भाग २ विधानपरिषदेतील भाषणे-१३

या दृष्टीने कोणत्या खर्चाचे आकडे किंवा जी टार्गेटस् असतील त्यांचे निश्चित रूप देणे कठीण आहे. म्हणून असे ठरविण्यात आले आहे की, प्रत्यक्ष तिसर्‍या पंचवार्षिक योजनेचा आराखडा सभागृहापुढे विचारासाठी मांडण्याऐवजी ह्या योजनेसंबंधी जी दृष्टी आहे किंवा तिसर्‍या पंचवार्षिक योजनेसाठी म्हणून या राज्याचे जे प्रश्न आहेत त्याकडे पाहण्याचा जो दृष्टिकोन आहे, जी भूमिका आहे तो दृष्टिकोन आणि ती भूमिका सभागृहापुढे विचारासाठी मांडावी म्हणजे सभागृहाला शासनाला योग्य ते मार्गदर्शन करता येईल. मार्गदर्शन करण्यासारखे प्रश्न कोणते याचा निर्देश ह्या पुस्तिकेत दिलेला आहे. त्या प्रश्नाकडे जाण्यापूर्वी मी माझे काही विचार सभागृहापुढे मांडू इच्छितो.

सामान्यतः योजना म्हणजे काय हे पाहण्याची जी पद्धत आहे त्या बाबतीत कदाचित मतभेद राहतील. योजनेची व्याख्या करणे ही अतिशय अवघड गोष्ट आहे. सगळयाच गोष्टींची व्याख्या करणे अवघड आहे परंतु आपला आशय साध्य करण्याच्या दृष्टीने व्याख्या करणे सोयीचे आहे. आपण प्लॅन करावयास मागतो म्हणजे काय मागतो तर आमच्या देशात आणि आमच्या राज्यात उपलब्ध असलेल्या पार्श्वभूमीवर आम्ही आमच्या राज्यात काही गोष्टी करावयास मागतो हे स्पष्ट आहे.

मी असे मानतो की, प्लॅन ही एक पद्धत आहे, गतिमान पद्धत आहे तसेच आर्थिक विकास करण्याची ही पद्धत आहे. ही प्लॅनकडे पाहण्याची माझी दृष्टि आहे. अर्थात या आर्थिक विकासात सामाजिक विकास असावा लागतो. म्हणून सामाजिक उद्दिष्टासाठी आर्थिक विकास करण्याचे साधन म्हणजेच नियोजन असे मी मानतो. ही व्याख्या केल्यानंतर आमच्या देशात आम्हांला कोणती गोष्ट साधावयाची आहे ? सामान्यतः असे म्हटले तर हरकत नाही की जेव्हा स्वराज्यप्राप्ती झाली किंवा स्वराज्यप्राप्तीसाठी आम्ही सगळे लोक गुंतलो होतो तेव्हा आम्ही कशासाठी स्वराज्य मागत होतो, स्वराज्याची आवश्यकता निर्माण झाली ती कशासाठी ? केवळ परकीय लोकांना येथून घालवावयाचे होते एवढाच भाग नव्हता तर त्यातील तो एक मुख्य भाग होता, पण त्याचबरोबर जी काही सामाजिक आणि आर्थिक उद्दिष्टे आहेत त्याचीही चर्चा आम्ही आपल्या मनाशी सर्वजण करीत होतो आणि ती जी सामाजिक आणि आर्थिक उद्दिष्टे होती त्यांना निश्चित रूप देण्याचा प्रयत्‍न ह्या योजनांच्या रूपाने आपण करीत आहोत. आमचे सबंध जीवन, अर्थकारण, अर्थव्यवस्था ही एक प्रकारची ज्याला स्टॅटिक इकॉनॉमी, स्थिर स्वरूपाचे अर्थजीवन मिळेल अशी करावयाची आहे. अर्थशास्त्रज्ञ जे बोलतात त्यांच्या भाषेत बोलावयास सुरुवात केली तर मी असे म्हणू शकेन की, ज्या अर्थकारणामध्ये नवीन उद्योगधंद्यांच्या कामासाठी सेव्हिंग होईल आणि राष्ट्रीय उत्पन्नात किमानपक्षी ५ टक्के वाढ होईल ते आम्हाला साधावयाचे आहे. आम्हांला देशामध्ये एक प्रकारचे प्रवाही, शक्तिशाली व गतिमान असे अर्थजीवन निर्माण करावयाचे आहे आणि ते करताना आमच्या पुढे काही उद्दिष्टे आहेत. थोडया लोकांच्या हाती शक्ती केंद्रित व्हावी अशासाठी आम्हाला हे करावयाचे नाही, तर आमच्या पुढे जी सामाजिक उद्दिष्टे आहेत, ती सामाजिक उद्दिष्टे प्रस्थापित करण्यासाठी एक नवीन अर्थशाली व्यवस्था निर्माण करावयाची आहे व ती या नियोजनामुळे होणार आहे. हे प्राथमिक स्वरूपाचे विचार मांडल्यानंतर मी ह्या योजनेसंबंधी काही गोष्टी सांगणार आहे.  अध्यक्ष महाराज, तिसर्‍या पंचवार्षिक योजनेच्या आराखडयात आपल्यापुढे काही टास्कस म्हणजे कर्तव्ये आहेत. त्या कर्तव्यांमध्ये कोणती उद्दिष्टे आहेत याचा विचार करून त्यातील १, २  व ३ ची उद्दिष्टे ह्या पुस्तकामध्ये दिलेली आहेत. त्यातील पहिली तीन कर्तव्ये फार तर आर्थिक स्वरूपाची आहेत असे म्हणता येईल. चौथी आणि पाचवी कर्तव्ये सामाजिक उद्दिष्टांसंबंधी आहेत. आजच्या समाजात जी विषमता आहे ती दूर करण्यासंबंधीचे पहिले उद्दिष्ट असून दुसर्‍या उद्दिष्टानुसार उद्योगधंद्यांच्या संबंधात लोकांना रोजगार मिळण्याची परिस्थिती निर्माण करावयाची आहे. अशा प्रकारची जी दोन सामाजिक उद्दिष्टे डोळयांपुढे ठेवण्यात आली आहेत त्यानुसार प्रयत्‍न करावयाचा आहे. या प्रयत्‍नाच्या पाठीमागे जे तत्त्व आहे त्यावर पुढचे धोरण अवलंबून आहे ही भूमिका लक्षात घेऊन आम्ही आमच्या महाराष्ट्र राज्याच्या आर्थिक नियोजनाचे जे उद्दिष्ट आहे ते तपासण्याचा प्रयत्‍न केला तर अनेक प्रश्न उभे राहतात. त्यापैकी एक प्रश्न असा आहे की आम्ही काय करीत आहोत ?