"यशवंतराव आणि महाराष्ट्रातील सामाजिक परिवर्तन"
अध्यक्ष महोदय श्री. पाटील, उपनगराध्यक्ष श्री. शिंदे, ग्रंथपाल श्री. पाटील आणि उपस्थित बंधुभगिनींनो, आज मी या ठिकाणी व्याख्यानासाठी उभा राहिलो आहे, तो प्रथमतः या जाणीवेने की आज यशवंतराव चव्हाण यांचा जन्मदिन आहे. गेली पन्नास वर्षे त्यांचा आणि माझा स्नेहसंबंध होता आणि या जन्मदिनाच्या दिवशी आम्ही कोठेही एका गावात हजर असलो तर त्या दिवशी मी आवर्जून यशवंतरावांच्या निवासस्थानी त्यांच्या भेटीसाठी जात असे. एकतर त्यांच्याबद्दलच्या सदिच्छा व्यक्त करण्यासाठी मी जात असे. त्याचप्रमाणे त्यांच्याबद्दलचा भक्तिभाव प्रगट करण्याचीही त्यामध्ये माझी भावना असे.
आज सांगलीहून कराडला येताना सहज मी विचीर करीत होतो, माझी व चव्हाणांची पहिली भेट केव्हा झाली? मला नक्की आठवतंय की कराडला एका नाक्यावरच कोठेतरी आम्ही भेटलो होतो. १९३६-३७ साल असेल ते. एक सामान्य शेतकरी कार्यकर्ता म्हणून ते माझ्यापाशी आले. वयाच्या १७ व्या वर्षी राजकारणात भाग घेण्याची त्यांना स्फूर्ती आली आणि मी निश्चितपणे सांगू शकतो की या राजकारणामध्ये तनमन आणि धन अर्पण करण्याची भावनाही त्याचवेळी त्यांच्या अंतःकरणात रुजलेली होती. त्यावेळी मी कर्नाटक पब्लिशिंग हाउसमध्ये नोकरी करीत होतो आणि शिक्षण विषयक क्रमिक पुस्तकांच्या प्रचारासाठी मला त्या पब्लिशिंग हाउसने गाडीही वापरासाठी दिलेली होती. त्या सुमारास मी रॉयवादी झालेला होतो आणि क्रांतिकारक अभिनिवेशाने आमच्या पक्षाच्या प्रचाराचे कामही मी त्याचवेळी करीत असे. यशवंतराव हे आमच्याकडे आकर्षित झालेले होते, त्याचे कारण तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, ह. रा. महाजनी, भय्याशास्त्री वाटवे ही त्यांची सारी मित्रमंडळी रॉयपक्षाजवळ आलेली होती. त्या सर्व मंडळीबरोबर हिंडण्यात, त्यांच्याशी सुखसंवाद करण्यात मला फार आनंद होत असे, यशवंतरावांनी पहिल्या भेटीतच माझ्यावर प्रभाव पाडला यात संशय नाही.
मला आठवतंय की त्यानंतर आम्ही इस्लामपूर मार्गे शिराळ्याला गेलो. तेथे यशवंतरावांचे एक मित्र बळवंतराव कदम हे रहात होते. रात्री ११-११।। वाजता आम्ही कदमांच्या घरी पोहोचलो आणि त्यांचं आदरातिथ्य काय सांगू? सातारा जिल्ह्याच्या ग्रामीण भागाचंच ते आदरातिथ्य म्हणायला हरकत नाही. त्यांनी लगेच घरच्या मंडळींना सांगितलं. “यशवंतराव, महाजनी, कर्णिक अशी थोर मंडळी आली आहेत. त्यांना कोंबडीचंच जेवण दिलं पाहिजे” त्या रात्री बळवंतराव कदमांनी आम्हाला जे अगत्यानं जेवण घातलं ते उरकेपर्यंत रात्रीचे तीन वाजले होते. मी प्रांजलपणे सांगतो की ग्रामीण महाराष्ट्राचं जे विलोभनीय दर्शन मला घडलं ते यशवंतरावांच्यामुळेच होय.
त्यानंतरच्या काळात महाराष्ट्राचे पार्लमेंटरी सेक्रेटरी, मंत्री, मुख्यमंत्री आणि दिल्ली दरबारातील मंत्री या अनेकविध नात्यांनी माझा यशवंतरावांशी संबंध जडला आणि त्या सा-या कालखंडामध्ये माझे आणि त्यांचे अगदी निकटचे आणि जिव्हाळ्याचे संबंध प्रस्थापित झाले. ही जी संधी मला लाभली ते मी माझे भाग्यच समजतो. आज त्यांच्याबद्दलच्या ज्या आठवणी माझ्या मनश्चक्षू समोरून तरळून जात आहेत त्यातून मला प्रतीत होत आहे ती त्यांची शालीनता. सा-या जबाबदारीच्या स्थानावर आरूढ झाल्यानंतरही यशवंतरावांनी सर्वांना समजुतदारपणाची वागवणूक देऊन आणि सर्वांना म्हणजे प्रतिपक्षीयांनाही सांभाळून घेऊन त्यांनी राष्ट्रगाडा चालविला. चव्हाणांनी जे राजकारण घडवलं ते सहजासहजी साध्य होण्यासारखं नव्हतं. तत्वांशी फारकत न होऊ देतां त्यांना ते राजकारण घडवावयाचं होतं. पण त्यांनी विचारपूर्वक, विशिष्ट ध्येय डोळ्यासमोर ठेवून आणि यशापयशाची सारी जाणीव ठेवून आपलं कार्य निर्धारानं चालू ठेवलं आणि कालांतरानं एकेक क्षेत्रात यश संपादन करून त्यांनी महाराष्ट्रातच नव्हे तर भारतीय जीवनात सुद्धा एक मोलाचं, मानाचं स्थान मिळवलं.

 
																									
						
					 
																									
						
					 
																									
						
					 
																									
						
					 
																									
						
					 
																									
						
					 
																									
						
					 
																									
						
					 
																									
						
					 
																									
						
					 
																									
						
					 
																									
						
					 
																									
						
					 
																									
						
					 
																									
						
					 
																									
						
					 
																									
						
					 
																									
						
					 
																									
						
					 
																									
						
					 
			 
									 
			