• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

ऋणानुबंध (17)

या सर्वांपेक्षा एकोणीसशे सत्तेचाळीस-अठ्ठेचाळीसमधील एका प्रसंगाने अजून माझे अंत:करण हेलावते. माझे जिवलग मित्र के. डी. पाटील यांची हत्या झाल्यानंतरचा तो प्रसंग. मी त्या वेळी गृहखात्याचा उपमंत्री होतो. श्री. के. डी. पाटील यांच्यावर आमदार चंद्रोजी पाटलांच्या खुनाचा आळ येऊन सगळीकडे काहूर उठले होते. काही मतलबी मंडळींनी या प्रकरणात मलाही बदनाम करण्याचा प्रयत्न केला. हे प्रकरण त्या वेळी एवढे विषारी बनले, की त्यातून के. डी. पाटलांचा बळी तर पडलाच, परंतु माझ्याही जिवाला धोका करण्याची तयारी काही लोकांनी केली. अंतर्गत मतभेद अतिशय वाढले होते आणि मी केव्हा सापडतो, याची ते वाट पाहत होते. मी त्या वेळी मुंबईत असे. जिवाला धोका होईल या भीतीने नव्हे; परंतु कामाच्या गर्दीमुळे मला बरेच दिवस बाहेर पडता आले नव्हते. माझे थोरले बंधू त्या वेळी कराडला आजारी होते. कराड स्टेशनजवळच्या कल्याणी बिल्डिंगमध्ये त्यांना ठेवले होते. त्यांची प्रकृती बरीच अत्यवस्थ होती. त्यामुळे निदान उभाउभी त्यांना एक रात्र तरी जाऊ न भेटून यावे, असा विचार करून मोटारीने मी कराडला गेलो. दुपारी तीनच्या सुमारास मी कल्याणी बिल्डिंगमध्ये पाहोचलो. बंधूंच्या जवळ बसून तास - दोन तास मनमोकळे बोललो आणि सहज सिगारेट ओढावी, म्हणून खोलीच्या मागच्या बाजूला गच्चीत जाऊन खुर्चीवर बसलो. कल्याणी बिल्डिंगच्या गच्चीपासून, कराड स्टेशनचा भाग अगदी नजरेच्या टापूतील आहे. माझी थोरली बहीण त्या वेळी तेथेच होती. तिच्याशी बोलत बोलत, स्टेशनच्या आवाराकडे पाहत मी सिगारेट ओढीत होतो. कसल्या तरी विचारतंद्रीत मी होतो आणि तितक्यात स्टेशनबाहेरचा सिग्नल पडताना मी पाहिला. का, कोणास ठाऊक, परंतु माझ्या अंत:करणाला एकदम धक्का बसला. कोणी तरी मला बोलावीत आहे, असे मला सारखे वाटू लागले आणि त्या तंद्रीतून मी एकदम जागा झालो. कल्याणी बिल्डिंगमध्येच नव्हे, तर कराडातही यापुढे एक क्षणही थांबायचे नाही, या विचाराने मनाचा ताबा घेतला आणि मी तिथून तडक निघालो. भावाला तशा स्थितीत टाकून जाणे योग्य नव्हते. अंत:करणाच्या तारा तुटाव्यात, असा तो प्रसंग होता. मी एकाएकी असा टाकून निघाल्यामुळे बहीणही रागावली होती, परंतु त्या कशाचाही परिणाम माझ्यावर होत नव्हता. मी जो निघालो, तो स्टेशनात उभ्या असलेल्या गाडीत बसलो आणि पुण्यास निघून आलो.

खरा प्रसंग यापुढचाच आहे. मी कराडात आलो आहे, अशी चाहूल माझ्या शोधात असलेल्या मंडळींना लागली असली पाहिजे. कारण त्या रात्री मध्यान्ह उलटल्यावर दोनच्या सुमारास सहा जवान ठासलेल्या बंदुका, भाले, कुऱ्हाडी घेऊन कल्याणी बिल्डिंगवर चाल करून आले. दारावर धक्के मारून दार फोडण्याचा प्रयत्न झाला. मी तेथे त्या रात्री योजिल्याप्रमाणे असतो, तर प्रसंग बाका नक्कीच होता. हां हां म्हणता ती बातमी गावात पसरली. पोलिसांपर्यंत पोहोचली आणि सर्वत्र धावाधाव झाली. मारेकरी घरात घुसून पळून गेले होते. त्यामुळे मला त्यांनी पळवून नेले असावे, हा सर्वांचा समज झाला व त्यामुळे सर्वत्र एकच आकांत माजला. रात्रीतून सर्वत्र तारा झाल्या. शोधाशोध सुरू झाली. मी त्या वेळी पुण्याच्या इन्स्पेक्शन बंगल्यात झोपलो होतो. पुण्याच्या पोलिसांना मी पुण्याला असल्याचे माहीत झाले होते. त्यामुळे शेवटी त्यांनी उलट संदेश पाठवून माझी खुशाली कळविली आणि सकाळी मला रात्रीचा भीषण प्रसंग सांगितला.
त्या प्रसंगाची मला जेव्हा जेव्हा आठवण येते, तेव्हा मला बोलावणारा तो रेल्वेचा सिग्नल दिसू लागतो. त्या सिग्नलच्या बोलावण्याचा अर्थ समजून घेण्याचा मी खूप प्रयत्न केला आहे. परंतु या सर्व गोष्टींचा अन्योन्यसंबंध जुळवून देणारा मला अजून कोणी भेटला नाही. एवढे मात्र खरे, की तो खुणेचा हात नियतीचा होता, असे मला नेहमी वाटते.