• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

कृष्णाकांठ१७०

श्री. किसन वीर हे संघटनात्मक प्रमुख म्हणून भूमिगत चळवळीचे नेतृत्व करीत होते. माझा त्यांच्याशी संपर्क होता. अशा संघटना जेव्हा सत्ताधा-यासारख्या वागू लागतात, तेव्हा त्यांत दोषही निर्माण व्हायला लागतात. असे काही दोष याही भूमिगत चळवळीत निर्माण होऊ लागले होते. श्री. आबांना मी निरोपाकरवी अशा काही गोष्टी कळवीत असे. तेही त्याची काळजी घेत असत. या भूमिगत चळवळीमध्ये हळूहळू जो महत्त्वाचा दोष वाढत गेला, तो हा होता, की कार्यकर्त्यांमध्ये वेगवेगळे गट पडले आणि त्यांच्यांत स्पर्धा सुरू झाल्या. कोणत्या क्षेत्रासाठी कोणत्या गटाने काम करावयाचे, या संबंधाने काही वादग्रस्त प्रश्नही उपस्थित झाले. पण राजकीय दृष्ट्या माझ्या मताने ही किरकोळ गोष्ट होती. जिल्ह्यामध्ये भूमिगत कार्यकर्त्यांची एक प्रकारची सत्ता स्थापन झाली आहे-विशेषत: ग्रामीण भागामध्ये - असे वातावरण निर्माण झाले होते. कराड पाटण, वाळवे, तासगाव, वाई, सातारा, कोरेगाव आणि शिराळा या तालुक्यांत याचा विशेष परिणाम दिसून येत असे, ज्यांचा उल्लेख केला पाहिजे, असे अनेक कार्यकर्ते आहेत, पण त्या सर्वांच्या नावांचा उल्लेख, त्यांचा या कामात माझ्याशी व्यक्तिश: संबंध आला नसल्याने, मी करू इच्छीत नाही. परंतु असंख्य कार्यकर्ते या चळवळीचे सैनिक म्हणून  काम करीत होते, हे उघड होते आणि जसजशी त्यांची शक्ती वाढत गेली, तसतशी सरकारी यंत्रणाही अधिक चिडत गेली. परंतु त्याचा काही उपयोग होत नव्हता. माझ्या माहितीप्रमाणे जिल्ह्यातल्या या कार्यकर्त्यांना भेटण्याकरता स्वत: श्री. अच्युतराव पटवर्धन सातारा जिल्ह्यात एकदा येऊन गेले, असे मी ऐकले होते. ते किती खरे-खोटे, हे मला माहीत नाही. परंतु ही वार्ता त्यावेळी जिल्ह्यात खूप पसरली होती. अशा वार्तेनेही अशा चळवळीचा दबदबा वाढतो, कारण या चळवळीला केंद्रीय संघटनेचा पाठिंबा आहे, याची जाणीव लोकांना होते, आणि त्यामुळे अशा चळवळीची शक्ती वाढते.

सातारा जिल्ह्यातल्या या भूमिगत चळवळीची अशी प्रगती होत असताना ज्या पार्श्वभूमीवर ही चळवळ चालली होती, त्या युद्धाची काय परिस्थिती होत होती, हेही पाहण्यासारखे आहे. १९४४ च्या जून महिन्यात युरोपमध्ये दोस्त राष्ट्रांनी आपली दुसरी आघाडी उघडली. फ्रान्सच्या नॉर्मंडीच्या किना-यावर मोठ्या बहादुरीने सैन्य उतरवून आगेकूच करीत हे सैन्य पॅरिसच्या दिशेने जाऊ लागले. रशियाने गेली तीन वर्षे हिटलरच्या रणगाड्यांच्या आणि विमानांच्या ताफ्यांशी एकाकी झुंज दिली होती आणि त्यात त्यांना फार किंमत मोजावी लागली होती. रशियन भूमीवर शेकडो मैल जर्मन सैन्य आत घुसले होते. स्टॅलिनग्राडला वेढा पडला होता. मॉस्कोपासून काही मैलांवर सैन्य येऊन पोहोचले होते. अशा परिस्थितीतही आपले धैर्य न खचू देता आणि अशा तऱ्हेचे युद्ध करण्याकरता आवश्यक असणारी जी औद्योगिक यंत्रणा असते, तिची क्षमता कमी होऊ न देता युद्धसाधनांचे उत्पादन चालू ठेवले आणि युद्धाच्या आघाडीवर सैनिकांच्या मार्फत पराक्रमाची शर्थ केली. ही दुसरी आघाडी युरोपमध्ये उघडल्यानंतर रशियावर असणारा जर्मन सैन्याचा दबाव कमी झाला आणि नवी सामग्री आणि उभे राहिलेले नवे सैन्य यांचे, जसा महापुराचा लोंढा वाहत जातो, तसे रशियन सैनिकांचे लोंढे पोलंडमध्ये आणि बाल्कन देशांमध्ये घुसू लागले. १९४४ सालची ही राजकीय पार्श्वभूमी पाहताना पुढचे १९४५ हे साल निर्णायक वर्ष ठरणार, असे माझ्या मनाने घेतले. युरोपमधील युद्धाचा निकाल लागण्यास आता फक्त काही महिन्यांचा अवधी राहिला होता. गेली सहा वर्षे युद्ध ज्या चढ-उतारांतून गेले होते, त्यांचे बरेवाईट परिणाम ब्रिटिश जनतेने भोगले असल्यामुळे ब्रिटिश सत्ताधारी नसले, तरी ब्रिटिश जनता यातून  काही नवीन शिकली असली पाहिजे, अशी आशा माझ्या मनात निर्माण झाली होती. हे युद्ध  संपल्यानंतर हिंदुस्थानच्या स्वातंत्र्याचा प्रश्न सुटावयाचा मार्ग मोकळा होईल, असा विश्वास मनामध्ये वाटत होता. या घडामोडींची प्रत्यक्ष प्रक्रिया काय राहील, यासंबंधाचे चित्र मात्र डोळ्यांपुढे येत नव्हते. पण जागतिक परिस्थितीच असे आगळे वेगळे रूप घेत होती, की यातून नव्या हिंदुस्थानचा जन्म व्हावा.

१९४५ साल जसजसे जुने होऊ लागले, तसतसे ज्यांना हिंदुस्थानचे राजकारण समजत होते, अशा जाणत्यांना सत्तांतराची चाहूल लागली, असे म्हटले, तरी हरकत नाही. पूर्वेकडे ब्रह्मदेशामध्ये जपानच्या विरोधी दोस्त राष्ट्रांच्या सैनिकांना छोटे-मोठे विजय मिळू लागले, हेही एक सुचिन्ह होते. युरोपच्या युद्धाबरोबर जपानचे युद्ध संपणार नाही, हे स्पष्टच होते. त्यासाठी अधिक प्रयत्न करावे लागतील, हेही उघड होते. परंतु तो काही महत्त्वाचा अडथळा ठरणार नाही, अशी सर्वांची समजूत होती. प्रत्यक्षात ऍटम बॉम्बने जपानी युद्धाचा शेवट जसा झाला, त्याची मात्र कुणाला काहीच कल्पना नव्हती. १९४५ च्या जून-जुलै महिन्यांमध्ये ब्रिटिश अंतर्गत राजकारणामध्ये मोठी उलथा-पालथ झाली. ज्या राष्ट्रीय सरकारने जर्मनीचा पराभव करी तो पर्यंत युद्धाचे नेतृत्व केले होते, ते राष्ट्रीय सरकार संपुष्टात आले. जपानचा पराभव होई तो पर्यंत राष्ट्रीय सरकार चालवावे, अशी सूचना चर्चिलने मजूर पक्षाचे नेते श्री. ऍटली यांना केली होती. पण ती त्यांनी साफ नाकारली. ऍटलींच्या त्या नकारामुळे दूरदृष्टी आणि योग्यवेळी योग्य राजकीय निर्णय घेण्याची शक्ती त्यांच्यामध्ये होती, हे स्पष्ट होते. श्री. ऍटलींचे व्यक्तिमत्त्व हे चर्चिल यांच्या तुलनेने कमी आकर्षक होते. परंतु विचारांची स्पष्टता असणारे आणि मजूर पक्षाची वसाहतवाद्यांच्या प्रश्नाकडे पाहण्याची जी मूळ दृष्टी होती, त्या दृष्टीने काम करणारे ते प्रामाणिक पुढारी होते. चर्चिलपेक्षा काही बाबतीत ते मोठे होते, अशी माझी नेहमीच भावना राहिली आहे.

मी संरक्षण मंत्री म्हणून पुढे लंडनला गेल्यानंतर त्यांना मी एक खाना दिला होता आणि त्यांच्याशी भारताच्या काही संरक्षण-प्रश्नांवर बोलण्याची संधी मिळाली होती, याचा मला रास्त अभिमान आहे.