• 001_Krishnakath.jpg
 • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
 • 003_Shabdhanche.jpg
 • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
 • 005_Saheb_14.jpg
 • 006_Yashodhan_76.jpg
 • 007_Yashodharshan.jpg
 • 008_Yashwant-Chintanik.jpg
 • 009_Kartrutva.jpg
 • 010_Maulik-Vichar.jpg
 • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
 • 012_Sahyadricheware.jpg
 • 013_Runanubandh.jpg
 • 014_Bhumika.jpg
 • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
 • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
 • Debacle-to-Revival-1.jpg
 • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
 • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
 • sing_3.jpg

ऋणानुबंध (2)

ऋणानुबंधाचे धागे

गतवर्षी थोडा मोकळा वेळ मिळाला, तेव्हा जुन्या कागदपत्रांचे संकलन करावे, असा विचार करून, काही वर्षांत साठलेला पत्रव्यवहार धुंडाळू लागलो. गेल्या सोळा वर्षांत दरसाल मी अधूनमधून काही ना काही लिहीत, बोलत आलो आहे आणि हे सर्व कुठे ना कुठे तरी वृत्तपत्रात वा मासिकात प्रसिद्ध झाले आहे. त्या सर्वांबाबत परिचित आणि अपरिचित मित्रांकडून नेहमीच पत्रांद्वारे प्रतिक्रिया येत होत्या. या वेळी पत्रव्यवहार पाहत असताना त्यातील लेखन वा भाषण आवडल्याच्या प्रतिक्रिया कळविणाऱ्या काही पत्रांनी माझे विशेष लक्ष वेधून घेतले. त्यांतल्या काही लेखनाबाबत माझ्याही आठवणी बुजत चालल्या होत्या. तेव्हा मनाशी विचार आला, की हे सर्व लेखन विस्मृतीत विस्कटून टाकण्यापेक्षा एकत्र ग्रंथबद्ध करून पुन्हा वाचकांना सादर करणे हे उचित होईल.

माझ्या चिंतनाचा प्रमुख विषय राजकारण आहे. त्यामुळे स्वाभाविकच मुलाखती, भाषणे व लेखन प्रमुखत: त्या विषयाच्या पार्श्वभूमीवर होणे अपरिहार्य आहे. असे असले, तरीही त्यातील काही लेखनाचा उद्देश राजकीय नव्हता. वैयक्तिक जीवनातील काही आठवणी, व्यक्ती व प्रसंग उबदार घर करून मनात राहतात, तशा त्या होत्या. त्यासंबंधीचे शब्दबद्ध झालेले काही लेखन ललित स्वरूपाचे झाले आहे. हे लेखन केवळ राजकीय स्वरूपाच्या इतर लेखांपासून अलग करून पुस्तकरूपाने प्रसिद्ध करावे, असा मी निर्णय केला.

'ऋणानुबंध'चा प्रपंच सुरू झाला, तो असा.

राजकीय लेखन ललित लेखनापासून अलग करणे तसे सोपे गेले; परंतु विचारप्रधान लेखांची ललित लेखांपासून संपूर्ण फारकत करणे शक्य नव्हते आणि आवश्यकही नव्हते. साहित्यविषयक विचार अशा ग्रंथात चपखलपणे बसतील, म्हणून साहित्य संमेलनातील दोन भाषणे, वाचनविषयक एक लेख व चरित्रे आणि आत्मचरित्रे यासंबंधीची चर्चा या संग्रहात समाविष्ट केली आहे.

ललित लेखनाचा आत्मा केवळ शब्दलालित्यात नाही. विचारांच्या पार्श्वभूमीवर भावविश्वात
न्हाऊन निघालेली जिवंत अनुभूती व्यक्त होताना ललित रूपच घेते. मग ही अनुभूती कोणत्याही क्षेत्रातील का असेना ! या माझ्या विचाराच्या आधारावर काही राष्ट्रपुरुष, सामाजिक व राजकीय क्षेत्रांतील मोठी माणसे, त्याचप्रमाणे साहित्य क्षेत्रातील प्रथितयश साहित्यिकांसंबंधीच्या माझ्या भावना आणि विचार ज्या लेखांत किंवा भाषणांत व्यक्त झालेले आहेत, ते सर्व लेख मी या पुस्तकात सामावले आहेत.