संरक्षणमंत्री म्हणून दोन आठवड्यांच्या भेटीत युद्धसाधनांची माहिती घ्यावी व रशियाशी त्याबाबतीत करारमदार करावा, हा या भेटीचा उद्देश होता आणि तो बऱ्याच प्रमाणात यशस्वीही झाला. पण माझे मन लेनिन आणि टॉलस्टॉय या दोन व्यक्तींभोवती केंद्रित झाले होते. दुसऱ्या महायुद्धात प्रत्यक्ष रणभूमी झालेल्या रशियाने लक्षावधी माणसांचे बलिदान केले होते. शत्रूशी लढताना आवश्यक असलेल्या पराकोटीच्या शौर्याचे जसे तेथे दर्शन होत होते, त्याचप्रमाणे युद्धाग्नीमुळे होणाऱ्या संहाराची प्रतिक्रिया म्हणून उचंबळून येणारा माणुसकीचा गहिवरही क्षणाक्षणाला जाणवत होता. त्या भारावलेल्या मन:स्थितीत तो लेख तयार झाला. कामामध्ये युद्धसाधनांच्या तयारीची पूर्तता; पण मनामध्ये शांततेचा संदेश अशा काहीशा विरोधाभासात्मक विकल मन:स्थितीचे हे चित्रण आहे.
'ऋणानुबंधा'त समाविष्ट केलेल्या काही लेखांची ही अशी पार्श्वभूमी आहे. यांत उल्लेखिलेली माणसे, स्थळे, भावना व विचार यांच्याशी माझा एक प्रकारचा ऋणानुबंध निर्माण झाला आहे. या लेखनात शब्दांकन आहे, तसे लेखनिकाला सांगून वा एकटाकी लिहिलेले लेखन असे सर्व प्रकार आहेत. एक प्रकारे संमिश्र शैलीची लेखनपद्धती यात आहे.
साहित्य क्षेत्रात कसल्याही नव्या अधिकाराचा दावा करण्यासाठी या पुस्तकाचे प्रकाशन होत नाही. साहित्य क्षेत्रात माझी मूळ आणि आवडती भूमिका ही रसिक वाचकाची आहे; आणि मला वाटते, की ही वाचकाची भूमिका खऱ्या अर्थाने स्पर्धातीत व टिकून राहणारी भूमिका आहे. शब्दांच्या सामर्थ्यावर व सौंदर्यावर माझा नितांत विश्वास आहे. नवनिर्मितीचे सर्जनशाली कार्य जसे शब्द करतात, तसेच साम्राज्यशक्ती धुळीला मिळविण्याचे संहारक सामर्थ्यही शब्दांत आहे. कल्पना, विचार आणि शब्द यांचा त्रिवेणी संगम ही मानवी इतिहासातील एक जबरदस्त शक्ती आहे. शब्द हे साहित्यिकांचे प्रमुख शस्त्र आहे. तर मी ज्या कार्यक्षेत्रात गेली जवळजवळ पन्नास वर्षे क्रियाशील आहे, त्या राजकारणाचेही प्रमुख माध्यम शब्दच आहेत. या अर्थाने साहित्यिक व राजकारणी शब्दबंधू आहेत. शब्दांचे आणि आमचे हे साहचर्य व सौहार्द पुराणे आहे. साहित्याच्या क्षेत्राशी काही नाते सांगावयाचे असेल, तर एवढेच आहे.
ऋणनिर्देश करावयाचा म्हटले, तर महाराष्ट्र टाइम्स, केसरी, सह्याद्रि, सकाळ, राजस, आदी नियतकालिकांचा आभारपूर्वक उल्लेख करणे मी माझे कर्तव्य मानतो. या नियतकालिकांमध्ये हे लेख प्रथम प्रसिद्ध झाले होते.
काही लेखांच्या शब्दांकनाचे सहकार्य दिल्याबद्दल माझे मित्र 'केसरी'चे श्री. रामभाऊ जोशी व पूर्वीचे 'महाराष्ट्र टाइम्स'चे श्री. वि. ना. देवधर यांचे मी आवर्जून आभार मानतो.
पुस्तकासाठी लेखांचे संकलन करण्याच्या कामी माझे मित्र श्री. गोविंदराव तळवलकर यांचे मला फार साहाय्य झाले आहे.
शेवटी श्री. सर्जेराव घोरपडे यांनी पुस्तक-प्रकाशनाच्या सर्व बाबींमध्ये जे आपुलकीने लक्ष घातले, त्याबद्दल मी त्यांचाही ऋणी आहे.
२६ जानेवारी, १९७९
यशवंतराव चव्हाण