परीशिष्ट
श्री. यशवंतराव चव्हाण
मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, मुंबई.
‘देशभक्तिची ज्योत माझ्या मनांत प्रथम कशी स्फुरली ?’ असा प्रश्न ‘शब्दरंजनच्या’ संपादकांनी उपस्थित केला, तेव्हां क्षणभर माझे मन विचारांत पडले. राजकारणाच्या माझ्या पेशामुळे कदाचित असेल, परंतु फार लांबच्या भूतकाळाचा विचार करण्यास मीझे मन कांहीसे अनुत्सुक असते. वर्तामानकाळाला आणि त्यामधील समस्यांना बाजूला सारून भूतकालाचा विचार करण्यास आवश्यक ती सवड राजकारणाच्या धबडग्यांत आजवर मला कधी लाभलेली नाही.
असे असतांहि कराडच्या टिळक हायस्कूलच्या परिसरांत १९२५ पासून १९३२ पर्यंतच्या काळांत जी वर्षे मी घालविली, तिचा ठसा माझ्या सा-या जीवनावर इतक्या रम्योत्कट स्वरुपांत राहिला आहे कीं, या विशिष्ट कालखंडांतील आठवणी विसरू म्हटले तरी विसरण्यासारख्या नाहींत. ज्याचे वडील लहानपणीच वारले आहेत, असा गरीब शेतक-याचा एक शाळकरी मुलगा देशभक्तीनें प्रेरित होऊन स्वातंत्र्यसंग्रामांत उडी घेतो, ही कल्पनाच वस्तुत: किती अद्भुतरम्य आहे ? पाषाणाला सुवर्णत्व प्राप्त करून देणारी ही किमया ज्या परिस्थितीने माझ्या आयुष्यांत घडवून आणली तिचा विसर यावज्जीव मला पडणे अशक्य आहे.
याच कारणानें ‘शब्दरंजन’ च्या संपादकांनी देशभक्ती भावनेच्या माझ्या मनातील उदयासंबंधीचा प्रश्न विचारला, तेव्हा माझ्या स्मृतीला पंख फुटल्यासारखे झाले. सचिवालयातील माझी ‘समशीतोष्ण’ कचेरी, कमाच्या फायली आणि दर अर्ध्या मिनाटाला वाजणारा टेलिफोन. या सा-या गोष्टी एखादी कळ फिरावी त्याप्रमाणे माझ्या मनांतून अंतर्धान पावल्या आणि १९२७ ते १९३२ या कालखंडातील क-हाड गांव आणि त्या गावांत माझ्या अन्य मित्रमंडळीसमवेत देशप्रितीची दिक्षा मला कशी लाभली यांची चित्रे. हे प्रसंग जणूं काल घडल्याप्रमाणें मला दिसू लागले.
माझ्या मनांत देशप्रितीची आवड कशी निर्माण झाली याचा त्रयस्थ बुद्धिनें मी विचार करतो, तेव्हां अमूक एका प्रसंगानें अथवा व्यक्तिच्या प्रभावाने ती निर्माण झाली असे वाटत नाहीं. राजकीय क्षेत्रांतील वा संशोधन क्षेत्रांतील नेतृत्वाची परंपरा ही एका दिव्यावरून दुसरा दिवा प्रज्वलित व्हावा त्याप्रमाणें एका व्यक्तिकडून दुस-या व्यक्तिकडे संक्रांत होत, असे सामान्यत: मानले जाते. परंतु ज्यावेळीं देशभक्तिची प्रेरणा माला लाभली, त्याकाळीं महाराष्ट्राचे राजकिय पुढारी आपण होऊ असे मला वाटले नव्हते, तशी स्वप्नेहि मनाशी नव्हती. त्याकाळी मनाची प्रेरणा अशी एकच होती आणि ती म्हणजे ब्रिटिशांच्या पारतंत्र्यात पिढ्यानपिढ्या अडकून पडलेल्या आपल्या मातृभूमीसाठीं आपण कांहींतरी केले पाहिजे. केवळ या भावनेनें देशाच्या स्वातंत्र्य युद्धांत ज्या हजारो तरुणांनी उडी घेतली, त्यापैकी मी एक होतो.
अशा स्थितीत घरामध्यें देशभक्तीची परंपरा नसतांना किंबहुना देशसेवेच्या दृष्टीनें प्रतिकूल परिस्थिती घरांत आसतांना स्वातंत्र्य युद्धाच्या चळवळीकडे मी ओढला गेलो. याचे सारे श्रेय त्याकाळच्या सर्व संचारी आणि स्फोटक राजकीय जागृतीला द्यावे लागेल असे मला वाटते.