mi pahilele yashwantrao
मी पाहिलेले यशवंतराव

संपादिका : डॉ. सरोजिनी बाबर
--------------------------------

pdf inmg Ebook साठी येथे क्लिक करा 

१. आमचे नाते भावाभावाचे – वंसतदादा पाटील

सांगली जिल्ह्याच्या तासगाव तालुक्यातील अंकलखोपचा कृष्णाकाठ, प्रचंड जनसमुदायाने गजबजला होता. या ठिकाणी एका जाहीर समारंभात गेली चार वर्षे व पंधरा दिवस चालत राहिलेले, वैचारिक मतभेदातून व गैरसमजातून चालू झालेले आणि विनाकारण धुमसत राहिलेले माझे आणि यशवंतरावांचे भांडण कृष्णामाईच्या साक्षीने संपणार होते. आम्ही दोघे जिवाभावाचे मित्र. आम्ही चाळीस वर्षे खांद्याला खांदा लावून काम केले होते. स्वातंत्र्य संग्राम, संयुक्त महाराष्ट्र चळवळ, अशा कितीतरी समरप्रसंगात आणि कित्येक आनंदाच्या प्रसंगी, जबाबदारीच्या, कोंडी करणा-या प्रसंगात आम्ही एकमेकांच्या बरोबर राहिलो. पण क्षुल्लक कारणासाठी आम्ही भांडलो. आमचे हे भांडण आमच्यापुरतेच राहिले नव्हते, तर महाराष्ट्राच्या घराघरात ते जाऊन पोचले होते. एक प्रकारची यादवी निर्माण झाली होती. खरे म्हणजे कोणालाच, आम्हा दोघांनाही, ही स्थिती आवडत होती असे नाही. आम्हालाही यातून मार्ग काढून बाहेर पडायचे होते. २४ मे १९८२ रोजी अंकलखोपला झालेल्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने आम्हा दोघांच्या मित्रमंडळींच्या प्रयत्नांना यश आले आणि आमची दिलजमाई झाली.

या कार्यक्रमासाठी आम्हा दोघांवर, महाराष्ट्रावर, प्रेम करणा-यांची गर्दी जमली होती. राजकीय, सामाजिक, सहकारी क्षेत्रातील नेते, कार्यकर्ते जमा झाले होते. गावक-यांनी आम्हा दोघांच्या ऐक्याचे निमित्ताने आमची फुलांनी सजवलेल्या उघड्या जीपमधून ऐक्य मिरवणूक काढली होती. त्यानंतर सभास्थानी आम्हाला भगवे फेटे बांधण्यात आले होते. आपल्याला बांधण्यात आलेल्या फेट्यामुळे माझे भाषण नीट ऐकू येत नाहीसे वाटल्यावरून यशवंतरावांनी आपला फेटा काढून ठेवला आणि टोपी डोक्यावर चढवली. या सभेत मी केलेले भाषण उत्सुकतेने ऐकले. कारण आम्ही दोघे केवळ मित्रच नव्हतो तर त्यांनीच त्या सभेत म्हटल्याप्रमाणे - ‘आमचे नाते पुढारी अनुयायाचे नसून, मित्रामित्राचे, भावाभावाचे’ होते.

या वेळच्या भाषणात मी म्हटले होते, ‘‘आम्ही दोघे भांडलो, परस्पर विरोधी मतप्रदर्शन केले, जे बोलू नये ते बोललो. या भांडणाने उभ्या महाराष्ट्राचे नुकसान झाले. हे भांडण घराघरात, चुलीपर्यंत गेले. हे काम वैराचे असल्याची अनेकांची समजूत झाली. संपत्तीने मोठे झालेल्या यादव कुलाचा नाश झाला. त्याप्रमाणेच आमच्या भांडणाने माणसे व कार्यकर्ते फरफटले गेले. त्याबद्दल मी महाराष्ट्राची माफी मागतो. पक्षांतर्गत यादवीमुळे प्रथम भांडणा-या व्यक्ती व नंतर पक्ष खड्ड्यात जातो याची मला जाणीव झाली.

मी जन्मभर यशवंतरावांना नेता मानले. मला वाढविण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. त्यांचे उपकार मी कधीही विसरणार नाही, आणि पुन: कधी त्यांच्याशी भांडणार नाही. आम्ही एकोप्याने संघटनेचे जनहिताचे काम करत राहू अशी मी हमी देतो.

यानंतरच्या भाषणात यशवंतराव म्हणाले, ‘‘दादांचे भाषण मी लक्षपूर्वक ऐकले आणि मन भरून आले. आमच्या भांडणाने महाराष्ट्राचे नुकसान झाले का नाही हे मला माहीत नाही, पण आम्हा दोघांचे मात्र फारच नुकसान झाले.’’

या सभेत आम्ही दोघांनीही खुल्या दिलाने महाराष्ट्राची माफी मागितली आणि त्या वेळी हमी दिली, त्याप्रमाणे पुन: कधीही भांडलो नाही. आमचे भांडण आम्ही नेहमीसाठी कृष्णेच्या पवित्र पाण्यात विसर्जन करून टाकले होते...