• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

कृष्णाकांठ३

देवराष्ट्र हे माझे जन्मगाव आणि आजोळ असल्यामुळे माझ्या अगदी लहानपणच्या आठवणी ह्या देवराष्ट्राच्या आठवणी आहेत. माझ्या जीवनातल्या पहिल्या पाच-चार वर्षांच्या ज्या आठवणी आहेत, त्या देवराष्ट्र, वडगाव, कुंडल, ताकारी या गावांशी निगडित आहेत. ग्रामीण जीवनाची पार्श्वभूमी हा माझ्या जीवनाचा श्रीगणेशा आहे. पुढे मी राजकीय कामानिमित्त आणि सरकारी कामासाठी देशांतर्गत आणि सर्व जगातही खूप फिरलो. तरी पण या परिसराची ओढ माझ्या मनात कायमची राहिली आहे. असे का होते, ते मला माहिती नाही. पण वस्तुस्थिती ही अशी आहे.

कुतूहल आणि जिव्हाळा वाटावा, असाच हा परिसर आहे. देवपण घेऊन जन्माला आलेले हे गाव, पण याच्यात राष्ट्र ही कल्पना सामावलेली आहे. सागरोबाच्या चोहोबाजू आनंदबनाने भरलेल्या. धर्म, अर्थ, काम, मोक्ष हे चारही पुरुषार्थ येथे सार्थपणे वावरत असतात. सुपीक जमिनीत बी पेरले, म्हणजे चांगले फोफावते, तशी इथली माणसे आणि मने! या मातीचा गुण आणि माणसांचे मोल हिंडता-फिरता दिसू लागते.

समुद्रात स्नान केले, की त्रिलोकांतील तीर्थक्षेत्रांचे पुण्य मिळते, अशी जुनी माणसे मानतात. त्याचप्रमाणे अमृतसेवनामुळे सर्व जीवनरसांचे सेवन घडते, असेही म्हणतात. इथे मात्र साक्षात समुद्रेश्वरच कुंडात उभा आहे आणि त्याच्याच प्रेमामृताने 'सोनहिरा' वाहतो आहे. या लहानशा नदीला लोक ओढा म्हणतात. तिथे डुंबण्यातच माझे बालपण गेले. त्यातील अमृतमय पाणी माझ्या पोटात आहे. 'सोनहि-या'ची ही अमृतभूमी, म्हणजेच माझे हे आजोळ. माझा अंकुर अवतरला, तो इथेच.

या गावाची ही पार्श्वभूमी असली, तरी माझे आजोळचे घर हे या गावातल्या एका सामान्य शेतक-याचे घर होते. सबंध कुटुंबाचे पालनपोषण करील, एवढीही जमीन त्यांच्याजवळ नव्हती. त्यामुळे शेतीला धरून दुसरा काही जोडधंदा करण्याखेरीज त्यांना मार्ग नसे. कधी इतरांच्या शेतीवर मजुरी, तर कधी काही दुसरे एखादे काम, असा खाक्या होता. ह्या परिस्थितीमध्ये मी पहिली पाच-चार वर्षे काढलेली आहेत.

माझी पहिली शाळा देवराष्ट्राची आहे. गावच्या पश्चिमेला उंचशा पठारावर एका तळ्याच्या काठी असलेली दोन-तीन खोल्यांची शाळा मला आजही प्यारी वाटते. पहिला श्रीगणेशा मी तिथे शिकलो. तो शिकविणारे माझे पहिले शिक्षक बंडू गोवंडे यांना मी आजही स्मरतो. मन लावून काम करणारे प्रेमळ शिक्षक ही त्यांच्याबद्दलची माझी आठवण आहे. गोवंडे मंडळी ही देवराष्ट्राची राहणारी असल्यामुळे त्यांना सर्व विद्यार्थ्यांबद्दल एक प्रकारचा जिव्हाळा होता. गावचाच मास्तर आणि गावचीच मुले असा संबंध असल्यामुळे कधी कधी फायदा असतो, त्यातला तो कदाचित असेल.

अशा गावी माझा जन्म १९१३ च्या १२ मार्च रोजी झाला. शाळेचे सर्टिफिकेट एवढाच त्याचा पुरावा आहे. मी माझ्या आईचे पाचवे किंवा सहावे अपत्य असल्यामुळे माझ्या जन्माची नोंद कोणी ठेवण्याची काळजी घेतली नाही. त्याकाळी त्यांना अशा गोष्टींची जरुरीही वाटत नसावी. माझा जन्म, म्हणजे काही महत्त्वाचा सुवर्णक्षण आहे, अशी काही परिस्थिती नव्हती. आज मला अनेक मंडळी, 'तुमची निश्चित जन्मतारीख सांगा' असे म्हणतात, तेव्हा त्यांना मी हीच तारीख सांगतो. आणि हीच जन्मतारीख मी माझा जन्मदिवस म्हणून पाळतो आहे. परंतु शंभर टक्के हीच माझी जन्मतारीख आहे, असे छातीठोकपणे मी काही सांगू शकणार नाही. मात्र माझ्या आईने व आजीने मला माझ्या जन्मवेळेची तपशीलवार माहिती माझ्या लहानपणी सांगितली होती. पुढे आईला विचारून मी ती निश्चितही केली होती.