ऋणानुबंध (158)

मी आपणा सगळ्यांची माफी मागून एक गोष्ट सांगणार आहे. ब-याच शतकांनंतर मराठी 'ययाति'ने दिल्ली आपलीशी केली. मी जिंकली म्हणत नाही. यामुळे भाऊसाहेबांची कीर्ती अमर झाली. हे सर्व जरी खरे असले, तरी माझ्या वैयक्तिक मताने भाऊसाहेबांच्या दुस-या काही कलाकृती 'ययाति'पेक्षाही मोठ्या आहेत. अर्थात भाऊसाहेबांना कोणी विचारले, की तुमची आवडती कादंबरी कोणती? तर आईला तुझा लाडका मुलगा कोणता, हे विचारण्यासारखे होईल, म्हणून मी त्यांना तसे विचारू इच्छीत नाही. पण इतरांना काय आवडते, हे सांगण्याचा अधिकार आहे, असे मी मानतो. 'ययाति' तर आता श्रेष्ठ ठरली आहेच, पण भाऊसाहेबांनी १९३० ते १९४० च्या काळात जे लेखन केले आहे, त्यात मराठी जीवनाचे आणि विशेषत: मध्यमवर्गीय जीवनातील संघर्षाचे जे चित्रण आहे, ते सामान्यत: मराठी मनाचे प्रतीक आहे. तो संघर्ष ज्या जाणिवेने भाऊसाहेबांनी त्या काळामध्ये मांडलेला आहे, त्यामुळे त्या कालखंडातील भाऊसाहेबांची पुस्तके अजूनही माझी आवडती आहेत, असे मी नम्रतेने सांगू इच्छितो.

मी इथे येण्यापूर्वी, भाऊसाहेबांच्या संदर्भात बोलायचे, तेव्हा त्याच्या लेखनातील आपल्याला काय आवडते, ते पुन्हा एकदा चाळले पाहिजे, म्हणून चौकशी करायला गेलो, तेव्हा समजले, की त्यांची 'दोन ध्रुव' कादंबरी प्रकाशकांनी पुन्हा प्रसिद्ध केलेली नाही. यासंबंधीची तक्रार मला जाहीरपणे करायची आहे. बाजारात ती मिळत नाही. एका प्रकाशक मित्राच्या मदतीने लायब्ररीतून आणून मी ती पुन्हा एकदा चाळली. 'दोन ध्रुव' सारखीच त्यांची 'पांढरे ढग' ही माझी अतिशय आवडती कादंबरी आहे. माझ्या माहितीप्रमाणे त्यांचीही आवडती आहे. आता 'ययाति' आणखी जास्त आवडती झाली असेल, तर ते योग्य आहे. हे मी सर्व सांगतो आहे, ते अशाकरिता, की माझ्या मते 'दोन ध्रुव' व 'पांढरे ढग' हे मराठी मध्यमवर्गीयांच्या जीवनाचे अत्यंत समर्पक असे चित्रण आहे. कोणत्याही देशामध्ये आणि समाजामध्ये मध्यमवर्ग हा एक महत्त्वाचा तसाच एक विशिष्ट वर्ग मानला जातो. यासंबंधाने काही चांगल्या इंग्रजी ग्रंथकारांनी केलेले मोठे अर्थपूर्ण विश्लेषण माझ्या वाचनात आले आहे. आपल्याही मध्यमवर्गाचे असेच आहे. मध्यमवर्गामध्ये काही उच्च मध्यमवर्गीय भाग आहे, गरीब मध्यमवर्गीय भाग आहे. त्याचे भाऊसाहेबांनी फार सुरेख वर्णन केले आहे. मध्यमवर्गातला हा जो वरचा भाग असतो, तो, त्याच्यापेक्षा जे वरचे लोक असतात, त्यांच्याकडे वळायच्या नादात, पळायच्या नादात असतो. जो हजार-पंधराशे रुपयांच्या वरच्या उत्पन्नाचा वर्ग म्हणा, फार तर, त्यात पंधराशेचे दोन हजार आणि दोन हजारांचे अडीच हजार कसे होतील, या नादात असतो. परंतु मध्यमवर्गाचा जो लहान मध्यम म्हणून ज्याला गरीब मध्यमवर्ग म्हणतात, त्याची नजर वरती नसते, तर त्याची नजर खाली असते. जो आपल्यापेक्षा गरीब आहे, दुबळा आहे, जो दलित आहे, त्याच्या दु:खांना वाणी देण्याचा किंवा वाचा फोडण्याचा तो प्रयत्न करीत असतो.