्रेम नमस्कार.
नवमहाराष्ट्राचे शिल्पकार स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या जीवनातील उदबोधक प्रसंगांची माहिती देणारा ‘कथारूप यशवंतराव ‘हा स्मरणग्रंथ आपल्या हाती देताना मला मनस्वी आनंद होत आहे.
साहेबांचे जन्मशताब्दी वर्ष महाराष्ट्र शासनाने व मराठी जनतेने नुकतेच मोठ्या उत्साहाने व कृतज्ञ भावनेने साजरे केले. या निमित्ताने महाराष्ट्राच्या जडणघडणीमधील त्यांच्या अनमोल योगदानाचा आढावा घेतला गेला. अनेक मान्यवर लेखकांनी यशवंतरावांच्या सव्यसाची व्यक्तिमत्वाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला आहे. पण तरूण पिढीला असे मोठमोठे आणि गंभीर प्रकृतीचे ग्रंथ वाचण्याइतका वेळ (आणि कदाचित् इच्छाही) नाही. त्यांना सोप्या भाषेत व कमी शब्दांत नेमकी माहिती हवी असते. नव्या पिढीला यशवंतरावांच्या संयमी व सुसंस्कृत व्यक्तिमत्वाची ओळख व्हावी या एकमेव उद्देशाने प्रेरित होऊन मी हा ग्रंथ संपादित केला आहे. मोठ्या माणसांची खरी ओळख ही त्यांच्या जीवनातील छोट्या छोट्या प्रसंगांतून अगर घटनांमधूनच होत असते असे मला वाटते. या पुस्तकातील प्रत्येक कथा कोणता ना कोणता तरी संस्कार करते. सर्व क्षेत्रांतील व सर्व वयोगटातील वाचकांना ही कथापुष्पे आवडतील असा मला विश्वास वाटतो.
चव्हाणसाहेबांच्या विचारांचा व कार्याचा वारसा समर्थपणे पुढे नेणारे ना. शरद पवारसाहेब यांनी पत्ररूपाने दिलेली कौतुकाची थाप हा माझ्यासाठी सर्वोच्च सन्मान आहे. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी लावलेल्या व ममतेने वाढविलेल्या रयत शिक्षण संस्थेच्या इवल्याशा रोपाचे रूपांतर आता प्रचंड वटवृक्षात झाले आहे. ही प्रक्रिया सुरू असतानाच स्व. यशवंतरावांनी या संस्थेचे अध्यक्षपद भूषविले आणि अशा दिग्गजांच्या कार्याने पुनित झालेल्या या संस्थेत सेवा करण्याची संधी मला लाभली याचा मला विशेष आनंद व अभिमान वाटतो.
संस्थेचे चेअरमन व ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी, शिक्षणतज्ज्ञ अॅड. रावसाहेब शिंदे यांनी त्यांची प्रकृती बरी नसतानाही केवळ यशवंतरावांवरील श्रद्धेपोटी व माझ्या आग्रहाखातर या ग्रंथास सविस्तर प्रस्तावना दिली त्याबद्दल मी त्यांचा अत्यंत ऋणी आहे. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई व या प्रतिष्ठानचे कराड येथील विभागीय केंद्र; तसेच सौ. वेणुताई चव्हाण स्मारक ट्रस्टतर्फे चालविले जाणारे ग्रंथालय व तेथील सर्व सेवकवर्ग यांनी केलेल्या सहकार्यावाचून हा ग्रंथ साकार होणे शक्य नव्हते याची विनम्र जाणीव मला आहे. त्या सर्वांचे मन: पूर्वक आभार ! ज्येष्ठ पत्रकार श्री बाबुराव शिंदे यांनी वेळोवेळी केलेल्या बहुमोल सूचनांचा मला अतिशय उपयोग झाला. या ग्रंथासाठी मी ज्या मान्यवर लेखकांच्या लिखाणाचा ‘संदर्भग्रंथ’ म्हणून उपयोग केला, त्या सर्व लेखक - प्रकाशकांचे मी मन:पूर्वक आभार मानतो. आमच्या महाविद्यालयाचे प्राचार्य मा. सीताराम गोसावी सरांचे सहकार्य मला वेळोवेळी लाभले. स्व. यशवंतरावांच्या जीवनावर निघालेला ‘लोकराज्य ‘चा विशेषांक सरांनी मला त्यांच्या घरून आणून दिला, ही आस्था मी विसरू शकत नाही. या सर्वांविषयी मी कृतज्ञता व्यक्त करतो.