कृष्णाकांठ१९

कराडपासून स्टेशन रोडने रेल्वे स्टेशनच्या बाजूला असलेल्या एका गावी असाच एक नामांकित तमाशा होणार होता. त्या गावातील आमच्या एका मित्राने आम्हांला जेवायचे निमंत्रण दिले होते, म्हणून आम्ही संध्याकाळी जायला निघालो. पाच-सहा जण होतो. आम्ही कृष्णा नदीची फरशी ओलांडून एक मैल गेलो असू, नसू, तो समोरून येणारे आमच्या शाळेचे शिस्तप्रिय ड्रिल मास्तर समोरून येताना दिसले. मी बरोबरच्या मुलांना सांगितले, की आपण कुठे जातो आहोत, हे जरी नक्की सांगितले नाही, तरी आपण मास्तरांशी मुळीच खोटे बोलायचे नाही. माझ्या अपक्षेप्रमाणेच झाले. आम्हां मुलांना पाहिल्यावर मास्तरांनी विचारले,

''कोठे चाललात, रे एवढ्या संध्याकाळी ? ''

मी पुढे होऊन सांगितले,

''आम्ही स्टेशनवर चाललो आहोत. तेथे टॉम शॉ येणार आहे. त्यांना बघायचे आहे.''

ड्रिल मास्तरांनी आम्हांला विचारले,

''हा कोण टॉम शॉ ?''

मी त्यांना सांगितले,

''हा बर्नार्ड शॉचा भाऊ आहे.''

आमचे उत्तर मास्तरांना पटलेले दिसले आणि ते म्हणाले,

''जा जा, चांगले आहे.''

ते पुढे निघून गेल्यानंतर आम्हांला हसू आवरले नाही. हसत खिदळत त्या मित्राच्या घरी पोहोचलो आणि त्याला ही कहाणी सांगितली, तेव्हा फारच मजा आली.

ही सबंध रात्र आम्ही आमच्या मित्राच्या गावी घालवली.

ग्रामीण तमाशातले बरेचसे यश हे त्यातल्या लावणी म्हणण्याच्या लकबीवर, नाचणा-या बाईच्या वा पुरुषाच्या लावण्यांवर, हावभावांवर अवलंबून असे. त्याचबरोबर त्यात काम करणा-या सोंगाड्याच्या हजरजबाबीपणावर आणि चतुर संभाषणशक्तीवरही अवलंबून असे. सोंगाड्या हा प्राणी मराठी लोकनाट्यातला विनोदी पुरुष असतो आणि हे काम करणारे कलावंत लोक फार सहजस्फूर्त काम करीत असत. त्यांच्यासाठी कोणी, हल्ली नाटकासाठी जशी संहिता लिहितात, तशी लिहून तयार केलेली नसे. वर जो मी हजरजबाबीपणा म्हटले, तो यासाठी. त्यामध्ये त्यांचे बुद्धिचापल्य आणि संभाषणचातुर्य प्रकर्षाने दिसत असे.

कुस्त्यांच्या बाबतीतही असेच झाले. जत्रेच्या निमित्ताने गावोगाव कुस्त्यांचे फड होत असत. चांदीची कडी आणि फेटे बक्षीस म्हणून दिले जात असत. ऐन उमेदीचे तरणेबांड कुस्त्या खेळत असत. त्यामुळे रंग भरत असे. गावोगाव तालमी असत. गावाच्या पहिलवानाला गावकऱ्यांनी मदत करावी, असा संकेत असे. त्यामुळे कुस्त्यांचे फड चांगले रंगत असत.