भाग २ विधानपरिषदेतील भाषणे-६

१० व्या कलमाचा येथे उल्लेख करण्यात आलेला आहे तेव्हा ते संबंध कलम ती वाचून दाखवितो ते असे आहेः

“We realise the long association of the people of Mahavidarbha with Nagpur as a capital of their State and the various advantages consequently derived by them from it.  We are anxious that subject to the efficient conduct of administration of a single State those advantages should be preserved to the extent possible.

In the matter of services under Government or Government controlled enterprises--of all grades--recruitment will be in proportion to the population of the respective units.”

म्हणजे हे नागपूर राजधानीचे शहर असताना नागपूरच्या किंवा विदर्भाच्या लोकांना जे काही फायदे मिळत होते ते त्यांना शक्य तितक्या प्रमाणात ते महाराष्ट्रात आल्यानंतरही मिळावेत अशी आमची इच्छा आहे. परंतु त्याचबरोबर महाराष्ट्र राज्यामध्ये आम्हाला चांगल्या प्रकारची कार्यक्षम अशी कारभारयंत्रणा असलेले एक एकजिनसी एकराज्य उभे करावयाचे आहे ही गोष्टही विसरता कामा नये. या दृष्टीने एकराज्याच्या कल्पनेशी विसंगत किंवा त्या कल्पनेला ज्या योगे कोणत्याही प्रकारे तडा जाईल अशी कोणतीही गोष्ट महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री या नात्याने निदान मी तरी करणार नाही. हा ठराव म्हणजे महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या वेळी या सरकारचे जे धोरण घोषित करण्यात आले होते त्या धोरणाच्या अंमलबजावणीचा एक भाग आहे.

त्यामध्ये अधिकाधिक एकत्र येण्याचा आणि एकमेकांचे संबंध अधिकाधिक दृढ करण्याचा प्रयत्न आहे. त्यामध्ये आम्ही कोणाकरिता काही त्याग करीत आहोत किंवा कोणाला काही देऊन त्याच्याकडून त्याच्या मोबदल्यात आम्हाला परत काही मिळवावयाचे आहे किंवा आम्ही मुद्दामहून कोणाचे काहीतरी अपीजमेंट करीत आहोत किंवा कोणावर काहीतरी फेव्हरिटिझम करीत आहोत, अशी आमची मुळीच भावना नाही. त्या बाबतीत माझे मन अगदी साफ आहे. कारण अपीजमेंट करून किंवा फेव्हरिटिझम करून राज्य कार्यक्षमपणे चालत नाही याची मला जाणीव आहे. परंतु त्याचबरोबर सन्माननीय सभासद श्री. सुभेदार आणि श्री. देशपांडे यांनी आपल्या भाषणात जो एक उल्लेख केला तोही लक्षात घेतला पाहिजे. ते म्हणाले की, पश्चिम महाराष्ट्रातील आम्हा लोकांसंबंधी, म्हणजे सातार्‍यातील लोकांसंबंधी किंवा पुण्यातील लोकांसंबंधी - सन्माननीय सभासद श्री. गोगटे यांना या बाबतीत मी माझ्याबरोबर घेऊ इच्छितो - विदर्भातील लोकांच्या मनात काही गैरसमज आहेत. या गैरसमजांना जागा राहू नये म्हणून एक-दोन पावले पुढे यावयाला आम्ही तयार आहोत आणि हा ठराव आमच्या त्या भावनेचा थोडासा निदर्शक आहे असे म्हटले तरी चालेल. अर्थात् कसलेही राजकीय प्रपोझिशन मांडलेले नाही. किंवा मी आताच सांगितल्याप्रमाणे त्यामध्ये कोणाकरिता काही त्याग करण्याची किंवा कोणाला खरीदण्याची किंवा कोणाला खुश करण्याची भावना नाही.

इतके, अध्यक्ष महाराज, या कल्पनेसंबंधी बोलल्यानंतर बाकीचे जे प्रश्न आणि समस्या आहेत त्यांच्यासंबंधी मला बोलावयाचे आहे. पहिली गोष्ट म्हणजे माझे सन्माननीय मित्र श्री. व्यास ६४ (टिप पाहण्यासाठी येथे क्लिक करा) यांचे भाषण कळकळीचे झाले. त्यांचा हेतू आणि सन्माननीय सभासद श्री. आवळे यांचा दृष्टीकोन यामध्ये तफावत आहे आणि ती स्वागतार्ह तफावत आहे असे माझे म्हणणे आहे. अध्यक्ष महाराज, माझ्या सगळया प्रयत्‍नांचा उद्देश हा आहे की, महाराष्ट्राचे एकजिनसी एकराज्य निर्माण व्हावे आणि त्या दृष्टीने माझे एक स्वप्न आहे, महत्वाकांक्षा आहे, असे आपण म्हणा पाहिजे तर. ते स्वप्न किंवा ती महत्वाकांक्षा अशी आहे की, आज जे माझे मित्र स्वतंत्र विदर्भाची मागणी करीत आहेत त्यांना माझ्या या प्रयत्‍नात विलिंग पार्टनर्स करून घ्यावयाचे. त्या दिवसाची मी वाट पाहात आहे - आणि तो दिवस लवकर यावा अशी माझी इच्छा आहे - की, ज्या दिवशी माझे स्वतंत्र विदर्भवादी मित्र महाराष्ट्राचे एकजिनसी एकराज्य निर्माण करण्याच्या प्रयत्‍नात माझे विलिंग पार्टनर्स होतील. लोकशाहीवर निःसीम विश्वास असणारा मी मनुष्य आहे आणि त्या दृष्टीने या सभागृहात माझ्याचबरोबर बसणार्‍या माझ्या काही मित्रांनी पृथक अस्तित्वाची इच्छा धरावी याचे मला दुःख होते. म्हणून त्यांचे मन माझ्या बाजूला वळविण्याचा आणि महाराष्ट्राचे एकजिनसी एकराज्य निर्माण करण्याचा माझा जो प्रयत्‍न आहे त्यामध्ये त्यांना विलिंग पार्टनर्स करून घेण्याचा माझा प्रयत्‍न आहे. कठीण प्रयत्‍न आहे, पण मी तो करणार आहे. अर्थात् मी म्हणजे सगळे राज्य, तुम्ही, आम्ही, सगळे लोक.