यशवंतराव चव्हाण यांचे समाजकारण :१०४

काही पुढारी गावाचे, तालुक्याचे व कित्येक पुढे प्रांतिक असू शकतात. मागेपुढे अखिल भारतीय पुढारी थोडे झाले व असू शकतात. जागतिक नेते व विश्वमानव त्यातूनही फारच कमी निपजतात. सर्व राष्ट्रांचे नेतृत्व करून जगात शांती निर्माण करणारे महत्त्वाचेच होत. आजच्या आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या काळात जागतिक मुत्सद्दी व नेते अत्यंत महत्वाचे ठरतात. चांगले पुढारी, जागतिक नेते प्राप्त होणे ही एकपरी भाग्याचीच बाब जाणावी लागते. नियकतकालिकांना देखील पुढारी म्हणावे लागते कारण नेतृत्व (वैचारिक) करतात.

धर्मसंस्थापक श्रेष्ठ साधुसंत यांनाही नेते म्हणता येते, पण त्यांचे अनुयायी त्यांच्या उलट बहुतेक वागतात. अनुयायांच्या वर्तनावर नेत्यांचे यश अवलूंन असते. येशू व बुद्ध पराभूत आहेत, याचे कारण जागातून युद्धे नाहीशी झाली नाहीत. पण युद्धे होणार नाहीत असा प्रयत्न होत असतो; तरीपण अनादि अनंतकाळाच्या उदरातून फारच थोडे सत्पुरूष पुढारी लोकांच्या लक्षात राहतात. राम, कृष्ण, मारूती हे पौराणिक काळातील व शिवाजी इतिहास काळातील अशा सारख्यांच्या जयंत्या-मयंत्या स्मरणपूर्वक पाळल्या जातात. पैगंबर, येशू, झरत्रुष्ट्र वगैरे मोठमोठे धर्मसंस्थापक देखील कीर्तिवंत आहेत. हे सर्व त्यांच्या पक्षातही नेतृत्व करतात, म्हणजे यांना अनुयायांची कमतरता नाही. पुष्कळ स्थानिक महत्त्वाचे पुढारी काळाच्या उदरात गडप होतात. ह्या चाळणीतून जे राहातात ते महत्त्वाचे प्रत्यक्ष ठरतात. ज्यांचे विचार कालबाह्य होतात ते विस्मृत होतात. पुष्कळ पुस्तकातील विविचने पुढे कालबाह्य होतात.

घरातील कर्त्या पुरूषाच्या हातून कर्तबगारी घडली तर ती कुटुंबाला पुढे आणते. समाजाचे पुढारी, राष्ट्राचे पुढारी लोकांना पुढे आणतात, पण मोठमोठ्या पुढा-यांच्या हातून चुका झाल्या, त्यांचे निर्णय चुकले तर सर्व राष्ट्राला त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतात, निकोप निर्णय घेण्यासाठी नेत्यांना विवेकशक्ती मोठी असावी लागते. भविष्याचा वेध त्यांना असावा लागतो. नेतेपण, पुढारीपण सोपे नसते. विवेक व नेतृत्व यांचा विग्रह होता कामा नये, कारण पुढा-यावर जबाबदारी मोठी असते. देशाचे पंतप्रधान व अध्यक्षीय जबाबदारी मोठी असते. कारण हे सर्व नेते असतात व त्यांच्यावर देश योग्य मार्गाने नेण्याची जबाबदारी मोठी असते. अचूक निर्णयशक्ती परमविवेकांती प्राप्ती होते. युद्ध काळात तर देशाच्या नेत्याला निर्णय घेण्यास वेळ फार थोडा असतो. अशाही परिस्थितीत ज्यांचे निर्णय अचूक ठरतात ते युद्ध जिंकतात. नाहीतर चुका झाल्यास राष्ट्राला पराभवित व्हावे लागते म्हणून बुद्धीसामर्थ्य हे महत्त्वाचे असते. ‘बुद्धीर्यस्य बलं तस्य’ यशस्वी नेतृत्व हे अनुभवाने व दीर्घकालीन उमेदवारीअंती प्राप्त होऊ शकते, केवळ आकाशातून पडत नाही. यशस्वी पुढारी थोडेच असतात. ज्यांना यशस्वी पुढारी होणे आहे, त्यांनी यशस्वी झालेल्या पुढा-यांची चरित्रे अभ्यासावीत. बरेच पुढारी/ कार्यकर्ते आयुष्यात यश मिळवीत जातात. पण शेवटी एखादी मोठी घोडचूक करतात की, सारे यश – कीर्ती धुळीस मिळते व दुर्लभ आयुष्याची भ्रष्टाचारामुळे खानेखराबी होऊन जाते. म्हणून शोकांतिका कशा टाळाव्यात याची काळजी घेणे जरूर असते. मंत्री होणा-यांनी याची दखल घेतली पाहिजे, व्यसनाधिनता टाळली पाहिजे. कार्यकर्ते / पुढारी व विवेकवंत यांनी स्वत:चे आरोग्यही सांभाळले पाहिजे. हाती घेतलेल्या कार्याची पूर्तता होण्यासाठी दीर्घ आयुष्यही भेटणे जरूरीचे आहे. मनुष्यजन्म व आयुष्य ह्या दुर्लभ बाबी आहेत. पुढा-यांनी संपल्याच्या दुर्दैवी अवस्थेत जाऊ नये, संपून घरी बसण्याची अवस्था वाईटच!