सिंडिकेट काँग्रेस तरीहि संपलेली नव्हती. देशांत अन्यत्र त्यांना पाठिंबा होताच. म्हैसूर आणि गुजरात काँग्रेस-कमिटी व या दोन्ही राज्यांतील सरकारचा त्यांनाच पाठिंबा होता. सिंडिकेटनं मग आपलं खुलं अधिवेशन डिसेंबरला अहमदाबादला आयोजित केलं. त्यानंतर एक आठवड्यानं मुंबईला सत्ताधारी काँग्रेसचं जें अधिवेशन झालं त्यापेक्षा अहमदाबादच्या काँग्रेसला लोक अधिक संख्येनं हजर होते; परंतु सिंडिकेडला आपली मुळं खोलवर कधीहि रुजवतां आलीं नाहीत.
सिंडिकेटबद्दल यशवंतरावांचं असं स्पष्ट मत होतं की, या काँग्रेसला जनतेचा पाठिंबा नाही आणि त्यांना तो मिळवतांहि येणार नाही. एक तर सर्व प्रतिगाती त्या ठिकाणीं एकत्र आलेले होते आणि त्यांच्यापैकी, कामराज वगळतां कोणामध्ये पुरोगामी दृष्टि नव्हती. कामराजांबद्दल मात्र नेहमीच एक कोडं निर्माण झालेलं असायचं. त्यांच्याशी चर्चा करतांना किंवा ते आपलं मत व्यक्त करतांना नेहमी पुरोगामी ध्येय-धोरणालाच पाठिंबा देत असत; परंतु प्रत्यक्ष कृतीची वेळ आल की, ते अतुल्य घोष आणि त्यांचे मित्र यांच्याबरोबर रहात असत.
काँग्रेसमध्ये दुफळी होऊनहि पंतप्रधानांच्या गटाला बहुमत मिळालं होतं, तरी यशवंतरावांची पक्षाच्या भवितव्याबद्दलची चिंता कमी झाली नाही. काँग्रेसाठी राष्ट्रीय पातळीवर अधिकांत अधिक पाठिंबा संपादन करण्यावरच त्यांनी भर दिला. कारण आता ध्रुवीकरणाचे, निरनिराळे राजकीय गट एकत्र येण्यासाठी अनुकूल वातावरण निर्माण झालं होतं. कांही झालं तरी, सत्ताधारी काँग्रेसला आता संघटना काँग्रेसशीं कांहीहि कर्तव्य उरलेलं नाही, असं यशवंतरावांचं मत होतं. सुरुवातीच्या काळांत तरी तशीच परिस्थिती होती. सार्वत्रिक निवडणुकीच्या वेळींच सगळे डावपेंच पुढे येण्याची शक्यता गृहीत धरण्यांत येत होती. सत्ताधारी काँग्रेसला लोकप्रिय बनवण्याचं काम त्यांच्या दृष्टीनं सोपं नव्हतं. तरी पण दरम्यानच्या काळांत झालेल्या पोट-निवडणुकांमध्ये सत्ताधारी काँग्रेसला अनुकूल वातावरण लाभलं. त्यामुळे वारं कोणत्या दिशेनं वाहत आहे हें कांहीसं स्पष्ट झालं. वा-याची हीच दिशा कायम रहाणार आहे, की त्यांत कांही बदल घडणार, हें आता आगामी निवडणुकांवर अवलंबून होतं.