• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

ऋणानुबंध (159)

भाऊसाहेबांच्या या काळामधल्या ग्रंथांमध्ये, कथांमध्ये, विचारांमध्ये मी हे सामाजिक सत्य पाहिले. त्यांच्या 'पांढ-या ढगा'तला स्पेनची लढाई आणि रशिया पाहून आलेला नरेंद्र, नायकाला पत्र लिहितो आणि त्यात जन्मभर लक्षात ठेवावे, असे एक वाक्य आहे. आठवणीने सांगतो - माझी आठवण पक्की आहे - ती कादंबरी १९३०-४० च्या सुमारास, मला वाटते, प्रसिद्ध झाली होती. माझ्यासारखी अनेक तरुण माणसे या लढ्यात हिंदुस्थानात काय करणार, या वेडाने उगीचच अस्वस्थ झाली होती. आपल्याही परीक्षा हुकल्या तरी चालेल, असे धोके पत्करायला मन उत्सुक होते. मी कादंबरीतील नरेंद्रासंबंधी बोलत होतो. तो नरेन्द्र म्हणजे सामान्य, तुमच्या -आमच्यामधलाच मनुष्य आहे. म्हणजे तुम्ही आम्ही स्वत:लाच प्रश्न विचारतो आहोत, असे समजा. त्याने असा प्रश्न विचारलाय्, की तत्त्वज्ञानाची अनेक पुस्तके तोंडपाठ करूनसुद्धा मनुष्य चुका करतो, याचे कारण काय? आणि उत्तरही तोच देतो, की याचे कारण एकच आहे, की तो एक पुस्तक वाचायचे अजिबात विसरलेला असतो आणि ते पुस्तक म्हणजे मानवी जीवन; आणि माझ्या मते हे खरे आहे. ज्याला माणसाच्या जीवनातील सुखदु:खे व त्यांपाठीमागच्या प्रेरणा, त्यांच्या यातना-वेदना समजल्या नाहीत, तो कदाचित पांढ-यावरती काळे करू शकतो. पण शेकडो वर्षे टिकून राहील, असे जिवंत वाङ्मय निर्माण करू शकणार नाही. मराठी साहित्य क्षेत्रात पुष्कळ वाद झाले. कलेकरिता कला की जीवनाकरिता कला आणि अशा त-हेचे अनेक वाद झाले. पण भाऊसाहेब खांडेकर हा एक माणूस असा आहे, की ज्याने ते आग्रहाने सांगितले, की तुम्ही नुसत्या काल्पनिक आनंदाच्या गोष्टी बोलून भागणार नाही. तुमच्या लेखनाला जर काही विचारप्रेरक असा दृष्टिकोन नसेल, तुमच्या लेखनाला जर काही सामाजिक आशय नसेल, तर तुमचे लेखन हे खरे साहित्य होऊ शकणार नाही. कोल्हापूरसारख्या शहरामध्ये बसून या माणसाने लिहिलेले लेखन उत्तर प्रदेशाच्या, बिहारच्या, उंच पहाडावरील काश्मीरच्या लोकांच्या मनापर्यंत जाऊन पोहोचले. याचे खरे कारणच हे आहे, की शेवटी माणूस हा एक आहे. तो कोल्हापुरात राहत असेल किंवा श्रीनगरमध्ये राहत असेल, कदाचित तो तामीळनाडूच्या एखाद्या कोप-यात राहत असेल, पण त्याच्या काही मूलभूत भावना या एकसूत्र आहेत. त्या भावनांना स्पर्श करण्याचे सामर्थ्य ज्या लेखणीत आहे, ती लेखणी ही खरी साहित्यिक लेखणी आहे. मघाशी कुणी तरी म्हटले, ते खरे आहे. खांडेकरांना आपण महाराष्ट्रीय म्हणतो. तामीळनाडूची माणसे म्हणतात, की हा आमचा लेखक आहे. त्यांना माहीत नाही, ते कोण आहेत. मराठीमध्ये जेवढ्या 'दोन ध्रुव'च्या आवृत्त्या निघालेल्या आहेत, त्यांच्यापेक्षा जास्त आवृत्त्या तामीळमध्ये निघाल्या आहेत.

मला समजलेली खांडेकरांची भूमिका मी आपल्याला सांगत होतो. दोन स्वरूपाच्या मध्यमवर्गीय समाजाचे चित्रण करीत असताना त्यांनी असा मध्यमवर्गीय रंगवला आहे, की जो स्वत: गरीब आहे आणि त्याच्यातून लहान, पण वेदनेत अडकलेला जो समाज आहे, त्याला वर उचलून घेण्याचा प्रयत्न करण्यामध्ये ज्याला आनंद आहे. स्वत:च्या जीवनातील रंगेल खेळ मांडण्यापेक्षा शिकार करावयाची असेल, तर सामान्य जनांकरिता आपल्या जिवाची शिकार केली पाहिजे, हे आवाहन करणारा हा माणूस आहे. मला आठवते, त्यांची 'दोन ध्रुव' कादंबरी मी प्रथम कोल्हापूरमध्ये वाचली. १९३४-३५ साली मी कोल्हापूरला प्रथम आलो होतो. ही नवीन कादंबरी हातात आली, तेव्हा आषाढ-श्रावणाचा पाऊस धो धो पडत होता. कॉलेजमध्ये गेले नाही, तरी चालेल, असे मनाने ठरविले होते; आणि खोलीमध्ये थंडी वाजते, म्हणून निमित्त करून अंगावर हलकेसे पांघरूण ओढून मी त्यांची 'दोन ध्रुव' ही कादंबरी पहिल्यांदा वाचली, असे मला आठवते.